मराठीत छापील स्वरूपातील माहिती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, ती माहिती आंतरजालावर युनिकोड स्वरूपात उपलब्ध करून देणे हा ज्ञानभाषा मराठी समूहाच्या #मराठीयुनीकोडिंग उपक्रमाचा उद्देश आहे. तुमच्याकडे देखील अशी जुनी, कोणत्याही विषयावरील ज्ञानवर्धक माहिती उपलब्ध असेल तर ९०५२३४४४७६ या क्रमांकावर संपर्क साधा.
या उपक्रमातील तेरावा लेख :
संभाजी राजे कैदी कसे झाले?
---------------------------------
संभाजी महाराजांच्या अविश्रांत युद्ध कारवाया पाहून साहजिकच प्रश्न पडतो कि एवढा रणझुंजार व धोरणी सेनानी मोगलांचा कैदी कसा झाला? संभाजीराजे सतत दहा वर्षे अखंड लढत राहिले. असे असतांना शत्रूने अचानक झडप कशी घातली?
- संभाजी महाराजांच्या तीनशेव्या पुण्यतिथी निमित्त वेगळा प्रकाश टाकणारा लेख.
एखादा माणूस दुर्दैवी आहे असे आपण अनेकदा म्हणतो ते सर्वार्थाने खरे असते म्हणूनच! तसे नसते तर संभाजीराजे मोगलांचे कैदी झाले हि एकच गोष्ट गेली तीनशे वर्षे जनमानसात टिकून राहिली नसती. १६८० मध्ये शिद्दीच्या ताब्यातील मुंबई जवळील उंदेरी बेटावर निकराचा हल्ला चढवणाऱ्या आणि पुढील जवळजवळ दहा वर्षे शिद्दी. पोर्तुगीज आणि मोगल सम्राट औरंगझेब या तीन शत्रुंविरुद्ध उसंत न घेता प्रभावी संघर्ष चालू ठेवणारे संभाजीराजे मोगलांचे कैदी झाले. पण हि एकच गोष्ट मराठ्यांच्या इतिहासातील या प्रकरणात लोकांच्या लक्षात राहिली.
एकदा युद्ध सुरु झाले म्हणजे वरिष्ठ सेनापती एकतर शत्रूवर मात करून विजयी होतो नाहीतर स्वीडनचे रणझुंजार राजे गुस्टाव्हस अडोल्फस यांच्याप्रमाणे मृत्यूला कवटाळून शहीद होतो किंवा नेपोलियन प्रमाणे शत्रूचा कैदी होतो. युद्ध हा खेळाचाच एक भाग आहे. पण संभाजीराजांच्या बाबतीत असे म्हटले जाते कि कैदी झाले त्यावेळी ते मद्यपानात गर्क होते. हा लोकप्रवाद म्हणजे त्या दुर्दैवी छत्रपतीचा आणखी घोर अवमान! प्रत्यक्ष युद्ध परिस्थितीचा आढावा घेतल्यास आणि त्या परिस्थितीचे लष्करी मूल्यमापन केल्यास हा आरोप निराधार असल्याचे व इंग्रज आणि इस्लामी इतिहासकारांच्या पूर्वग्रहदुषित मतांवरच उभारला असल्याचे स्पष्ट होते. फारतर एवढेच म्हणता येईल मुकर्रबखान या मोगल सेनापतीचा युद्धव्यवहार संभाजी राजांच्या अंदाजावार मात करणारा ठरला. ऑगस्ट १६८० ते मार्च १६८९ पर्यंतच्या संभाजी महाराजांच्या अविरत लष्करी कार्यावाहीचा तपशीलवार आढावा व लष्करी मूल्यमापन आमच्या अभ्यासकेंद्रात करण्यात आलेले आहे. आणि जवळजवळ एक स्वतंत्र ग्रंथ होईल इतके ते विस्तृत आहे. आजच्या लेखात संभाजी राजांच्या युद्ध कारवायांचा आढावा घेवून संगमेश्वर मुक्कामी ते संभाजीराजे मोगलांचे कैदी कसे झाले याच मुद्द्यांवर जास्त भर देण्यात आला आहे.
