Monday, December 12, 2016

अद्वितीय अशोकाची एकमेव प्रतिमा - वेचक वेधक -- १८ जून २००१

मराठीत छापील स्वरूपातील माहिती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, ती माहिती आंतरजालावर युनिकोड स्वरूपात उपलब्ध करून देणे हा ज्ञानभाषा मराठी समूहाच्या #मराठीयुनीकोडिंग उपक्रमाचा उद्देश आहे. तुमच्याकडे देखील अशी जुनी, कोणत्याही विषयावरील ज्ञानवर्धक माहिती उपलब्ध असेल तर ९०५२३४४४७६ या क्रमांकावर संपर्क साधा.

या उपक्रमातील दहावा लेख :
_____________________________

विख्यात नाटककार विल्यम शेक्सपिअरने 'नावात काय आहे' असे विचारले होते.या 'गहन' मुद्यावर उलट सुलट चर्चा चालल्याचे अनेकदा आपण ऐकतो. भारतीय पुरातत्व खात्याला हा प्रश्न विचाराल,तर तेथील संशोधक 'नावातच सर्व आहे',असे छातीठोकपणे सांगुन मोकळे होतील. कारण याच नावामुळे त्यांना सम्राट अशोकाची पहिली प्रतिमा मिळाली आहे. पुरातत्व खात्याला कर्नाटकातील कंगनहळ्ळी महास्तूपाजवळ एक शिल्प सापडले, त्यात राजा, राणी व त्याच्या समवेत काही स्रिया कौरण्यात आले आहेत. या शिल्पाखाली 'सम्राट अशोक' अशी अक्षरे ब्राह्मी लिपीत कोरली आहेत. ' सम्राट अशोक' दिसायला कसा होता, याचा अंदाज बांधण्यासाठी आजपर्यंत एकच पुरावा होता. सांचीच्या स्तूपात सम्राट अशोकाचे एकच चित्र आहे, मात्र त्याखाली त्याचे नाव नाही. आता 'नावात काय आहे' या प्रश्नाचे उत्तर 'सर्व काही' असे का? ते कळते.

सम्राट अशोकाची प्रतिमा कशी सापडली, याची कथाही रंजक आहे. कर्नाटक सरकारला गुलबर्गा जिल्ह्यात भीमा नदीवर कालवा बांधायचा होता. त्याच भागात भीमा नदीच्या डाव्या तीरावर सन्नधी या ठिकाणी अशोककालीन शिल्पे सापडली आहेत.हा भाग पुरातत्व खात्याच्या ताब्यात असला, तरी त्यांनी तो 'संरक्षित भाग' म्हणून घोषित केला नव्हता, त्यामुळे बंधारा बांधण्यापूर्वी त्याभागाचे उत्खननाचे काम हाती घेण्यात आले आणि आश्चर्य म्हणजे पुरातत्व खात्याच्या हाती खजिनाच गवसला. त्यात इसवीसनपूर्व पहिल्या शतकापासून ते इसवीसन दुस-या शतकापर्यंतच्या काळातील ६५ शिल्पे आहेत. बौद्ध धर्माच्या हिनयान व महायान या दोन्ही काळांतील ही शिल्पे आहेत. एकोणीस मीटर व्यासाच्या स्तूपाचे अवशेषही तेथे मिळाले आहेत.

सम्राट अशोकाची प्रतिमा असलेले शिल्प हा त्यातील महत्वाचा शोध असला, तरी पुरातत्व खात्याच्या दृष्टीने इतर काही गोष्टी या उत्खननात उजेडात आल्या आहेत. तेथील शिल्पकला आंध्र प्रदेशच्या अमरावती शिल्पकलेशी मिळती जुळती आहे. या शैलीला दक्षिणेतील सातवाहन राजांनी आश्रय दिला होता.  सुंगा राजघराण्याने जोपासलेला सांची व हरहट शैलीशीही तिचे साधर्म्य आहे. कंगनहळ्ळीतील शिल्पकला पाहिल्यानंतर सुंगा व सातवाहन काळात कला समृद्ध झाली होती, हे जाणवते.

शिकवण सांगणा-या जातककथा, बुद्ध आदींच्या आसनस्थ प्रतिमा त्यात कोरण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे ही शिल्पे तयार करण्यासाठी ज्यांनी आर्थिक मदत केली, त्या दानशूर व्यक्तींची नावे ही शिल्पाखाली कोरण्यात आली आहेत. देणगी देऊन मंदिराच्या पाय-यांवर नाव कोरुन घेण्याच्या सध्या रुढ झालेल्या प्रथेची यामुळे आठवण येते. सातवाहन राजांची वंशावळ हे कंगनहळ्ळी शिल्पातील वैशिष्ट्य आहे. हे सर्व अवशेष दोन हजार चौरस मीटर परिसरात विखुरले होते. तेथील स्तूपाचे फेर उभारणीचे काम पुरातत्व खात्याने हाती घेतले आहे. सुंदरशी बाग तयार करुन हे स्थळ पर्यटन केंद्र म्हणुन विकसित करण्याचा खात्याचा विचार आहे. हा भाग संरक्षित म्हणुन घोषित झाल्याने साहजिकच भीमा नदीवरील कालव्याला कायमचा निरोप मिळाला आहे.



टंकलेखन - श्रीमती विजया पाटील, नवापूर जि.नंदुरबार

परशुरामावतार (पुराणकथा व इतिहास )

मराठीत छापील स्वरूपातील माहिती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, ती माहिती आंतरजालावर युनिकोड स्वरूपात उपलब्ध करून देणे हा ज्ञानभाषा मराठी समूहाच्या #मराठीयुनीकोडिंग उपक्रमाचा उद्देश आहे. तुमच्याकडे देखील अशी जुनी, कोणत्याही विषयावरील ज्ञानवर्धक माहिती उपलब्ध असेल तर ९०५२३४४४७६ या क्रमांकावर संपर्क साधा.


या उपक्रमातील नववा लेख :

आश्रमामध्ये कार्तवीर्य एक दिवस गेला.तेव्हा परशुराम आश्रमामध्ये नव्हते.कार्तवीर्याने जमदग्नीची सवत्स गाय पळवून नेली.आश्रमामध्ये परत आल्यावर सर्व हकिकत परशुरामांना समजली होती.त्यांनी कार्तवीर्याचा वध करण्याची प्रतिज्ञा केली.त्यांचे वडील जमदग्नी यांनी हे वध करण्याचे कृत्य ब्राम्हणांना शोभत नाही,असे सांगितले ; परंतु प्रथम ब्रम्हदेव,नंतर शंकर यांची परवानगी घेऊन नर्मदेच्या तीरावर परशुरामांनी कार्तवीर्याबरोबर युद्ध केले.त्याचे सहस्त्र बाहू प्रथम तोडले,नंतर त्याचा वध केला.कामधेनू घेऊन परशुराम परत आले; परंतु जमदग्नीनी परशुरामांना बारा वर्षे तपश्चर्या करण्यासाठी,तसेच तीर्थयात्रा करण्यासाठी पाठवले, इकडे कार्तवीर्याचे मुलगे सूड घेण्यासाठी टपून बसले होते.परशुराम आता आश्रमामध्ये नाहीत, हे बघून त्यांनी जमदग्नीच्या आश्रमावर हल्ला केला.जमदग्नी ऋषी ध्यानस्थ बसले होते.त्या स्थितीतच त्यांचा वध केला. त्यांचे शीर तोडून घेऊन कार्तवीर्याचे मुलगे निघून गेले.परशुरामांना हे समजल्यावर त्यांनी एक विलक्षण प्रतिज्ञा केली - ज्या क्षत्रियांनी हे क्रुर कृत्य केले आहे, त्यांना शिक्षा झाली पाहिजे.त्यासाठी मी २१ वेळा पृथ्वी नि;क्षत्रिय करीन.

प्रथम त्यांनी कार्तवीर्याच्या मुलांचा समाचार घेतला.एकवीस वेळा मोहिमा त्यांनी आखल्या आणि क्षत्रियांचा वध केला.आपल्या २१ मोहिमांमध्ये परशुरामांनी अंग,वंग,कलिंग,विदेह,काश्मीर,कुंती,त्रिगर्त आदी अनेक देशातील राजांचा संहार केला. त्यामूळे अनेक क्षत्रिय कुळे नष्ट झाली होती.कित्येक राज्य सोडून गेले. कित्यकांनी नामांतर केले होते.परशुरामांनी अश्वमेध यज्ञ केला आणि सर्व भूमी व संपत्ती दान केली. कश्यपांना सर्व भूमी दान केली.
समाजासाठी ज्ञानी ब्राम्हण हवा तसा शासन करण्यासाठी क्षत्रियही हवाच ; परंतु परशुराम या भूमीवर आहेत, तोपर्यंत पुढे येऊन राज्य करण्याचे धाडस कोणी क्षत्रिय करणार नाही, हे कश्यपांनी ओळखले होते."हि भूमी तू मला दान केली आहेस . त्यामुळे ती माझी झाली आहे . यापुढे तुला या भूमीवर राहण्याचा अधिकार नाही," असे कश्यपांनी परशुरामांना सांगितले . परशुराम महेंद्र पर्वतावर निघून गेले.या पर्वतावरुन बाण सोडून त्यांनी समुद्र मागे हटवला आणि स्वतःचे परशुरामक्षेत्र तयार केले. वैतरणेपासून कन्याकुमारीपर्यंतच्या प्रदेशाला परशुरामक्षेत्र म्हणतात.

