या उपक्रमातील तेविसावा लेख :
पुण्यात पहिली रेल्वे २३ मार्च १८६४ रोजी सुरु झाली. त्यापूर्वी मुंबई ते ठाणे या भागासाठी १६ एप्रिल १८५३ रोजी ती सुरु झाली होती. मुंबई ते ठाणे हे २१ मैलांचे अंतर होते व रेल्वे ठाण्याला जाण्यास सुमारे ५६ मिनिटे लागत होती. ती काही काळानंतर कल्याणपर्यंत जाऊ लागली. परंतू पुणे ते मुंबई हा प्रवास करण्यासाठी रेल्वेला सुमारे ११ वर्ष लागली.
भारतामध्ये ब्रिटीश राजवट सुरु व्हायला आणि ब्रिटनमध्ये औद्योगिक क्रांती व्हायला एकच गाठ पडली. परिणामी, भारतामध्ये इंग्रजी राजवटीमुळे औद्योगिक क्रांती लवकर होऊ लागली. ब्रिटनमधील औद्योगिक क्रांतीचे वैशिष्ट्य असे, की युरोपमधील सर्व देशांत ब्रिटनमध्ये प्रथम औद्योगिक क्रांती वेगाने झाली. ब्रिटन हा औद्योगिक प्रगतीच्या क्षेत्रामध्ये आघाडीवरील देश होता. त्यामुळे भारतातदेखील आशियातील इतर देशांच्या मानाने आधी औद्योगिक क्रांती सुरु झाली.
इंग्रजांनी रेल्वेच्या प्रगतीला मुंबईपासून सुरुवात केली व नंतरच्या काळात देखील रेल्वेची प्रगती प्रामुख्याने मद्रास, कलकत्ता व कराची या बंदरांच्या दिशेने होत होती. याचे कारण भारतातील कच्चा माल या बंदरातून ब्रिटनमध्ये न्यावा व तेथून पक्का माल भारतात आणून येथील बाजारपेठेत तो विकावा, ही त्यांची दृष्टी होती. या व्यापारी दृष्टीशिवाय संरक्षणाच्या हेतूने इंग्रजांनी वायव्य भागामध्ये रशिया, अफगाणिस्तान यांच्या आक्रमणाच्या भीतीमुळे रेल्वेची वाढ त्या दिशेनेदेखील केली होती. इंग्रजांचा दृष्टीकोन कोणताही असो, प्रारंभीच्या काळात रेल्वेच्या वाहतुकीचा फायदा मुंबई आणि पुणे या शहरांना मोठ्या प्रमाणावर झाला.
रेल्वे मुंबईहून पुण्याला येण्यासाठी अकरा वर्षे लागली. कारण मध्ये खंडाळ्याचा बोरघाट होता. हा घाट फोडण्याचे काम ग्रेट इंडियन पेनिस्युलर रेल्वे कंपनीने १८६१ सुरु केले व ते तीन वर्षांनी पुरे करुन १८६४ पासून पुणे-मुंबई लोहमार्ग सुरु केला.
रेल्वे ही रुळांवरुन धावते, याचे पुण्यातील लोकांना सुरुवातीला आश्चर्यच वाटले. कारण बैल किंवा घोडे न जुंपता गाडी धावते हे आम्हाला कधीही माहीतच नव्हते. त्यामुळे अनेक लोक रेल्वेत बसून खडकीपर्यंत जात व कसे वाटते, याचे वर्णन ते इतरांना अतिशय चटकदार पद्धतीने सांगत असत. सुरुवातीच्या काळात लोकांची अशी अंधश्रद्धा होती, की गाडी दर कोसाला एक बळी घेते; परंतू लवकरच ज्ञान आणि विज्ञानाच्या प्रसारामुळे ही अंधश्रद्धा कशी चुकीची आहे, हे लोकांना समजू लागले. सुरुवातीच्या काळात मुंबई-पुणे प्रवासासाठी सहा तास लागत असत.
मुंबई विद्यापीठाची स्थापना १८.७.१८५७ रोजी झाली व मॅट्रीकची पहिली परीक्षा ६ ऑक्टोबर १९५९ रोजी मुंबई येथे झाली होती. त्या वेळी पुण्याहून या मॅट्रीकच्या परीक्षेसाठी लोणावळा खंडाळ्याला गाडीने जावे लागे व पुढे खंडाळा ते कर्जत हा घाट उतरण्यासाठी घोड्यावरुन किंवा घोडागाडीने जावे लागे. काही विद्यार्थी चालत जात. पुढे रेल्वेने मुंबईला जाण्याची सोय असे. मॅट्रीकच्या पहिल्या परिक्षेस एकूण १३२ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यानंतर १८६२ मध्ये मुंबई विद्यापीठाची बी.ए.ची परीक्षा झाली. त्यावेळी बी.ए.च्या परीक्षेला फक्त सात विद्यार्थी बसले होते. त्यापैकी चार विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या चार विद्यार्थ्यांमध्ये पुण्याचे न्या. रानडे हे पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. याशिवाय इतर विद्यार्थ्यांची नांवे रा. गो. भांडारकर, वामन आबाजी ओक व बाळ मंगेश वाबळे अशी होती. या चारपैकी दोन विद्यार्थी पुण्याचे होते. परीक्षेसाठी ते मुंबईला कसे गेले, हे न्या. रानडे यांच्या चरित्रातून वाचायला मिळते. त्यावेळी मुंबई विद्यापीठाच्या सर्व परीक्षा कुलाबा विभागामध्ये मंडप टाकून घेतल्या जात.