शिद्दीविरुद्ध संघर्ष :- शिवछत्रपतींच्या निधनानंतर ज्या परिस्थितीत संभाजी राजांनी मराठी सत्तेची सूत्रे हाती घेतली, त्या परिस्थितीत त्यांना बाह्य आणि अंतर्गत धोके निर्माण होणे हि गोष्ट अटळ होती. १६८० च्या उत्तरार्धात पश्चिम किनार्यावर असणाऱ्या शिद्दीने विरुद्ध आक्रमक हालचाली करण्यास प्रारंभ केला. त्यामुळे या शत्रूला प्रथम आवर घालणे आवश्यक होते. शिद्दीवरील स्वारीची पूर्वतयारी म्हणून उंदेरी या छोट्या बेटावर प्रथम हल्ला करण्याचे संभाजीराजांनी ठरवले. त्याप्रमाणे नागोठाणे येथे असलेल्या जवळजवळ तीन हजार सैनिक व २२ गलबते यांच्या एका मराठी काफिल्याने ऑगस्ट १६८० मध्ये उंदेरीवर हला चढवला, परंतु शिद्दीने हा हल्ला परतवून लावला. या अपयशाने खचून न जाता ७ जुलै १६८१ च्या पाहते मराठी आरमाराने उंदेरीवर दुसरा हल्ला चढविला. हा हल्लाही अयशस्वी झाला.
दंडराजपुरीस वेढा :- उंदेरीवरील दोन हल्ले अयशस्वी झाल्यामुळे संभाजीराजांनी आपले लक्ष दंडराजपुरी या शिद्दीच्या दुसर्या सागरी केंद्राकडे वळवले. सागरी बाजूने हल्ल्याची सुरुवात न करता मराठी मुलखातून पुढे सरसावून ऑक्टोबर १६८१ मध्ये मराठी सैन्याने दंडराजपुरीस वेढा घातला आणि सतत १५ दिवस तोफखान्याचा भडीमार करून किल्ल्याच्या भिंती जमीनदोस्त केल्या. आपल्या ठाण्याचा बचाव करणे अशक्य आहे, हि जाणीव झाल्यावर शिद्दीने दंड्याहून माघार घेवून जंजिरा या आपल्या मुख्य ठाण्याचा आश्रय घेतला. हे सर्व चालू असतांनाच शिद्दीने चौलपासून पनवेल पर्यंत आपले हल्ले चालूच ठेवले. त्यामुळे शिद्दीवरील निर्णायक टप्पा कार्यान्वित करणे जरूर होते. डिसेंबर १६८१ च्या अखेरीस वीस हजार सैनिक बरोबर घेवून संभाजी राजांनी स्वतःच्या नेतृत्वाखाली जंजिऱ्यावर चढाईस प्रारंभ केला. मराठी तोफखान्याने हल्ला सुरु करून लढाईस तोंड फोडले, पण मुख्य अडचण अशी होती कि, समुद्रात असलेला जंजिरा किल्ला आणि मुख्य प्रवेशाच्या तोंडावर असलेली मराठी सेना यांच्यामधील किनारपट्टीवर शिद्दीची जहाजे गस्त घालीत होती. त्यामुळे नुकसान सोसूनही परतीकर करणे शिद्दीस शक्य होते. हि अडचण दूर करून कोंडी फोडण्याच्या दृष्टीने संभाजी राजांनी एक धाडसी प्रयोग करण्याचे ठरवले. जंजिऱ्याचा किल्ला आणि मराठी ठाणी यांमध्ये असलेली छोटीशी खाडी भरून काढण्यासाठी मोठमोठ्या शिळा, दगड, खाडी, वृक्षांचे बुंधे व फांद्या हेसार्व जल मार्गात टाकले. मराठी सेनेला किल्ल्याच्या प्रत्यक्ष भिंतीपर्यंत पोहचता यावे हा उद्देश होता. या सर्व कामावर संभाजी राजांनी स्वतः देखरेख ठेवली होती. सैनिकांचे मनोधैर्य वाढावे म्हणून किल्ला सर झाल्यास प्रत्येक सैनिकाला अर्धा शेर सोने व चांदीची कडी त्यांनी देवू केली. एवढ्या निश्चयपूर्वक केलेल्या तयारीनंतर जंजिरा किला हस्तागतही झाला असता, परंतु याच सुमारास मोगल सरदार हसन अलीखान याने कल्याण भिवंडीवर चाल करून दोन्ही गावांना वेढा घातला असल्याचे वृत्त येवून धडकले. त्यामुळे जंजिऱ्याची मोहीम दुय्यम सेनापतीवर सोपवून राजांनी आपल्या सैन्याची जमवाजमव केली. निवडक सैनिकांना घेवून ते हसन अलीच्या पारीपत्यासाठी रवाना झाले व जंजिरा अजिंक्यच राहिला.