परशुराम हे अर्धावतार आहेत. राम - कृष्ण यांच्या पराक्रमाची वर्णने पुराणात केलेली आहेत, तशी परशुरामांच्या पराक्रमाची वर्णने केलेली नाहीत. परशुरामावताराची कहाणी सांगणारे स्वतंत्र पुराण नाही. 'परशुरामकल्पसूत्र' आणि 'परशुरामप्रताप' हे ग्रंथ त्यांच्या संप्रदायात आहेत.

त्रेतायुग आणि द्वापरयुग या दोन युगांच्या संधिकाळात परशुरामांचा अवतार झाला आहे . वैशाख शुद्ध तृतीया म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी परशुरामांचा जन्म झाला आहे . भार्गव कुलातील म्हणून त्यांचे नाव 'भार्गवराम' होते.तसेच , 'परशू' हे त्यांचे महत्त्वाचे अस्त्र होते.त्यामूळे त्यांचे परशुराम हे नाव रुढ झाले होते. या अवतारामध्ये विष्णूने प्रथम हातात शस्त्र घेतलेले दिसते. ते सुद्धा फेकून मारण्याचे, धारदार पात्याचे आहे . परशुरामांना वेगवेगळी ४१ अस्त्र वापरता येत होती ; तसेच धनुर्विद्याही प्रथम  शंकराने परशुरामांना शिकवली आणि त्यांनी या विद्येचा प्रसार केला, असे सांगतात. ब्राम्हणांचा संबंध ज्ञान, विद्या,अध्यापन पौरोहित्य यांपुरता होता. क्षत्रियांचे वर्चस्व वाढू लागले होते . ब्राम्हणांना ते कमी लेखत होते . अशा परिस्थितीत ब्राम्हण आणि ब्राम्हणांचे सामर्थ्य परशुरामांनी सिद्ध केले . परशुरामांना जसे अवतार मानले आहे , तसे चिरंजीवही मानले आहे. भार्गव कुळातील जमदग्नी आणि रेणुका यांना पाच मुलगे होते. सर्वात धाकटे परशुराम होते. परशुरामांचे मूळ नाव राम . भार्गव कुळातील म्हणून त्यांना भार्गवरामही म्हणत असत परशू हे अस्त्र त्यांना शंकराकडून प्राप्त झाले होते. परशूनेच त्यांनी कार्य केले असल्याने त्यांना 'परशुराम' हे नाव पडले. त्यांनी कश्यपांना गुरु करुन सर्व विद्या शिकून घेतल्या. त्यामध्ये धनुर्विद्या त्यांना अधिक आवडत होती. गंधमांधन पर्वतावर तप करुन त्यांनी शंकराला प्रसन्न करुन घेतले.

नर्मदा नदीच्या तीरावर हेहय कुळातील राजा कार्तवीर्य होता. त्याला सहस्त्रार्जुनही म्हणत. त्यांचे साम्राज्य नर्मदेपासून हिमालयापर्यंत पसरलेले होते. साहजिकच त्याला आपल्या सत्येचा आणि पदाचा अहंकार झाला. देव, ब्राम्हण यांचे अपमान करुन त्यांच्यावर अन्याय, जुलूम करीत असे. 'भार्गव कुलोत्पन्न परशुराम तुझे सहस्त्र बाहू तोडून तुझा वध करेल,' असा शाप वसिष्टांनी कार्तवीर्याला दिला होता.

अवतार या दृष्टीने परशुरामांचे कार्य आणि त्यांच्या जीवनातील घटनांचा अर्थ लावता येतो. परशुराम हे साधारण ७००० हजार वर्षापूर्वी झाले आहेत. रामाच्या पूर्वी १५००० वर्षे. परशू हे त्यांचे मुख्य हत्यार होते. त्यापासून रामापर्यंत धनुष्य हे शस्त्र विकसित झाले असावे. ब्राम्हण आणि क्षत्रिय हे तेव्हा समाजातील दोन महत्त्वाचे वर्ग होते; परंतु काही वर्षांनी क्षत्रियांना आपली सत्ता, अधिकार आणि पराक्रम यांचा गर्व झाला होता. आपल्या पराक्रमाचा त्यांना अहंकार झाला होता. वेदविद्येमध्ये मग्न असणा-या आणि पौराहित्य करणा-या ब्राम्हणांना ते तुच्छ मानत होते. त्यांच्यावर प्रसंगी अन्यायही करत होते. ब्राम्हण संघटित नव्हते. लढाई करुन प्रतिकार करत नव्हते. ब्राम्हणांचे आश्रम नष्ट करणे, हा त्यातलाच एक भाग होता. ब्राम्हणांच्या स्त्रियांनाही पळवून नेत होते. वसिष्ठ आणि जमदग्नी यांच्या आश्रमातील कामधेनू कार्तवीर्यने पळवून नेली. याचा अर्थ, ती प्रत्यक्ष गाय नसून आश्रमातील स्त्री असावी. कार्तवीर्याचे सहस्त्र बाहू हे त्याच्या सामर्थ्याचे आणि एकूणच क्षत्रियांच्या सामर्थ्याचे प्रतीक आहे. ब्राम्हणांचे समाजव्यवस्थेतील स्थान क्षत्रियांइतके महत्त्वाचे आहे , हे सिद्ध करणेही आवश्यक होते. ते कार्य परशुरामांनी केले आहे. कार्तवीर्याच्या मुलांबरोबर युद्ध केल्यानंतरच्या मोहिमांमध्ये परशुरामांना इतरांनी मदत केली असावी. त्यामूळे ब्राम्हणांप्रमाणेच क्षत्रियांनाही परशुरामांचे श्रेष्ठत्व मान्य झाले होते. परशुरामांना अनेक क्षत्रियांनी दैवत मानले आहे.

परशुरामांच्या पुढचे काम पुढील अवतारामध्ये रामाने केले. ब्राम्हण आणि क्षत्रिय दोघांनाही एकत्र आणून सहकार्य व सहयोग घडवून आणला.

लेखिका - डॉ. स्वाती कर्वे
संकलन - प्रा. र. भ. वनारसे
वरील लेख, श्री. बाळासाहेब बारवेकर, राजगुरुनगर यांनी टंकित केल्याबद्दल त्यांचे आभार.






स्मरण सोमनाथच्या शिलान्यासाचे

८ मे २००० या दिवशी सोमनाथ मंदिराच्या शिलान्यासाला ५० वर्षे पूर्ण होतात. इ.स.१०/०१/२०२६ रोजी गझनीच्या महम्मूदाने सोमनाथवर प्रथम हल्ला केला, त्यावेळी गुजरातमधील प्रभासपट्टण हे भरभराटीला आलेले आंतरराष्ट्रीय व्यापाराचे बंदर होते. प्रत्यक्ष सोमनाथ मंदिरातील अगणित संपत्ती पाहून गझनीच्या महमूदाचे डोळे दिपले.त्याचे भले मोठे स्तंभ  झगमगीत रत्नांनी आणि हिरे-माणकांनी मढविलेले होते. मूर्तीभोवतालचा साखळदंड हा, काही मण  सोन्याचा बनविलेला होता.महमूदाचे ती संपत्ती तर लुटलीच  परंतु शिवमूर्तीवर घणाचे घाव घालून  तीही त्याने फोडून टाकली आणि ते भव्य मंदिर उद्ध्वस्त करून टाकले.पण हे सहजासहजी करणे त्याला शक्य झाले नाही. सौराष्ट्राच्या हिंदू सेनेने त्याच्याशी घनघोर संग्राम केला. त्यात ५०००० हिंदू वीर धारातिर्थी पडले, असे इतिहास सांगतो.लूटमार करून गझनीचा महमूद गेल्यानंतर पुन्हा मंदिर उभारण्यात आले. पण थोड्याच काळात इतिहासाची पुनरावृत्ती झाली. चौदाव्या शतकात  अल्लाउद्दीन  खिलजीने सोमनाथवर हल्ला चढविला.लुटालूट केली आणि शिवमंदिर पुन्हा जमीनदोस्त केले. हिंदूंनी ते पुन्हा बांधले. त्यानंतर शिवशाही नष्ट करण्याकरिता सतराव्या शतकाच्या अखेरीला औरंगजेब दक्षिणेत उतरला. त्यावेळी त्याने आपली वक्रदृष्टी प्रभासपट्टणच्या  सोमनाथ मंदिराकडे वळवली.त्याने तेथे मशीद बांधण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण तो मराठ्यांच्या प्रखर विरोधामुळे यशस्वी झाला नाही. तिथे पुन्हा मंदिर उभारण्यात हिंदूंची हिंदूंनी यश मिळविले. इ.स.१७८३ च्या सुमारास इंदूरच्या राणीसाहेब अहिल्याबाई होळकर यांनी जुन्या मंदिराच्या जागेपासून दूर अंतरावर नवे शिवमंदिर बांधले. संरक्षणास सोपे जावे म्हणून त्यांनी शिवलिंगाची प्रतिष्ठापनाही भुयारात करून घेतली.नंतर १९ व्या शतकात व २० व्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत म्हणजे ब्रिटिशांच्या राजवटीत मूळ मंदिराची पडझड तशीच राहिली. १९४७ साली भारत स्वतंत्र झाला आणि सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराला पुन्हा आरंभ झाला.

