राजेशाही थाटात आणि राजेशाही पद्धतीने खेळला जाणारा पत्त्यांचा खेळ, पण याला जुगार म्हणून नका.
सद्यस्थितीत केवळ भारतातूनच नाही तर पत्त्यांप्रमाणे सर्वाधिक प्रमाणात खेळला जाणारा खेळ म्हणजे गंजिफा! गंजिफा हि युरोपची देणगी मानली जाते. जवळ जवळ एक हजार वर्षे प्राचीन असलेल्या गंजीफाची भारतात सुरुवात नेमकी कधी आणि कुठे झाली याविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही. काही जणांच्या मते मोगल सम्राट बाबर याच्या काळात भारतात गंजीफाचं आगमन झालं. या मताचा पुष्ट्यर्थ असं सांगितलं जातं की बाबरच्या काळात गंजीफाची सुरुवात झाल्यामुळे बाबरनामा काबुल-ए-इस्लाम, आइना-ए-अकबरी, गिरीधर यांच्या 'गंजीफाचा खेळ' या पुस्तकांमधून या खेळाचा उल्लेख आढळतो.
खेळात डावावर पैसे लावण्याची भारतात प्राचीन काळापासून परंपरा आहे. 'गंजिफा' मधला गंज शब्द दौलत, पैसा, धन या अर्थानेच आहे. या खेळात वापरण्यात येणारे पत्ते वर्तुळाकार असतात आणि त्यावर उत्कृष्ट चित्र रंगवलेली असतात. प्रत्यक्षात 'मिनी मिनिएचर' च्या स्वरूपातील या चित्रांमध्ये रंग व रेषांची मिसळण नजर खिळवणारी असते. प्राचीन काळी हस्तिदंत, कासवांचे कवच, मोती तसेच मौल्यवान धातूपासून गंजिफा बनवल्या जात. जयपुरात नक्षीकाम केलेल्या पितळेच्या ताटल्यांचे गंजिफा लोकप्रिय होते. मात्र कागदापासून बनवलेले पत्तेच सर्वाधिक वापरात असतात. गंजीफाला म्हैसूर भागात 'चाडा' असे म्हणतात तर उत्तर भारतात हा खेळ 'छंद' वा कलम म्हणून ओळखला जातो. श्रीमंत असामींसाठी मौल्यवान, महागड्या सामग्रीपासून बनवलेल्या गंजीफांना दरबार कलम म्हणत. त्यावर अतिशय सुबक पद्धतीने बारीक चित्रे रेखाटलेली असतात आणि सुंदर नक्षीदार अशा पेट्यांमधून त्यांची विक्री करण्याची पद्धत होती.
सर्वसाधारण लोकांमध्ये प्रचलित असलेल्या कागदाच्या गंजिफांच्या निर्मिती संदर्भात राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे गंजिफा कलावंत अरुण उदय महापात्र म्हणाले की, "कागदी गंजिफा बनवण्यासाठी सुती कापडावर चिंचेचा दोन-तीन वेळा लेप केला जातो. नंतर ते उन्हात वाळवून खडूची पावडर आणि चिंच यांच्या लेपणे त्यावर कोटिंग केलं जातं. त्यानंतर गुळगुळीत दगडावर घासून वर्तुळाकार कापले जातात. त्यानंतर त्यावर चित्रमय सजावट करण्यात येते." असे सांगतात की मुघलांच्या काळात अंतःपुरात वेळ घालवण्यासाठी उत्तम साधन म्हणून गंजीफाचा वापर होत असे. त्यावेळी एका थप्पीत ९६ पत्ते असत. आता हा खेळ १४४ पत्त्यांनी खेळला जातो. पूर्वी हे आठ गटात प्रत्येकी बारा असे विभागले जात. 'आइना-ए-अकबरी' या हमिठात वर्णन केलेल्या पत्त्यांच्या प्रकारांची काही नावं अशी - अश्वपती, गजपती, नृपती, गृहपती, दलपती, धनपती, नावपती, तिपती, सुरपती, असुरपती, वनपती, अहिपती इ. याशिवाय दरबारातील वेगवेगळ्या विभागांसाठी इतर गंजिफा पत्तेही प्रचलित होते. आता गंजीफाच्या स्वरूपात बदल करून त्यावर देवदेवतांची चित्रे रेखाटली जाऊ लागली आहेत. गंजीफाच्या या भारतीय प्रकाराविषयी 'दशावतार गंजिफा' या पुस्तकात तपशीलवार माहीती मिळते. दशावतारात १२० पत्ते असतात. ते प्रत्येकी १२ असे १० गटात विभागलेले असतात. विष्णूच्या अवतारांची चित्र रेखाटलेले हे पत्ते मासा, कासव, वराह नृसिंग, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध वा कलकीझ राजा, प्रधान आणि एक्का असे ओळखतात.
साधारणपणे गंजिफा बनवण्यासाठी वापरण्यात येणारे रंग म्हणजे भुरकट हिरवा, काळा, पिवळा आणि लाल हे असतात. परंतु ओरिसात १६ रंगाचे गंजीफे बनवले जातात. तेथील लोक यालाच परिपूर्ण गंजिफा म्हणतात. १४४ पत्त्यांनी चौघांनी मिळून गंजिफा खेळता येतो. प्रत्येकाजवळ आपले चार-चार पत्ते असतात. नंतर सगळे आपले पत्ते खाली ठेवून एकएक पत्ता काढतात. ज्याच्या जवळ राजा, मंत्री आणि हुकमाचं पान येईल तो जिंकतो. कसबी चित्रकारांनी कौशल्याने चितारलेले हे पत्ते आजकाल परदेशात अधिक लोकप्रिय आहेत. परंतु भारतात मात्र केवळ पत्त्यांचा खेळ असा याबाबत दृष्टिकोन निर्माण झाल्याने भारतातून हा कलात्मक खेळ हळूहळू मृतवत होऊ लागला आहे. पुढील पिढीला गंजीफाची ओळख करून द्यायची असेल तर हा खेळ जिवंत ठेवणं नितांत गरजेचं आहे.
लेखिका - साधना गोरे, गृहशोभिका - १९९७
संकलक - प्रा. र. भ. वनारसे
टीप - हा लेख श्री. वैभव तुपे यांनी टंकित केला आहे.