पोर्तुगीजांशी संघर्ष :- संभाजी राजांच्या काळात दीव-दमण पासून गोव्यापर्यंत सुमारे ९०० किलोमीटर लांबीच्या पश्चीम किनारपट्टीवर पोर्तुगीजांची नाविक सत्ता अबाधित होती. शिवाजी महाराजांचे पोर्तुगीजांशी असलेले मित्रत्वाचे संबंध कायम ठेवण्यासाठी संभाजी राजांनीही रायजी पंडित नावाचा आपला वकील गोव्याच्या व्हॉईसरॉय कडे रवाना केला. परंतु १६८१ मध्ये औरंगझेब बादशहा दक्षिणेत उतरल्याची आणि त्याने शिद्दी व पोर्तुगीज या दोन मराठा विरोधी सत्तांशी हातमिळवणी केल्याची खबर संभाजीराजांना कळली. त्यामुळे पोर्तुगीजांवर नजर ठेवण्याच्या दृष्टीने गोव्यापासून दक्षिणेकडे कारवार जवळ असलेल्या अंजदीव या बेटावर हल्ला करून ते ताब्यात घेण्याचे त्यांनी ठरवले. मराठा आरमाराच्या एका तुकडीने ते १६८२ मध्ये ताब्यात घेतलेही. परंतु पोर्तुगीजांनी प्रतिकारात्मक कारवाई करताच डिचोली ठाण्याचा सुभेदार शिवाजी विनायक यास पोर्तुगीजांच्या पॉलो या बेटावर हल्ला करण्याचे आदेश संभाजीराजांनी दिले. मोगल आणि पोर्तुगीज त्यांची युती मोडून काढली नाही तर मराठी राज्याला धोके निर्माण होतील हे लक्षात घेऊन संभाजी राजांनी आक्रमक पवित्रा घेण्याचे ठरवले. त्यादृष्टीने कुंडलिका खाडीच्या काठावर आणि रेवदंड्यास पूर्वेस चौल नावाचे पोर्तुगीजांचे लष्करी, नाविक व व्यापारी केंद्र होते, तिकडे ते गेले. मे १६८२ मध्ये मराठ्यांनी चौलच्या किल्ल्यास वेढा घातला. परंतु पोर्तुगीजांचा प्रतिकार प्रभावी ठरल्यामुळे तेथून माघार घेऊन रेवदंड्याच्या दक्षिणेस असलेल्या कोरलाई या ठाण्यावर हल्ला केला. कोरवाईच्या बचावासाठी चौलमधून कुमक पाठवली गेली. त्याचा फायदा घेऊन २२ जुलै १६८२ ला निळो मोरेश्वर या मराठी सरदाराने चौलवर दुसरा हल्ला चढवला. परंतु पोर्तुगीज तोफखान्याविरुद्ध तो अयशस्वी झाला. आक्रमक कारवाई सातत्याने करण्यासाठी संभाजी राजांनी जानेवारी १६८३ मध्ये डहाणूच्या दक्षिणेस असलेली तारापूर व माहीम हि ठाणी ताब्यात घेतली. हि खबर मिळताच औरंगझेबने बहाद्दरखानास रवाना केले. त्याने तारापूर व माहिमवर हल्ला करून ती परत मिळवली. या घटना घडल्या तरी राजांनी आपल्या धोरणात कोणताही बदल केला नाही. उलट १५ एप्रिल १६८३ ला ५००० पायदळ व १००० घोडेस्वार घेऊन राजे स्वतः मैदानात उतरले व तारापूरवर जोरदार हल्ला करून त्यांनी ते पुन्हा ताब्यात घेतले. चढाईचा