सोमनाथ व अयोध्येतील श्रीरामाचे प्राचीन मंदिर या दोघांच्याही इतिहासात विलक्षण साम्य आहे. दोन संस्कृतींतील संघर्षाची ती प्रतीके बनली आहेत. प्रख्यात पाश्चात्य लेखक हटिग्टन यांनी आपल्या 'क्लॅश ऑफ कल्चर्स' या पुस्तकात जे प्रमेय मांडले आहे. त्याचा प्रत्यय या दोन्ही मंदिराच्या इतिहासाचा मागोवा घेतल्यास आल्याशिवाय राहत नाही.

१९४७ साली देश स्वतंत्र झाल्यानंतर सरदार पटेलांनी सोमनाथ मंदिराच्या पुनरूभारणीचा प्रश्न कसा हाताळला तो इतिहास मोठा स्फूर्तीदायक आहे. बॅ.मुन्शी त्यावेळचे बांधकाममंत्री.न.वि.गाडगीळ यांनीही त्या संबंधात बजावलेली कामगिरी उल्लेखनीय आहे. खुद्द मुन्शीनींच लिहिलेल्या 'सोमनाथ, दी श्राईन इटर्नल' या पुस्तकात त्याबाबतचा साद्यंत इतिहास वाचायला मिळतो. त्यात ते एके ठिकाणी म्हणतात, 'स्वातंत्र्यपूर्व काळात जेंव्हा जेव्हा जेव्हा हिंदूंनी मंदिराची पुनर्स्थापना करण्याचे प्रयत्न केले तेव्हा तेव्हा हिंदू -मुस्लिम  दंगे झाले'.आपण काॅलेजात असल्यापासून सोमनाथ मंदिराची भग्नावस्था पाहून कसे अस्वस्थ होतो त्याचा उल्लेखही त्यांनी त्यात केला आहे, '१९२२ च्या डिसेंबर महिन्यात एका भल्या पहाटे ते भग्न मंदिर पाहण्यास मी गेलो होतो.त्याची दुर्दशा पाहून मला रडू कोसळले. त्याच्या वैभवसंपन्न काळाचे दिवस मला आठवले आणि मी बेचैन झालो.ज्या मंदिराच्या गूढमंडपात एकेकाळी सौराष्ट्रातील अत्यंत पराक्रमी, बलाढ्य आणि उत्तुंग व्यक्तीचा मोठ्या दिमाखाने वावर व्हायचा,त्याच जागी एक यःकश्चित कोतवालाने आपले घोडे बांधलेले बघून माझे मन विषण्ण होऊन गेले.' त्यांनी पुढे याच विषयावर 'जय सोमनाथ' या नावाची एक कादंबरी लिहिली.त्यांची ही कादंबरी गुजराथच्या हिंदू समाजाचे मानस घडण्यास कारणीभूत ठरली.यासंबंधात ते म्हणतात, 'सोमनाथ मंदिराची वैभवशाली व आलिशान पुनरूभारणी ही एक राष्ट्रीय प्रतिज्ञा आहे (नॅशनल प्लेज).स्मारक या स्वरुपात ते भग्न अवशेष केवळ शाबूत ठेवणे हा त्याचा उद्देश असू शकत नाही. "

दुसरी एक आठवण सांगताना ते लिहितात, 'तो दिवस होता १२ नोव्हेंबर १९४७. त्या दिवशी  दीपावली होती. मी, काकासाहेब गाडगीळ व सरदार पटेल मूळ सोमनाथ मंदिराच्या दर्शनाला गेलो होतो.सरदारांच्या बरोबर संथपणे समुद्रकिना-यावर चालत होतो.एका विचाराने माझ्या मनात उसळी मारली. त्याच आवेगात मी सरदारांना म्हटले, भारत सरकारने भव्य सोमनाथ मंदिर नव्याने बांधले पाहिजे. कदाचित त्यांच्याही मनात तेच विचार चालू असले पाहिजेत.एका क्षणाचाही विलंब न लावता ते तात्काळ म्हणाले,  गो अहेड! करा सुरूवात! थांबलात कशाला?'

सरदार पटेल व बॅ.मुन्शी यांचे  राष्ट्रीय प्रश्नावरील विचार कसे मिळतेजुळते होते त्याबाबतीतील एक आठवण इथे सांगण्यासारखी आहे. त्याच मुक्कामात पुरातत्व खात्याचे काही अधिकारी सरदारांना भेटले. त्यांनी आग्रह धरला की नवीन मंदिर बांधण्याऐवजी आपण मंदिराचा जीर्णोद्धार करू, म्हणजे एक  स्मारक म्हणून त्याची बूज राखली जाईल. पटेलांनी त्यांचे हे म्हणणे तात्काळ धुडकावून लावले. ते म्हणाले, या  मंदिराच्या बाबतीत हिंदू समाजाच्या भावना एवढ्या तीव्र, प्रखर आणि सार्वत्रिक आहेत की त्याचा केवळ जीर्णोद्धार करून त्याची डागडुजी करून त्यांचे मुळीच समाधान होणार नाही. कारण तो हिंदू समाजाच्या स्वाभिमानाचा आणि इभ्रतीचा प्रश्न आहे, म्हणून नव्या मूर्तीची पुनर्प्रतिष्ठापना होणे आणि भव्य सोमनाथ बाबतीत धर्मनिरपेक्षतेच्या प्रश्नाने बराच हलकल्लोळ माजविला आहे. तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनीदेखील हा मुद्दा सोमनाथ मंदिराबाबत प्रकर्षाने मांडला होता.त्याचीच चर्चा मंत्रीमंडळाच्या एका बैठकीत निघाली.मंदिराच्या पुनरुभारणीचा प्रश्न हा जातीय स्वरूपाचा आहे, असे नेहरू म्हणाले. त्यांच्या प्रतिपादनावर बॅ.मुन्शींनी स्पष्ट शब्दात आक्षेप घेतला, म्हणून ती चर्चा तिथेच थांबली.पण मुन्शी तेवढ्यावरच थांबले नाहीत. त्याच दिवशी त्यांनी पंडित नेहरूंना पत्र पाठविले. त्यात त्यांनी स्पष्टपणे लिहिले की, "भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही हिंदूंचे अधिदैवत असलेल्या भगवान शिवशंकराचे मंदिर नव्याने उभारण्याचे त्यांना जर स्वातंत्र्य नसेल तर अशा स्वातंत्र्याला त्यांच्या लेखी अर्थ तरी काय राहतो? माझ्या त्याबाबतीतील मतांना आपण जातीय म्हणून समजत असाल तर आपल्या मंत्रीमंडळात न राहणेच मी पसंत करीन." अर्थात पंडित नेहरूंनी हा प्रश्न  अधिक ताणून धरला नाही. कदाचित ते त्यावर अल्पमतात असल्याची जाणीव त्यांना झाली असावी. पुढे सोमनाथ मंदिर पूर्ण झाल्यावर शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्याचा प्रसंग आला. तो दिवस होता  11/5/1951. त्यावेळी राजेन्द्र प्रसाद  राष्ट्रपती होते. प्राणप्रतिष्ठापना त्यांच्याच हस्ते व्हावी, असे ठरले. त्यांनी या प्रस्तावाला मान्यताही दिली व तसे जाहीरही करून टाकले. परंतु पंडित नेहरूंना हे पसंत नव्हते. राष्ट्रपतींच्या हस्ते मंदिराची प्राणप्रतिष्ठापना व्हावी,ही गोष्ट त्यांच्या नाजूक व हळव्या धर्मनिरपेक्षतेच्या संकल्पनेला तडा देणारी वाटली.पण राजेन्द्र प्रसादांना तसे वाटत नव्हते. त्यांनी पंतप्रधान पंडित नेहरूंना स्पष्टच कळविले की,मी एक हिंदू आहे आणि राष्ट्रपती म्हणून नव्हे तर केवळ एक व्यक्ती म्हणून मूर्तीची प्रतिष्ठापना करणे हा मी माझा सन्मान समजतो. त्यात धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाला येते असे मला मुळीच वाटत नाही. तथापि आपला जर असा ग्रह असेल तर मी राष्ट्रपतीपदाचा राजीनामा देईन. पण मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केल्याशिवाय राहणार नाही. राजेन्द्र प्रसादांनी अशी निर्वाणीची भुमिका घेतल्यानंतर पंडितजींना माघार घेण्याशिवाय दुसरा कोणताच मार्ग उरला नाही.