या रेल्वेचे महिलांना विशेष कुतूहल व कौतूक होते. त्यांनी आपल्या जात्यावरील गाण्यामध्येदेखील रेल्वेसंबंधीच्या एका गाण्याचा अंतर्भाव केला. जात्यावरील गाण्यात त्या म्हणू लागल्या
" पुणे शहरामध्ये विंग्रजाने केला कावा, लोखंडाच्या सडकेवरुन आगगाडी घेते धावा." याशिवाय रेल्वेवर त्यांनी अनेक गाणी तयार केली होती.
पुण्यामध्ये प्रथम रेल्वे सुरु झाली त्या वेळी आता या शहरात बेकारी वाढू लागेल, लोकांचा कामधंदा बुडू लागेल व त्यांच्या हलाखीमध्ये वाढ होईल, अशी लोकांची समजूत होती. परंतु पुण्यात रेल्वे सुरु झाल्यामुळे या रेल्वेचा अगदी वेगळा परिणाम झाला. पुणे हे व्यापाराचे केंद्र बनू लागले. सातारा, नगर, सोलापूर अशा अनेक जिल्ह्यांतून माल येऊ लागला व हा माल रेल्वेने अवघ्या सहा तासांत मुंबईस सुरक्षित पोचू लागला. पुण्यातील व्यापार वाढू लागल्याने अनेकांना कामधंदा मिळाला व येथील बेकारी कमी होण्यास महत्त्वाची मदत झाली. नंतरच्या काळात पुणे हे भांडी आणि कापड यांच्या व्यापाराचे मोठे केंद्र बनले. येथील कापडाचा व्यापार झपाट्याने वाढू लागला. याचे एक महत्वाचे कारण म्हणजे पुणे ही पेशव्यांच्या काळापासून लग्नाची बाजारपेठ होती. त्यामुळे साहजिकच कापडाची खरेदी विक्रीही मोठ्या प्रमाणावर होऊ लागला. शिवाय भांड्यांचाही व्यापार वाढू लागला. कारण पुण्यात तांब्या-पितळाच्या भांड्यांचे कारखाने मोठ्या प्रमाणावर वाढू लागले. १८१८ ते १८५० या काळात पुणे शहरात पेशव्यांच्या पतनामुळे जी अवकळा पसरली होती, ती १९६४ नंतर रेल्वेच्या वाहतुकीमुळे झपाट्याने कमी होऊ लागली.
डेक्कन क्वीनचा पुणे मुंबई असा प्रवास १९३० मध्ये सुरु झाला. त्या वेळी डेक्कन क्वीन ही जगातली वेगवान गाडी, असा या गाडीचा लौकीक होता. पुणे - मुंबई हे १२० मैलांचे अंतर डेक्कन क्वीन अवघ्या अडीच तासांत पार करीत होती. याच सुमारास डेक्कन क्वीन ही विजेवर चालू लागली. त्या वेळी डेक्कन क्वीनचा प्रवास हा अत्यंत आरामशीर व हेवा वाटावा इतका चांगला होता. सर्व भारतात त्या वेळी डेक्कन क्वीनसारखा सुखाचा व वेगवान प्रवास कोठेही होऊ शकत नव्हता. आता डेक्कन क्वीनलादेखील सुमारे तीन तास पंचवीस मिनिटे लागतात. म्हणजे या सत्तर वर्षांच्या काळात डेक्कन क्वीनचा प्रवास दरवर्षी काही अंशी एका मिनिटाने वाढत गेला आहे व आता पूर्वीइतका सुखाचा प्रवासदेखील राहिला नाही. प्रारंभी या काळात रेल्वेच्या एकूण उत्पन्नाच्या ऐंशी टक्के उत्पन्न हे मालवाहतुकीचे होते. आता हे उत्पन्न खासगी ट्रकच्या वाहतुकीमुळे पुष्कळच कमी झालेले आहे.
लेखक:-डॉ. मा. प. मंगुडकर.
संकलन:-प्रा.र.भ.वनारसे
हा लेख अमोल सुधाकर शिंपी यांनी टंकीत केला असल्याने त्याचे आभार!!