वेग कायम ठेवण्यासाठी तारापूर हे स्ट्रॉंग पॉईंट बनवून त्यांनी मराठी तुकड्या डहाणू, दमन आणि वसईकडे रवाना केल्या. हे झाल्यावर ऑक्टोबर १६८३ मध्ये ८००० ची एक ताजी तुकडी घेऊन संभाजीराजे स्वतः चौलच्या परिसरात दाखल झाले. मराठी मुलखातून चौलची नाकेबंदी करून मराठी तोफखाना चौलच्या किल्ल्यावर आग ओकू लागला. शेकडो पोर्तुगीज अधिकारी व सैनिक चौलमधून बाहेर पडले व त्यांनी मुंबई व गोव्याची वाट धरली. मराठ्यांच्या या आक्रमक कारवायांमुळे त्यांचे लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी गोव्याच्या व्हॉईसरॉयने मराठ्यांच्या ताब्यात असलेल्या फोंडा किल्ल्यावर हल्ला करण्याचे ठरवले.
किल्ल्याचा बचाव :- १ मे १६८३ ला पोर्तुगीज सेना फोंड्याच्या परिसरात दाखल झाली. फोंड्याचा किल्लेदार येसाजी कंक आणि त्यांचे पुत्र कृष्णाजी कंक यांनी केवळ ६०० सैनिकांच्या मदतीने किल्ल्याचा बचाव सुरु केला. संभाजीराजांचे या घटनांकडे बारकाईने लक्ष होते. किल्ला फार काळ लढवला जाणार नाही म्हणून ४-११-१६८३ ला त्यांनी ३००० सैनिकांची एक ताजी तुकडी फोंड्याकडे पाठवली. या तुकडीस पोर्तुगीजांनी अडवले. हि बातमी येताच राजे स्वतः फोंड्याकडे निघाले. त्यांनी ही तुकडी स्वतःच्या नेतृत्वाखाली घेतली आणि आजूबाजूस पोर्तुगीज सैन्य आणि तोफा असतांना त्यांच्या देखत किल्ल्यात प्रवेश केला. पोर्तुगीजांनी माघार सुरु केली या माघारीत डॉम रॉड्रिगो डिकोस्टा हा पोर्तुगीज सेनानी मारला गेला व त्याच्या सैन्याने पणजीची वाट धरली. पोर्तुगीजांना समूळ नष्ट करावे म्हणून पंधरा हजार पायदळ आणि सात हजार स्वार बरोबर घेऊन संभाजीराजे स्वतः गोव्याच्या स्वारीवर निघाले. प्रथम त्यांनी मांडवी नदीच्या मध्ये असलेल्या जुवे बेटावर हल्ला करून ते ताब्यात घेतले आणि प्रत्यक्ष पणजीवर हल्ला करण्याची तयारी सुरु केली. एवढ्यात मांडवीला अचानक पूर आला त्यामुळे कारवाई स्थगित झाली. याच सुमारास म्हणजे १६८३ च्या प्रारंभी पोर्तुगीज आरमाराने आग्वाद, कलंगूठ व मडगाव या मोक्याच्या ठिकाणी येऊन मराठ्यांची नाकेबंदी करण्यास सुरुवात केली. अशा परिस्थितीत पुढे काय करावे असा विचार चालू असतांनाच औरंगझेब पुत्र शहा अलम भारी सेना घेऊन दक्षिणेत उतरल्याची खबर आली. त्यामुळे पोर्तुगीजांशी तहाची बोलणी करण्यासाठी आपला वकील पाठवून राजे महाराष्ट्राकडे निघाले.