सोमनाथ मंदिर काय किंवा रामजन्मभूमीचा प्रश्न काय या  दोन्ही प्रश्नाबाबतीत इस्लाम मनोवृत्तीचे दर्शन त्याच स्वरुपात घडले आहे याचा येथे उल्लेख करणे आवश्यक आहे. थोर समाजवादी नेते कै.मधु लिमये 'आसाम ट्रिब्युन'च्या 16/7/1993 च्या अंकात (सोमनाथ अॅड अयोध्या:ए कंपेरिजन)लिहितात-सरदार पटेलांनी सोमनाथ मंदिर पूर्वीच्याच ठिकाणी म्हणजे मूळ देवालयाच्या जागेवर नव्याने उभारण्याचा प्रश्न हाती घेतला, तेव्हा पंडित नेहरूंच्या मुस्लिम मित्रांनी  त्या विरुद्ध बराच गहजब केला. परंतु जामानिमा मशीद  (जुनी दिल्ली) दुरूस्त करण्यासाठी केंद्रसरकारने जेव्हा आर्थिक मदत जाहीर केली, तेव्हा त्यांचा हा विरोध मावळला.याबाबतीत त्यावेळचे बांधकाममंत्री न.वि.गाडगीळ यांनीही आपल्या 'पथिक' या पूस्तकात अब्दुल कलाम आझादांच्या तत्संबंधीच्या भूमिकेचा उल्लेख केला आहे. आझाद म्हणाले,"मंदिर बांधावयाचे असेल तर खुशाल बांधा,पण त्याच जागी का?दुसरीकडे कुठेतरी बांधा." अर्थात त्यांची ही सूचना गाडगीळ व सरदार पटेलांनी धुडकावून लावली हे निराळे सांगण्याची गरज नाही. पण या तथाकथित राष्ट्रीय मुस्लिम नेत्यांची भूमिकाही कशी छुपी जातीयवादी होती हेच दिसून येते नाही काय?

सोमनाथ मंदिराबाबतची मुस्लिम मानसिकतेवर प्रकाश टाकणारी आणखी एक आठवण इथे सांगण्यासारखी आहे. विशेष म्हणजे  त्याचा संबंध साक्षात महात्मा गांधींशींच पोचतो.त्याबाबत रफिक झकेरिया यांनी 'सरदार पटेल अॅण्ड इंडियन मुस्लिम्स' या आपल्या पुस्तकात म्हटले आहे.ते असे -काही बहकलेल्या मुस्लिमांनी सरदार पटेलांच्या सोमनाथ मंदिराच्या नवनिर्मितीलि प्रखर आक्षेप घेतला. त्यापैकी एकाने तर एका प्रख्यात उर्दू पत्रिकेत हिंदू समाजाची व भारताची निर्भत्सना करणारा एक शेरच प्रसिद्ध केला, 'फिर बनायला जा रहा है सोमनाथ! एक नया मुहमद आनेको है!' सुदैवाने बर्याच सुजाण मुस्लिमांनी त्याबद्दल नाराजी प्रदर्शित केली.सरदार पटेलांच्या वाचनात ही शेरोशायरी आल्याबरोबर त्यांनी महात्माजींचे त्याकडे लक्ष वेधले. १२/१२/१९४७ रोजी झालेल्या त्यांच्या प्रार्थनासभेत महात्माजींनी त्याचा उल्लेख केला व ते म्हणाले की, हा शेर वाचून मला फारच क्लेश व दुःख झाले. भारतातील कोणताही सच्चा मुसलमान असे विचार मनात तरी आणू शकतो काय?  इथल्या मुसलमानांनी सोमनाथ मंदिराच्या पुनर्स्थापनेसाठी सहकार्य का देऊ नये  व त्याबद्दल त्यांना अभिमान का वाटू नये? महमूद गझनवीने जी हीन, रानटी आणि असंस्कृत कृत्ये केली त्याबद्दल इथल्या मुसलमानांना अभिमान वाटतो काय? तसे असेल तर ते दुर्दैव आहे. कारण अपकृत्याची फेड सत्कृत्याने करावी, हे ब्रीद मी स्वीकारले आहे, म्हणून माझ्या मुस्लिम बांधवांना माझे असे म्हणणे आहे की, त्यांनी व शिखांनी या भावनेच्या आहारी न जाता कोणाच्याही बहकाव्याच्या सापळ्यात स्वतःला अडकून घेऊ नये. एखाद्या फालतू उर्दू पत्रात ही बातमी आली असती तर त्याची मी दखल घेतली नसती. परंतु हा शेर एका प्रतिष्ठित उर्दू पत्रात छापून आला, म्हणून त्यावर माझी प्रतिक्रिया सांगणे मला आवश्यक वाटते.

(दिल्ली डायरी :गांधीजीज प्रेअर स्पीचेस, १/९/१९४७ ते १/९/१९४८)

कदाचित गांधी आज हयात असते तर तोच अनुभव त्यांना आला असता.

(विश्व  संवाद फीचर्स)

----गो.ब.सरदेसाई

साद निसर्गाला

मराठीत छापील स्वरूपातील माहिती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, ती माहिती आंतरजालावर युनिकोड स्वरूपात उपलब्ध करून देणे हा ज्ञानभाषा मराठी समूहाच्या #मराठीयुनीकोडिंग उपक्रमाचा उद्देश आहे. तुमच्याकडे देखील अशी जुनी, कोणत्याही विषयावरील ज्ञानवर्धक माहिती उपलब्ध असेल तर ९०५२३४४४७६ या क्रमांकावर संपर्क साधा.

या उपक्रमातील आठवा लेख :
_____________________________

सर्व प्रकारच्या प्रदुषणांमूळे कोंदटलेल्या पुण्यात निसर्गाचे सुखद व शीतल दर्शन एम्प्रेस गार्डन मध्ये घडते. धकधकीच्या जीवनात वावरताना निसर्गाला घातलेली हि साद आहे. या उद्यानाविषयी. जणू जंगलात आलो आहोत; असे वाटण्याइतपत दाट झाडी, विवीधरंगी फुले, झुळूझुळू वाहणारा ओढा, वेगवेगळ्या पक्ष्यांचा किलबिलाट.... भोवतालच्या जगाचा विसर पाडायला लावणा-या अशा ह्या निसर्गाची ओढ सर्वांनाच असते;

पण सिमेंटच्या जंगलात आणि वाहतुकीच्या गोंगाटात अडकलेल्या शहरवासीयांना या निसर्गाची अनुभूती दूर्मिळच. तुलनेने पुणेकर मात्र सुदैवी. कारण अशा निसर्गाच्या शोधासाठी त्यांना खूप दूरवर जाण्याची गरज नाही. एम्प्रेस गार्डनच्या रुपाने पुण्यातच हा निसर्ग ठेवा त्यांच्यासाठी उभा आहे.

सदतीस एकरांच्या विस्तीर्ण परिसरात जाणीवपूर्वक वाढविण्यात आलेल्या या उद्यानात निसर्गाचे सुखद व शीतल दर्शन घडते. मोठाल्या वृक्षांसाठी प्रसिध्द असलेले हे उद्यान कोणत्याही निसर्ग प्रेमींना सतत साद देणारे आहे. शहराच्या पूर्व भागातील या उद्यानात पाऊल टाकल्यानंतर प्रथम दर्शन घडते हे हिरव्या निसर्गाचे. या उद्यानाचा इतिहास रंजक आहे. या उद्यानाची मूळ जागा ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याची. त्यांनी ही जागा ब्रिटीशांना दिली. सुमारे ४१ एकर ऐवढे क्षेत्र त्यावेळी होते. त्या ठिकाणी ब्रिटिशांच्या गँरिसन फलटणीने उद्यान उभारले. हीच पलटन त्याची व्यवस्था पाहायची. त्यामुळे 'सोल्जर्स गार्डन' या नावाने ती प्रसिद्ध होती. सर रिचर्ड टेम्पल यांनी या उद्यानाचा १८७८ मध्ये कायापालट केला. पुणे खडकीच्या विशेष अभियंत्याकडे कारभार सोपवला. येथे आठवड्यातून दोन वेळा लष्करी बँड वाजवला जात असे. सप्टेंबर १८८४ मध्ये गणेशखिंडीतील बोटँनिकल गार्डन येथे हालवण्याचा निर्णय झाला.

दरम्यान,  मुंबई प्रांताचे तत्कालीन गव्हर्नर सर जॉन माल्कम यांच्या प्रोत्साहनाने 'अँग्री हॉल्ल्टिकल्चर सोसायटी अॉफ वेस्टर्न इंडिया' या संस्थेची स्थापना झाली. ब्रिटिशांनी १८९२ मध्ये या संस्थेकडे उद्यान सोपवले आणि या उद्यानाचे नाव 'द एम्प्रेस गार्डन' करण्यात आले. मध्यंतरीच्या काळात या उद्यानाची दुरावस्था झाली. शासनाने संस्थेकडून हे उद्यान स्वतःच्या ताब्यात घेतले होते; पण त्याकडे पुरेसे लक्ष दिले नाही. हे उद्यान पुन्हा संस्थेच्या ताब्यात द्यावे, असा उद्योगपती (कै.) शंतनुराव किर्लोस्कर, विधानसभेचे माजी सभापती (कै.) जयंतराव टिळक यांनी आग्रह धरला. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन वीस वर्षांनी पुन्हा उद्यान संस्थेकडे आले.

पर्यावरणचक्राला कसलाही धक्का न लावता येथे जॉगिंग ट्रँक , मुलांसाठी खेळणी, बसण्यासाठी आसने आदींची सोय करण्यात आली आहे. उद्यानाचे स्वरूप बदलत असताना त्याचे शास्त्रीय महत्व ही कायम राखण्यात आले आहे. वेगवेळ्या जातीचे एकहजार वृक्ष येथे आहेत. झुडपे निवडुंग आहेत. अडीचशे वर्षापूर्वीचे वडाचे झाड आहे. दीडशे वर्षापूर्वीची 'कांचनवेल' (बॉहिनिया वाहिली) आहे. वेल म्हटले, की एक नाजूक, मोठ्या वृक्षाला अलगद बिलगलेली वेल डोळ्यांसमोर उभी राहील. ही कांचनवेल मात्र आता एखाद्या दणकट वृक्षाच्या खोडाशी स्पर्धा करते आहे. वाढीच्या वयात रोज पाऊण मिटरने वाढणारा व सुमारे तीस मीटरपर्यंत जाणारा 'जाएंट बांबू' येथे पाहायला मिळतो.

एरवीच्या धकाधकीच्या जीवनक्रमातून मोकळे होण्यासाठी या हिरव्या निसर्गाला कधीतरी प्रतिसाद द्यायलाच हवा.......

- १५ मार्च २००२ प्रतिबिंब
- संकलन : प्रा. र. भ. वनारसे
- वरील लेख, श्री. सोमनाथ पुरी यांनी टंकित केल्याबद्दल त्यांचे आभार.


Tuesday, December 6, 2016

भारतीय वाद्ये

काही तंतुवाद्ये व इतर प्रकारातील काही वैशिष्टयपूर्ण वाद्यांचा परिचय

असामान्य तारशहनाई

सर्वसाधारणपणे तंतुवाद्याच्या तळाशी पोकळ भोपळा किंवा लाकडी ठोकळा हा तारांच्या स्पंदनाच्या ध्वनीच्या वर्धनासाठी व माधुर्यासाठी वापरला जातो व सर्व तंतुवाद्याच्या हा एक अटळ व अत्यंत महत्त्वाचा भाग आहे . पंरतु या संग्रहालयात अत्यंत आगळेवेगळे व सहसा कोठेही  न आढळणारे असे तंतुवाद्ये आहे. त्याचे  नाव सुद्धा तारशहनाई असे वैशिष्टयपूर्णच  आहे.  जरी त्याच्या  नावात शहनाई शब्द असला तरी ते वाद्य नसुन मूलतः तंतुवाद्ये आहे . दिलरुबा किंवा सांरगी प्रमाणे हे गजाने वाजवितात . याला चार प्रमुख मुख्य तारा व आठ उप तारा असतात.

याचे सगळ्यात मोठे वैशिष्टय म्हणजे त्याच्या तळाला भोपळा किंवा लाकुड याचा वापर केलेला जात नाही . तर जुन्या  हिज मास्टर्स व्हॉईस  च्या ग्रामोफोनप्रमाणे याला पिकअप हेड व एक छोटा कर्णा आहे . त्याचा तपशील सोबतच्या फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहे .

या संग्रहालयात प्रतिवर्षी साधारणपणे एक लाख भारतीय व दीड ते दोन हजार परदेशी प्रवाशी भेट देतात. हे आपण या मालेतील पहिल्या लेखात  पाहिलेच आहे . मी या संग्रहालयात मार्गदर्शकव्याख्याता काम करीत असतांना अनेक उत्सुक व जाणकार प्रेक्षकांना या  वैशिष्टयाबद्दल विचारले असता, त्यापैकी  एकाही भारतीय वा परदेशीय प्रेक्षकांने असे वाद्ये अद्याप बाहेर कोठेही पाहिले नसल्याचे प्रांजळपणे सांगीतले . असे हे असामान्य व अमूल्य वाद्य या संग्रहालयाला प्रसिद्ध संगीतकार व आकाशवाणी कलावंत मधुकरराव गोळवलकर यांनी दिले आहे. हे वाद्ये आवर्जुन पाहावे .

या तंतुवाद्याव्यतिरिक्त या संग्रहालयात एक अत्यंत सुंदर  व मोहक अशी वीणा आहे . तिच्या तळाला  सुद्धा भोपळा किंवा लाकुड याचा वापर न करता शहामृग पक्ष्याचे अंडेच भोपळयाच्या जागी वापरले आहे.  त्याच्या जवळच विलादी नाद मंडल , बर्मीस स्वॅम , बिल्लु ,पट्टमा इत्यादी अत्यंत विलोभनीय व पशुपक्ष्यांच्या ,मत्स्याच्या बाह्य आकृतिसदृश्य इतर तंतुवाद्ये  आहेत . ती पाहण्यास विसरू नयेत.

ताल वाद्ये

तालवाद्यांना चर्मवाद्ये असे सुद्धा म्हणतात . कारण या प्रकारात मुख्यतः -

सुशिर वाद्ये

अगदी वर प्रसिद्ध बासरीवादक पन्नालाल घोष यांची बासरी आहे. चामडयाचा वापर करून ही वाद्ये बनाविली जातात . यामध्ये अंवडंबर ,घुमट ,खोल चौघडा, डंका, डफ, डमरू,डिडंम,ढोल, ढोलकी,तबला-डग्गा, दुंदुभी, नगारा,पखवाज , नौबत, मृंदग, संबळ ,  ताशा इत्यादी अनेक वाद्याचा समावेश होतो. यामध्ये लाकडाचे किंवा धातुचे  विविध आकाराचे पोकळ भांडे बनवून त्यावर जनावराचे कातडे चडवून ताणून बनविलेले असते  व तंतु वाद्यात तारेला ताण देण्यासाठी ज्या प्रमाणे खुंटया  असतात त्याप्रमाणे चामडीच्या वादीने ताण दिलेला  असतो .  व तो कमी जास्त करण्यासाठी लाकडी दंडगोलाचा उपयोग पाचरीप्रमाणे करून  छोटया पितळी हातोडीने  ही ठोकतात यालाच ते वाद्ये लावून घेणे म्हणतात. या संग्रहालयात जी वैशिष्टयपूर्ण तालवाद्ये आहेत,त्यामध्ये पंचमुख वाद्यम् हे प्रमुख आहे . त्या शिवाय विशेषतः बंगाल, मणिपूर भागात खोल म्हणून प्रचलित असलेले मृदंगासारखे वाद्य आहे. हे बहुधा मणिपुरी नृत्याच्या वेळी वापरले जाते . याचा विशेष म्हणजे याची  मुख्य घडण लाकूड किंवा धातूऐवजी काचेची केलेली असते . शिवाय ग्वाल्हेरच्या शिंदे सरकार कडील एक मोठा नगारा ,तीन तोंड़ी मृदंग म्हणजेच त्रिपुष्कर  इत्यादी वाद्ये बघण्या सारखी आहेत . महाराष्ट्रात लावणी व पोवाडे आदी लोकगीतामध्ये वापरला जाणारा डफ हा सर्व भारतभर आढळतो ,परंतु अरबी शब्द 'दफ' यावरून डफ हा शब्द सद्ययुगात तयार झाला असावा असा अंदाज आहे .

सुषिर वाद्ये

सुषिर म्हणजे पोकळ म्हणून वायुच्या साह्याने वाजवली जाणारी वाद्ये. मग ती तोंडाने हवा फुंकून असोत किंवा दुसऱ्या यांत्रिक मदतीने  असोत , त्यांना सुषिर वाद्ये म्हणतात .  ही वाद्ये अतिप्राचीन काळापासुन भारतामध्ये प्रसिद्ध आहेत यामध्ये अलगुज ,तुतारी ,बासरी , पावा, वेणू, मुरली, कर्णा , नादस्वरम्, पुंगी, शंख, शिंग, सनई म्हणजे शहनाई, सुंद्री,हार्मोनियम म्हणजेच बाजाची पेटी , ऑर्गन आदी वाद्ये व त्याचे अनेक उपप्रकार आहेत .
अलगुज , बासरी, वेणू, पावा, ही जवळपास एकाच वर्गातील वाद्ये आहेत . ही मुख्यतः पोखळ बांबुपासुन बनवितात . कित्येक वेळ पितळेच्या किंवा तांब्यापासुनसुद्धा बनविलेल्या असतात; परंतु बांबुपासुन बनविलेल्यांचाच मधुर ध्वनी येतो.  याला बहुधा आठ छिद्रे असतात व ती तापवलेल्या सळईने पाडतात या संग्रहालयात प्रसिद्ध बासरीवादक पन्नालाल घोष यांची बासरी बघण्यासारखी आहे. पुंगी हे नाव उच्चारताच आपल्या डोळयासमोर नाग, साप व त्यांना मोहविणारा गारूडी नजरे समोर येतो . देठाकडे निमुळता होत गेलेला कडू भोपळा घेवून त्याच्या रूंद बाजुस दोन भोके पाडून  दोन नळया पंधरावीस सेंटीमीटर लांबीच्या बसवतात. पुंगीचे सुर त्यातल्या त्यात भैरवीला जवळचे असतात. वास्तविक सर्प किवा नाग काना कर्णेंद्रिय  नसतात . त्यामुळे त्यांना श्रवणज्ञान होत नाही ; परंतु गारूडी पुंगी वाजवताना त्याच्या हालचालीकडे त्याचे एकचित्त लक्ष असते व तो गारूडयाच्या डोलण्याप्रमाणे डोलतो म्हणून आपणास तसे वाटते.