मोगलांविरुद्ध संघर्ष :- शिवाजी महाराजांच्या निर्वाणानंतर (३ एप्रिल १६८०) राजपुतांबरोबरच्या लढाईत गुंतलेल्या औरंगझेबाने तातडीची कारवाई म्हणून बहाद्दरखानला खान इ जहान असा किताब देवून त्याला दक्षिणेकडे मराठ्यांच्या पारिपत्यासाठी रवाना केले. (मे १६८०) इथपासून ते संभाजी राजांना संगमेश्वर मुक्कामी अटक होईपर्यंत जवळपास १० वर्ष मराठे व मोगल यांचा संघर्ष चालू होता. खुद्द बादशाह प्रथम बऱ्हाणपूर, नंतर औरंगाबाद व नंतर अहमदनगर येथे आपल्या छावण्या बदलत राहिला. त्याच्या हाताखालचे २०-२५ मातब्बर सेनापती व जवळजवळ दोन लाखाची सेना घेवून औरंगझेबने चौफेर लढाई चालू केली. यातून मराठी सत्ता वाचली कशी हेच एक आश्चर्य मानावे लागेल. अशा परिस्थितीत संभाजी राजांनी स्थळ आणि काल यांचा समन्वय साधून जी युद्धनीती वापरली तिला खच्चीकरणाची युद्धनीती (वार ऑफ अटरीशन) असे नाव देता येईल. शत्रूने एखाद्या ठिकाणी हल्ला केल्यास त्याच्या पाठोपाठ प्रतिहल्ले करणे, शातृसेनेचे मनुष्यबळ व साधन सामुग्री यांचे शक्य शक्य तितके नुकसान करणे व शत्रू अनावर होतो आहे असे दिसताच तेथून पद्धतशीर माघार घेवून विरुद्ध दिशेला असलेल्या शत्रुस्थानावर हल्ला चढवणे हि अशा तऱ्हेच्या युद्धनीतीची प्रमुख सूत्रे म्हणून सांगता येतील. १६८० च्या उतरार्धात मोगलांनी नाशिक जवळचा अहिवंत गड घेतला तर मराठ्यांनी आपले चार गट करून एक गट सुरतेकडे, दुसरा बऱ्हाणपूर कडे व तिसरा औरंगाबाद कडे तर चौथा सोलापूर कडे हल्ले करण्यास रवाना केला. १६८१ मध्ये नगर सोलापूर व औरंगाबाद या मोगली किल्ल्यांवर हल्ले करून मोगलांन हैराण केले व शिवाय साल्हेर आणि मुल्हेर व पेडगाव उर्फ बहाद्दरगड हे किल्ले परत मिळवण्यासाठी निकराच्या लढाया दिल्या. १६८२ मध्ये नोगल सरदार हसन अली खान ने दक्षिण कोकणात चढाई करून दाभोळ व राजापूर हे भाग काबीज केले व तो कल्याण भिवंडीकडे वळला. त्याच्या प्रतिकारास संभाजीराजे स्वतः कल्याण भिवंडी कडे गेल्यामुळे हसन अली खानास बादशाहने रामसेजच्या किल्ल्यावर हल्ला करण्याची आज्ञा केली. हा किल्ला ६-७ महिने लढवला गेला व तो हाती येत नाही असे पाहून मोगल सैन्याने औरंगाबादकडे माघार घेतली. इकडे मराठ्यांनी सोलापूर, पंढरपूर, टेंभुर्णी येथील मोगल स्थानकांवर हल्ले करून त्यांची कोंडी केली आन त्याचबरोबर संगमनेर व सिन्नर येथील मोगली स्थानकांवर हल्ले करून त्यांची कोंडी केली आणि त्याच बरोबर