शंख, शिंग, भेरी हे धार्मिक अथवा युद्ध प्रसंगी पूर्वी वाजवित; परंतु सुषिर वाद्यातील सध्या सर्वात लोकप्रिय वाद्ये म्हणजे सनई किंवा शहनाई होय. सनईचा आवाज तिच्या अत्यंत कौशल्यपूर्ण घडणीवर अवलंबून असतो . म्हणून तिचे जिभाळ ,पावी ,नळी आणि अन्नस हे चारही भाग घडविणे अत्यंत कौशल्याचे व अनुभवाचे आहे.
 बिस्मिला खान दुर्गादासांनी बनवलेल्या शहनाईशिवाय दुसरी शहनाई वापरत नाहीत. त्यामुळे शहनाईसम्राट बिस्मिल्लाखॉ  यांच्या सनई वादनाबरोबरच ती बनाविणारे त्याचे कारागीर नाशिकचे दुर्गादासजी ठाकूर यांनासुद्धा फाय फाउंडेशनचा पुरस्कार मिळाला. कारागिरांच्या कलेला न्याय देणारे आहे .

हार्मोनियम जरी शास्त्रीय संगीताच्या दृष्टीने अधिक श्रुती वाजवू शकत नाही म्हणून गौण मानला गेला होता , तरी वाजविण्याची सुलभता या गुणामुळे हार्मोनियम पुन्हा खुप लोकप्रिय होत आहे . याची पायपेटी संगीत नाटकात किंवा जलशात जास्त करून वापरतात .

घन किंवा धातुवाद्ये

यांच्या नावावरून ध्यानात येईल, की पूर्णपणे धातुचीच वाद्ये आहेत  . झांजा , चिपळया, किंकिणी ,घुंगरू , घंटा ,जलतरंग , पोलादी त्रिकोण , खुळखुळे ,चिमटा व पियानो इत्यादी वाद्याचा समावेश होतो . पैकी टाळ , झांज्या , चिपळया  यांचा उपयोग मुख्यत्वे भजन,कीर्तन प्रसंगी ,घुंगरु  व किंकिणी नृत्यप्रसंगी , चिमटा हे पंजाब वैगेरे भागात लोकनृत्यात वाजवतात . विशेष म्हणजे बऱ्याच लोकांना पियानो ते पाश्चिमात्य वाद्य सुषिर आहे,असे वाटते ,परंतु ते एक धुतवाद्य आहे . अधिक माहितीसाठी  रसिकांनी पं.  वसंतराव खाडिलकर यांचा *श्री गंधर्ववेद * हा ग्रंथ पाहावा .

लेखक - ना. भा. आदमणे
संकलन - प्रा. र.भ. वनारसे

श्री. लाला तावडे यांनी हा लेख टंकित करून युनिकोडमध्ये उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे शतशः आभार.








आठवण एका क्रूर प्रेमाची

१६५८ चं ते वर्ष देशभरात मराठे,मोगल आणि आदिलशाही राजवटीतील तो युद्धाचा काळ.अली आदिलशहा( द्वितीय)यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पाडाव कारण्याचा विडा उचलला होता.त्यासाठी आपला सेनापती अफ़जल खान याला त्याने निवडले होते.शकुन-अपशकुन मानणारा अफ़जल खान याने लढाईला जाण्यापूर्वी एका ज्योतिषाची भेट घेतली तेव्हांच त्याच्या मृत्युचे निदान झाले होते."या मोहिमेत तू ठार झाल्यानंतर तुझ्या सर्व राण्या दुसर्यांशी विवाह करतील",असे हि ज्योतिषाने सांगितले.अर्थात आपल्या मृत्यूची पूर्वकल्पना मिळाल्याने खान खूप व्यथित झाला.पण त्याला जास्त दुःख झाले ते आपल्या पत्नींच्या संभाव्य दुसऱ्या लग्नांचे अफ़जल खानाचे आपल्या पत्नींवर इतके प्रम होते की त्यांनी आपल्या नंतर इतर कोणाशीही विवाह करावा, हि कल्पना हि त्याला सहन झाली नाही.तेव्हा त्याने आपल्या पत्नींची हत्या करण्याचा निर्णय घेतला.त्याचा पत्नी किती होत्या माहित्येय? एकूण ६३ .छत्रपती शिवाजी महाराजांविरुद्ध लढायला जाण्यापूर्वी त्याने या ६३ जणींना ठार केले. या क्रूर प्रेमाच्या आठवणी अजूनही विजापूर येथे जपून ठेवण्यात आल्या आहेत.'साठ कबर' म्हणून प्रसिद्ध असलेल्या या भागात एक एकर जमीनी वर या दुर्दैवी महिलांच्या कबरी आहेत.त्यापासून फक्त पाच किलोमीटर अंतरावर अफ़जल खान ह्याची कबर आहे.अर्थात ही सर्व सोय त्याने शिवाजी महाराजानं विरुध्द मोहिमेला जाण्यापूर्वीच करून ठेवली होती.

भारतीय पुरातत्व विभागाने हे स्थळ  ताब्यात घेऊन जतन करण्याचा निर्णय घेतला.मात्र असे असूनही त्याची  अतिशय दुरावस्था झाली आहे.कर्नाटक सरकारने राज्यातील पर्यटनास प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला असला तरी ज्या तऱ्हेने त्यांची वाटचाल सुरु आहे,त्यातून ते पर्यटना बाबत किती उदासीन आहेत हे दिसून येते. साठ कबर जाणारा पक्का रास्ता ही उपलब्ध नाहीं.जो आहे त्याची अवस्था खूप वाईट आहे. संपूर्ण विजापूरमध्ये प्रसिद्ध  गोल घुमट सह एकूण ५० मशीदी आणि 20 ऐतिहासिक कबरी आहेत. मात्र पुरातत्व खात्याकडे त्यांची व्यवस्था पाहायला पुरेसा निधी नाही असे आता स्पष्ठ होत आहे.त्यात सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर खर्च  वगळल्यानंतर प्रत्येक पुरातन स्थळाचे जातं करण्यासाठी अवघे ७६०० रुपये मिळतात. विभागातील काहींचे असे हि म्हणणे आहे की साठ कबरह्या कबरीच आहेत नाव , मग त्यावर खर्च करून काय करणार.  पण शेवटी ताजमहाल हि हि एक कबरच आहे ना?मुळात ह्या पत्थरांकडे  एक इतिहास मगणून पहिलं तर ते खूप विचित्र वाटते. अफ़जल खानाचे अपल्या पत्नींवर खूप प्रेम होत हे खरं असलं तरी त्याच्या क्रूरपणामुळे त्यांना मिळालेला अकाली मृत्यु हा हि इतिहासाचा भाग नाही होऊ शकत का?

संकलन:-प्रा.र.भ.वनारसे
श्री. दीपक सरनोबत यांनी हा लेख टंकित करून युनिकोडमध्ये उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे शतशः आभार.

#जुनेमराठीलेख




ओळख तिकिटांची

इ. स. ५५० ते इ . स. १४५० या मध्ययुगीन काळातील भारतातील कोरीव शिल्प फार प्रसिध्द आहेत .
याच काळातील आरशात सौंदर्य न्याहाळत साजश्रृंगार करणाऱ्या एका स्रीच्या शिल्पाच्या चित्राची तिकिट प्रकाशित करण्यात आले आहेे. लाल, ब्राउन रंगात हे शिल्प छापलेले असून त्याची किंमत १ रुपया आहे .
भारताच नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीर मध्ये अप्रतिम निसर्ग सौंदर्य याने नटलेल्या दललेक
या सरोवराचे तिकीट प्रकाशित करण्यात आले . हे तिकीट निळसर जांभळया रंगात छापलेले असून ह्याची किंमत २ रूपये ठेवण्यात आलेली आहे.

लेखक आणि वर्तमानपत्राचे संदर्भ मिळाले नाहीत
संकलन - सुनिता भाईदास पवार
'सुनिता भाईदास पवार' यांनी हा लेख टंकित करून युनिकोडमध्ये उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे शतशः आभार. #जुनेलेख




'देवगिरी'त उभे होते दोन मिनार

मराठीत छापील स्वरूपातील माहिती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, ती माहिती आंतरजालावर युनिकोड स्वरूपात उपलब्ध करून देणे हा ज्ञानभाषा मराठी समूहाच्या #मराठीयुनीकोडिंग उपक्रमाचा उद्देश आहे. तुमच्याकडे देखील अशी जुनी, कोणत्याही विषयावरील ज्ञानवर्धक माहिती उपलब्ध असेल तर ९०५२३४४४७६ या क्रमांकावर संपर्क साधा.

या उपक्रमातील चौथा लेख :
___________________

'देवगिरी'त उभे होते दोन मिनार

देवगिरीच्या किल्ल्यासमोर एक नव्हे, तर दोन मिनार होते,  असे  चित्र भारतीय पुरातत्व खात्याच्या हाती लागले आहे. या चित्रामुळे पुरातत्व खात्यासमोर संशोधनाचे आव्हान उभे ठाकले आहे.

पुरातत्व खात्याच्या येथील कार्यालयाचे अधीक्षक डॉ. एस.के.मित्रा यांनी ही माहिती दिली. हे चित्र नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका पुस्तकात प्रसिद्ध करण्यात आले आहे. सन सतराशेमध्ये हे चित्र काढण्यात आले आहे. जलरंगांचा वापर करून ते रंगविण्यात आले आहे. त्या चित्रात सध्या अस्तित्वात असलेल्या मिनाराच्या दक्षिणेस हा दुसरा मिनार दर्शविण्यात आला आहे. चित्रकाराचे नाव मात्र समजू शकले नाही. 

सध्याचा चारमिनार पंधराव्या शतकात अल्लाउद्दीन खिलजीने बांधलेला आहे. इराणी पद्धतीने बांधलेल्या या मिनाराची उंची 63 मीटर आहे. या मिनाराचा बुंध्याजवळचा परीघ २१ मीटरचा असून,  वरच्या बाजूने मिनार निमुळता होत गेलेला आहे. चार मजल्यांच्या या मिनारास आतून गोलाकार जिना आहे. प्रत्येक मजल्यावर सज्जा आहे. 

याच पद्धतीने दुसरा मिनार उभारलेला या चित्रात दर्शविण्यात आला आहे; परंतु हा मिनार किल्ल्यासमोर अस्तित्वात असल्याची काहीही चिन्हे,  खुणा किंवा अवशेष सध्या उपलब्ध नाहीत.  त्यामुळे हा मिनार नेमका होता की नाही,  होता तर कोठे बांधण्यात आला होता,  तो कोणी बांधला, तो मिनार उद्ध्वस्त होण्याची कारणे कोणती, आदी अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

सकाळ : २० नोव्हेंबर २००१
संकलन - प्रा. र. भ. वनारसे
अंजली रणदिवे  यांनी हा लेख टंकित करून युनिकोडमध्ये उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे शतशः आभार.

#जुनेलेख



Monday, December 5, 2016

ओळख तिकीटांची / नवी दिल्लीतील स्मारके

मराठीत छापील स्वरूपातील माहिती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, ती माहिती आंतरजालावर युनिकोड स्वरूपात उपलब्ध करून देणे हा ज्ञानभाषा मराठी समूहाच्या #मराठीयुनीकोडिंग उपक्रमाचा उद्देश आहे. तुमच्याकडे देखील अशी जुनी, कोणत्याही विषयावरील ज्ञानवर्धक माहिती उपलब्ध असेल तर ९०५२३४४४७६ या क्रमांकावर संपर्क साधा.

या उपक्रमातील तिसरा लेख :
___________

ओळख तिकीटांची / नवी दिल्लीतील स्मारके

तिकीट लावून टपाल पाठवण्याची व्यवस्था सुरु झाली तेव्हा जगातले पहिले तिकिट  इंग्लैंड मध्ये  'पेनी ब्लॅक' नावाने  ६ में १८४०  रोजी प्रचारात आले  तर भारतात इंग्रजी राजवट असताना सिंध प्रांताचे कमिशनर मि . वार्टल परियर यांनी सिंध प्रांतापुरते 'सिंध डॉक्स' नावाने पहिले टिकिट १८५२ मध्ये काढले . हे केवळ भारतातील नव्हे तर संपूर्ण आशिया खंडातले पहिले तिकिट ठरले . पहिले अखिल भारतीय तिकिट १८५४ मध्ये अर्ध्या आण्याने निळ्या रंगाचे तिकिट छापण्यात आले . त्यावर व्हिक्टोरिया राणीचे चित्र होते त्यानंतर १ आणा , २ आणा व 4 आण्याची तिकिटे छापण्यात आली.

१८५६ पासून १९२६ पर्यंत भारतीय तिकीटांची छपाई लंडन मध्ये होत असे . १९२८ मध्ये नाशिक येथे सिक्युरिटी प्रेस स्थापन झाल्यावर तेथे भारतीय तिकीटांची छपाई सुरु झाली . प्रारंभी राज्यकर्त्यांची छायाचित्राची तिकिटे छापली जात असत . १९३१ मध्ये नवी दिल्ली ही भारताची राजधानी म्हणून जाहीर झाल्यावर दिल्लीतील अनेक दृष्ये व स्मारके दाखवणारी अनेक तिकिटे छापण्यात आली . १९३५ मध्ये पंचम जॉर्ज बादशहा यांचा रौप्य महोत्सव होता . त्यानिमित्त पुन्हा अशा प्रकारची तिकिटे छापण्यात  आली . त्यानंतर पहिले महायुद्ध संपले या आनंदाप्रित्यर्थ १९४६ मध्ये चार तिकीटांचा एक संग्रह छापण्यात आला.

लेखक आणि वर्तमानपत्राचे संदर्भ मिळाले नाहीत
संकलन - सुनिता भाईदास पवार
टीप:-हा लेख सुनिता भाईदास पवार यांनी टंकीत केल्याबद्दल त्यांचे आभार.

#जुनेमराठीलेख




Thursday, December 1, 2016

डोळस विज्ञान

मराठीत छापील स्वरूपातील माहिती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, ती माहिती आंतरजालावर युनिकोड स्वरूपात उपलब्ध करून देणे हा ज्ञानभाषा मराठी समूहाच्या #मराठीयुनीकोडिंग उपक्रमाचा उद्देश आहे. तुमच्याकडे देखील अशी जुनी, कोणत्याही विषयावरील ज्ञानवर्धक माहिती उपलब्ध असेल तर ९०५२३४४४७६ या क्रमांकावर संपर्क साधा.

या उपक्रमातील दुसरा लेख :
_____________________________

Thursday,December 1,2016

*डोळस विज्ञान*

*वैज्ञानिक अज्ञानाचा बळी "प्लॅस्टर ऑफ पॅरिस "*

वाहनांचा धूर कमी करणे, नदीकाठ स्वच्छ ठेवणे, ओला सुका कचरा, गांडूळ खत, पाण्याची काटकसर एवढ्यासाठी कधीतरी शाळा - कॉलेज मधील मुलांना घेऊन फेऱ्या, जलदिंडी हे सारे प्रकार केले म्हणजेच पर्यावरण रक्षण असेच आता सर्वाना वाटू लागले आहे. दुर्दैवाने या सध्या गोष्टीतही शास्त्रीय डोळस दृष्टीवर पट्टी बांधून, अज्ञानाचा बुरखा पांघरून, शास्त्र व शास्त्रज्ञाला अशा मोहिमांत थारा न दिल्याने डोळस पर्यावरण सामान्य माणसांपर्यंत पोचवणे अत्यंत अवघड झाले आहे.

याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे साप. ' साप म्हणून भुई बुडवून प्लॅस्टर ऑफ पॅरीस विषयी पसरवलेला अंधसमज व वैज्ञानिक अज्ञानाने घेतलेला अत्यंत उपयुक्त पदार्थाचा बळी. प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे केमिकल नसून, नैसर्गिक खजिनाचाच भाग आहे. तो मातीइतकाच किंबहुना मातीपेक्षा जास्त उपयुक्त पर्यावरणप्रेमी पर्यावरण रक्षक, आरोग्यहितकारी, आरोग्यरक्षक आहे.
प्लॅस्टर ऑफ पॅरिस चा उपयोग इतिहासाला नऊ हजार वर्षांपासून अंत्तोलिया, सीरिया, येथे आढळला. पाच हजार वर्षांपूर्वी इजिप्त मध्ये तेथील वास्तुशास्त्रज्ञानी या खनिजाचा उपयोग 'पिरॅमिड' च्या बांधकामात सढळ हातांनी केलाच; पण विशेषतः तेथील शिल्पकारांनी पाच हजार वर्षांपूर्वी त्याचा उपयोग असंख्य पुतळे निर्माण करण्यासाठी केला, छतासाठी केला. प्लॅस्टर ऑफ पॅरिस मध्ये अनेक रंगछटाही आहेत. निसर्गात प्रकाश आरपार जाणारे प्लॅस्टर ऑफ पॅरिस मिळते, त्यापासून ग्रीक लोकांनी घराच्या खिडक्या बनवल्या . इतके जुने हे प्लॅस्टर ऑफ पॅरिस आहे.