संगमनेर व सिन्नर येथील मोगली ठाण्यांवर हल्ले केले. १६८३-८४ मध्ये कासीमखान व सहुल्लाखान यांच्या सेनांनी कल्याण भिवंडीवर पुन्हा हल्ले केल्यामुळे संभाजी राजांचे लक्ष तिकडे वेधले. सुरतेहून येणारी रसद तोडून टाकण्यासाठी त्यांनी मराठी आरमार उरण खाडीत ठेवले. याच वेळी ठाणे जिल्ह्यातील कोथळागड लढविला गेला, परंतु अब्दुल कादर व सहुल्लाखान यांच्या संयुक्त फौजांनी जोरदार हल्ला केल्यामुळे मराठ्यांन माघार घ्यावी लागली. १६८५ मध्ये मोगलांनी साताऱ्याजवळील खटाव येथे आपली छावणी प्रस्थापित केली अशी खबर येताच हंबीरराव मोहित्यांनी खटाव वर हल्ला केला. याचवेळी गझिउद्दिन फिरोजजंग या नोगल सरदारांनी शिरवळ वरून खटाव च्या रक्षणासाठी धडक मारली. त्याबरोबर नागोजी बल्लाळ या मराठी सरदाराने चंदन-वंदन हे मार्गातील किल्ले ताब्यात घेवून गाझीउद्दीनचा मार्ग रोखला. अशा रीतीने १६८० ते ८५ हि सहा वर्षे संभाजीराजांनी मोगल सैन्याला उसंत मिळू दिली नाही.
दक्षिण भारतातील चढाई :- १६८१ च्या उत्तरार्धात मोगलांचे दक्षिण भारतातील आक्रमण रोखण्यासाठी संभाजी राजांनी हरजीराजे महाडिक या मातब्बर मराठी सरदारास २०००० सेना धुवून दक्षिणेकडे रवाना केले. म्हैसूरचा राजा चिक्कदेवराय याने वरकरणी मराठ्यांशी मैत्री दाखवून आतून बादशाहाशी संधान बांधले. दक्षिणेकडे ३२० किलोमीटर धडक मारून मदुरा ताब्यात घेतले. त्यामुळे तंजावर व पश्चिमेकडील त्रीचीनापल्ली आणि पूर्वेकडील नेगापट्ट हि मराठी स्थानके धोक्यात आली. चीक्क्देव्राय व मोगल यांची युती मोडून काढणे आवश्यक असल्यामुळे तीस हजाराचे घोडदल बरोबर घेवून संभाजीराजे स्वतः सातारा, मिरज, हुबळी, धारवाड या मार्गाने चिकमंगरूळ कडे रवाना झाले. म्हैसूरवर हल्ला करण्याच्या दृष्टीने चिक्कदेवरायचा शत्रू मादुरेचा नायक याच्याशी लष्करी करार करून व तंजावरच्या एकोजी राजांच्या तुकड्या घेवून १६८३ च्या जानेवारीत संभाजी राजांनी म्हैसूर च्या पूर्वेस धर्मपुरी येथे आपली छावणी प्रस्थापित केली. ऑक्टोबर ८३ मध्ये संभाजी राजांनी चित्रनापल्ली कडे जाऊन मदुरेचा कब्जा घेतला. व तेथून पूर्वेकडे वळून मद्रासच्या दक्षिणेस असलेल्या मायावरम व पोर्टोनोब्से येथे मराठी अंमल बसविला. या आक्रमक हालचालींमुळे चिक्कदेवरायाने मराठ्यांशी तहाची बोलणी सुरु केली. त्यांच्याशी शस्त्रसंधी करून मध्य महाराष्ट्रात होणाऱ्या मोगली आक्रमणाला थोपविण्यासाठी राजे रायगडला परतले.