हे खनिज मातीसारखे समुद्र पाणी व जलाशय यांचा ज्या ज्या प्रदेशात संपर्क येतो , तेथे त्याची बाष्पीभवनामुळे निर्मिती होते. त्यांच्या खाणी जगभर आहेत. या खनिजाला रासायनिक भाषेत 'जिप्सम' म्हणतात. त्याचा रासायनिक फॉर्म्युला CaSO4, 2H2O, कॅल्शिअम सल्फेट डायहायट्रेट हा आहे. हे पांढऱ्या, गुलाबी, राखी, करड्या रंगात सागरतळ्यात मिळु शकते.

जेव्हा या जिप्समला नैसर्गिक वा कृत्रिम उष्णता दिली जाते, तेव्हा याच्यातील दोन टक्के पाण्यातील अंश अर्ध्या टक्क्यावर येतो, याला कॅल्शिअम सल्फेट हेमिहायड्रेट Caso4, 1/2 H2O म्हणतात. मग या मातीत प्रचंड लवचिकता निर्माण होते. हहेच ते " प्लॅस्टर ऑफ पॅरिस" अशा मातीत परत तीन भाग पाणी शोषले अथवा कृत्रिमरीत्या टाकले, तर परत त्या मातीचे रूपांतर जिप्सममध्येच होते. म्हणजे नैसर्गिक पदार्थातच होते. थोडक्यात ' मातीत असशी मातीत मिळशी' असेच या खनिजाचे रुपरंग आहे, जे पर्यावरण प्रेमीच आहे.

हे जाणून इसवीसन 1700 मध्ये फ्रेंच लोकांनी लाकडाच्या भिंती, तक्तपोशी यांचे आगीपासून संरक्षण करण्यासाठी या खनिजाचा प्रचंड उपयोग केला. शिवाय अनेक कलाकुसर, पुतळ्यासाठीही याचा उपयोग केला.

फ्रेंचांचे सुदैवाने हे ' जिप्सम' खनिज पॅरिस जवळ प्रचंड प्रमाणात त्यांना सापडले. ते इतके की जगभर ते प्लॅस्टर ऑफ पॅरिस या नावानेच पुढे ओळखले जाऊ लागले व त्याचा वापर होऊ लागला.

*लेखक:-डॉ. प्रमोद मोघे- वरिष्ठ शास्त्रज्ञ*

*सकाळ,१५ सप्टेंबर,२०१२*

*संकलन:-प्रा.र.भ.वनारसे*

*टीप:-हा लेख सौ.ऋतुजा कुलकर्णी यांनी टंकीत केल्याबद्दल त्यांचे आभार.*

*#जुनेमराठीलेख*

Monday, November 28, 2016

गंजिफा - साधना गोरे

राजेशाही थाटात आणि राजेशाही पद्धतीने खेळला जाणारा पत्त्यांचा खेळ, पण याला जुगार म्हणून नका.

सद्यस्थितीत केवळ भारतातूनच नाही तर पत्त्यांप्रमाणे सर्वाधिक प्रमाणात खेळला जाणारा खेळ म्हणजे गंजिफा! गंजिफा हि युरोपची देणगी मानली जाते. जवळ जवळ एक हजार वर्षे प्राचीन असलेल्या गंजीफाची भारतात सुरुवात नेमकी कधी आणि कुठे झाली याविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही. काही जणांच्या मते मोगल सम्राट बाबर याच्या काळात भारतात गंजीफाचं आगमन झालं. या मताचा पुष्ट्यर्थ असं सांगितलं जातं की बाबरच्या काळात गंजीफाची सुरुवात झाल्यामुळे बाबरनामा काबुल-ए-इस्लाम, आइना-ए-अकबरी, गिरीधर यांच्या 'गंजीफाचा खेळ' या पुस्तकांमधून या खेळाचा उल्लेख आढळतो.

खेळात डावावर पैसे लावण्याची भारतात प्राचीन काळापासून परंपरा आहे. 'गंजिफा' मधला गंज शब्द दौलत, पैसा, धन या अर्थानेच आहे. या खेळात वापरण्यात येणारे पत्ते वर्तुळाकार असतात आणि त्यावर उत्कृष्ट चित्र रंगवलेली असतात. प्रत्यक्षात 'मिनी मिनिएचर' च्या स्वरूपातील या चित्रांमध्ये रंग व रेषांची मिसळण नजर खिळवणारी असते. प्राचीन काळी हस्तिदंत, कासवांचे  कवच, मोती तसेच मौल्यवान धातूपासून गंजिफा बनवल्या जात. जयपुरात नक्षीकाम केलेल्या पितळेच्या ताटल्यांचे गंजिफा लोकप्रिय होते. मात्र कागदापासून बनवलेले पत्तेच सर्वाधिक वापरात असतात. गंजीफाला म्हैसूर भागात 'चाडा' असे म्हणतात तर उत्तर भारतात हा खेळ 'छंद' वा कलम म्हणून ओळखला जातो. श्रीमंत असामींसाठी मौल्यवान, महागड्या सामग्रीपासून बनवलेल्या गंजीफांना दरबार कलम म्हणत. त्यावर अतिशय सुबक पद्धतीने बारीक चित्रे रेखाटलेली असतात आणि सुंदर नक्षीदार अशा पेट्यांमधून त्यांची विक्री करण्याची पद्धत होती.

सर्वसाधारण लोकांमध्ये प्रचलित असलेल्या कागदाच्या गंजिफांच्या निर्मिती संदर्भात राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे गंजिफा कलावंत अरुण उदय महापात्र म्हणाले की, "कागदी गंजिफा बनवण्यासाठी सुती कापडावर चिंचेचा दोन-तीन वेळा लेप केला जातो. नंतर ते उन्हात वाळवून खडूची पावडर आणि चिंच यांच्या लेपणे त्यावर कोटिंग केलं जातं. त्यानंतर गुळगुळीत दगडावर घासून वर्तुळाकार कापले जातात. त्यानंतर त्यावर चित्रमय सजावट करण्यात येते." असे सांगतात की मुघलांच्या काळात अंतःपुरात वेळ घालवण्यासाठी उत्तम साधन म्हणून गंजीफाचा वापर होत  असे. त्यावेळी एका थप्पीत ९६ पत्ते असत. आता हा खेळ १४४ पत्त्यांनी खेळला जातो. पूर्वी हे आठ गटात प्रत्येकी बारा असे विभागले जात. 'आइना-ए-अकबरी' या हमिठात वर्णन केलेल्या पत्त्यांच्या प्रकारांची काही नावं अशी - अश्वपती, गजपती, नृपती, गृहपती, दलपती, धनपती, नावपती, तिपती, सुरपती, असुरपती, वनपती, अहिपती इ. याशिवाय दरबारातील वेगवेगळ्या विभागांसाठी इतर गंजिफा पत्तेही प्रचलित होते. आता गंजीफाच्या स्वरूपात बदल करून त्यावर देवदेवतांची चित्रे रेखाटली जाऊ लागली आहेत. गंजीफाच्या या भारतीय प्रकाराविषयी 'दशावतार गंजिफा' या पुस्तकात तपशीलवार माहीती मिळते. दशावतारात १२० पत्ते असतात. ते प्रत्येकी १२ असे १० गटात विभागलेले असतात. विष्णूच्या अवतारांची चित्र रेखाटलेले हे पत्ते मासा, कासव, वराह नृसिंग, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध वा कलकीझ राजा, प्रधान आणि एक्का असे ओळखतात.

साधारणपणे गंजिफा बनवण्यासाठी वापरण्यात येणारे रंग म्हणजे भुरकट हिरवा, काळा, पिवळा आणि लाल हे असतात. परंतु ओरिसात १६ रंगाचे गंजीफे बनवले जातात. तेथील लोक यालाच परिपूर्ण गंजिफा म्हणतात. १४४ पत्त्यांनी चौघांनी मिळून गंजिफा खेळता येतो. प्रत्येकाजवळ आपले चार-चार पत्ते असतात. नंतर सगळे आपले पत्ते खाली ठेवून एकएक पत्ता काढतात. ज्याच्या जवळ राजा, मंत्री आणि हुकमाचं पान येईल तो जिंकतो. कसबी चित्रकारांनी कौशल्याने चितारलेले हे पत्ते आजकाल परदेशात अधिक लोकप्रिय आहेत. परंतु भारतात मात्र केवळ पत्त्यांचा खेळ असा याबाबत दृष्टिकोन निर्माण झाल्याने भारतातून हा कलात्मक खेळ हळूहळू मृतवत होऊ लागला आहे. पुढील पिढीला गंजीफाची ओळख करून द्यायची असेल तर हा खेळ जिवंत ठेवणं नितांत गरजेचं आहे.

लेखिका - साधना गोरे, गृहशोभिका - १९९७
संकलक - प्रा. र. भ. वनारसे
टीप - हा लेख श्री. वैभव तुपे यांनी टंकित केला आहे.