शेवटची लढाई :- आतापर्यंत वर्णन केलेल्या संभाजी राजांच्या अविश्रांत युद्ध कारवाया पाहून साहजिकच असा प्रश्न पडेल कि इतका धोरणी व रणझुंजार सेनानी सहजगत्या मोगलांचा कैदी कसा झाला? आजकालच्या सतत दोन तीन आठवडे चालणाऱ्या लढायांत सैनिक आणि सेनाधिकारी थकून गेल्याचे मी स्वतः पहिले आहे. संभाजी राजे दहा वर्षे अखंड लढत राहिले. त्याअर्थी ते व्यक्तिमत्व म्हणजे मानवी उत्साहाचा अखंड झराच म्हणावा लागेल. असे असतांना त्यांच्यावर शत्रूने अचानक कशी झडप घातली?
आदिलशाही नष्ट झाल्यावर मराठ्यांच्या अनेक छोट्या तुकड्या विजापूर परिसरातील शासकीय यंत्रणा खिळखिळी करावयाच्या दृष्टीने तेथे हल्ले करण्यास बाहेर पडल्या. हि खबर येताच १६८७ च्या सप्टेबर मध्ये बादशहाने गोवळकोंड्याहून आपली छावणी हलवून तो विजापुरकडे निघाला. जानेवारी १६८८ मध्ये विजापुरास छावणी असतांना सर्जा खान व शेख जमालुद्दीन हैद्राबादी हेदिन प्रमुख आदिलशाही सरदार बादशहा बरोबर होते. फेब्रुवारी १६८८ मध्ये शहाआलम व गाझिउद्दिन यांनी ४०००० घोडदळ देवून प्रथम बेळगावचा किल्ला सर करून पुढे कोल्हापूरपर्यंत धडक मारण्याची बादशहाची आज्ञा झाली. या सुमारास संभाजी राजे रायगड येथे होते. संभाजी राजांच्या प्रत्येक हालचालींवर औरंगझेबाचे लक्ष होते. मोगलांनी बेळगावचा किल्ला घेतल्याचे वृत्त त्याना समजताच यापुढील हल्ला कोल्हापूरहून पन्हाळ्यावर होणार हे त्यांनी ताडले. पन्हाळ्याची सुरक्षा मजबूत करण्याच्या हेतूने राजे स्वतः पन्हाळ्याकडे निघाले. इकडे ऑक्टोबर १६८८ मध्ये बादशहा विजापूरहून अकलूज मार्गे मिरजेस पोहचला. यावेळी संभाजीराजे पन्हाळ्याची व्यवस्था करून विशाळगडावर गेले आहेत व तेथील संरक्षण व्यवस्था मजबूत करून राजे रायगडावर जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त शिर्क्यांकडून बादशहाला मिरज मुक्कामी कळले. मिरजेच्या मुक्कामात संभाजीराजांच्या निश्चित हालचालींची बातमी बादशहाला कळताच त्याने शेख हैद्राबादी यास मुकरर्रबखान हा किताब बहाल करून व त्याला वीस हजाराची सेना देऊन काय वाटेल ते करून संभाजीराजांचा पाठलाग करावा व त्यांना जिवंत अथवा मृत ताब्यात घ्यावे असा हुकूम दिला.
लष्करी अनुवाद :- या घटनेपर्यंतच्या सर्व गोष्टी अनेक बखरीतून व ग्रंथातून ज्ञात आहेत. परंतु मुकर्रबखानाने राजांना कसे पकडले याबद्दल इतिहासकार काहीच बोलत नाहीत. नेमक्या याच ठिकाणी लष्करी विश्लेषणाची जरुरी आहे. जर मी स्वतः मुकर्रबखान असतो तर मी काय केले असते या एकाच प्रश्नाने याचे उत्तर मिळणार आहे. संभाजीराजे विशाळगडाची व्यवस्था लावून रायगडकडे परत जातांना शत्रूने पाठलाग केल्यास तो आंबेघाटावरूनच येईल असे अनुमान करून त्यांनी घाटाच्या तोंडावर मलकापुरास पाच हजार स्वार पाठविल्याचे इतिहास सांगतो. अशा परिस्थिती मुकर्रबखान पुढे दोन पर्याय होते. एक म्हणजे आपल्यासैण्याचा एक मोठा गट मिरज-कोल्हापूर (अंतर ७२ किलोमीटर) मार्गाने रवाना करणे. या चालीचा उद्देश डेमोस्ट्रेशन अथवा ‘फेंट’ हा असून आपण कोल्हौपुरातून मलकापूर मार्गेच जात आहोत असा भास निर्माण करणे, दुसरा पर्याय म्हणजे निवडक मनसे घेवून कोणत्यातरी अनपेक्षित मार्गाने थेट संगमेश्वरावर उतरणे. माझा सा कयास आहे कि कऱ्हाडच्या पश्चिमेस सह्याद्रीची जी रांग आहे त्यातून थेट कोकणात उतरण्यासाठी माल, बुडी व तिवरा हे तीन घाट आहेत. यापैकी मिरज-कऱ्हाडवरून (अंतर ९६ किलोमीटर) पाटण हेळवाक मार्गाने मुकर्रबखान तिवरा घाटातून नायटी या गावाजवळ उतरला व त्याने संगमेश्वरला शिव मंदिरात असलेल्या संभाजी राजांची नाकेबंदी केली व त्यांन कैद केले.
मुकर्रबखानला या गोष्टीची निश्चित कल्पना असेल कि मलकापूरहून गेल्यास मराठी स्वारांबरोबर लढत द्यावी लागेल व संभाजीराजे सावध होतील. म्हणून मिरज कोल्हापूर मार्गावर फेंट टाकून तो स्वतः २००० घोडदळ व १००० पायदळ घेवून तिवरा मार्गे संगमेश्वरला उतरला असणार. इकडे शत्रू आल्यास ते मलकापूर हून येईल या अंदाजाने राजे संगमेश्वरात निर्धास्त होते. ३०० वर्षांपूर्वी या भागातील वनस्पती व जंगल खूपच असले पाहिजे म्हणून खानाने घोडदळाचा मार्ग सुकर करण्यासाठी १००० पायदळ घेतले व तातडीची हालचाल करता यावी म्हणून २००० स्वार बरोबर घेतले असावेत. मुकर्रबखान संगमेश्वरी उतरला त्यावेळी संभाजी राजे शिवाच्या अनुष्ठानास बसले होते व एकदा अनुष्ठान चालू झाल्यावर मध्येच उठता येत नाही म्हणून ते खानाच्या हालचालींवर लक्ष ठेवू शकले नाहीत. हे लष्करी विवेचन मान्य झाल्यास तीच संभाजी राजांना खरी श्रद्धांजली ठरेल.
३०० व्या बलिदान प्रसंगी मला दोन सूचना कराव्याश्या वाटतात. पहिली हि कि मी म्हणतो त्याप्रमाणे तीव्र घाटातून नायरी मार्गे संगमेश्वरास उतरणे शक्य आहे का याचा शोध शासकीय वा अशासकीय पातळीवर करण्यात यावा. दुसरी म्हणजे अंजदीव या बेटावर आशियातील सर्वात मोठा नाविक तळ उभारण्यात येत आहे. त्यास आय एन एस संभाजी हे नाव द्यावे. अंजदीव बेत ताब्यात घेवून तेथे नाविक तळ उभारणारे संभाजीराजे हे अग्रणी भारतीय सेनानी होते आणि तेही पोर्तुगीजांवर नजर ठेवावी म्हणून. हीच संभाजी महाराजांना राष्ट्रीय श्रद्धांजली ठरेल.
लेखिका - डॉ. म. ग. अभ्यंकर
संकलन - प्रा. र. भ. वनारसे
वरील लेख, श्री. वैभव तुपे यांनी टंकित केल्याबद्दल त्यांचे आभार.