Wednesday, July 5, 2017

प्राणी जग!!

ठिपकेवाला मुनिया
---
इंग्रजी नाव : स्पॉटेड मुनिया
शास्त्रीय नाव : लॉन्चुरा पंक्चुलाटा
आकार : १० सेमी
----
कोणत्याही पक्षाची चोच पहिली की त्याची जीवनशैली कळते. जीवनशैली म्हणजे त्याचं राहणं-खाणं-पिणं-घरटं करणं-उडणं इत्यादी. या मुनियाची चोच पहा. बुडाशी जाड आणि टोकाशी निमुळती होत गेलेली त्रिकोणी चोच असलेल्या मुनियाला गांडूळ पकडता येतील का? नाही. बरोबर! गवताच्या बिया किंवा धान्याचे दाणे भरडण्यासाठी त्याला चोचीचा उपयोग होतो. पावसाळ्यात घरटं बांधण्यासाठी याच चोचीचा वापर करून मुनिया गवताचं हिरवंगार पातं खुडतो. जिथे शेत असेल तिथे मुनिया दिसतो.
चॉकलेटी रंगाचा चिमणीपेक्षा लहान असलेला मुनिया पोटाकडून पांढरा असतो. पोटावर काळ्या पिसांची जाळीदार नक्षी असते. या पक्षामध्ये नर-मादी सारखे दिसतात. यालाच 'तिलया-मनोली' असंही नाव आहे. मुनियाचं घरटं ऐन पावसात होतं. भरपूर पाऊस झाला की सगळीकडे हिरवंगार होतं. गवताची पाती वाऱ्यावर डोलण्याइतपत मोठी झाली की पिटुकला मुनिया घरटं बांधण्याच्या कामाला सुरुवात करतो. चोचीनं गवताचं पातं खुडतो आणि लगबगीनं घरट्याची जागा निवडलेल्या झाडाकडे येतो. बाभूळ, हिवर, खैर अशी रानातली, तर कोयनेल, बोगनवेल, जाई-जुई, पानांचा अशोक अशी शहरातली झाडं निवडली जातात. जरा डोळ्यांपुढे आणण्याचा प्रयत्न करा- 'साधारण एखाद्या चिमणीचं पिल्लू वाटावं एवढ्या आकाराचा चॉकलेटी रंगाचा मुनिया आकाशात उडतोय आणि त्यानं चोचीत धरलेलं रसरशीत हिरवं पातं वाऱ्यावर भुरभुरतंय!'
मुनियाचं घरटं म्हणजे फुटबॉलच्या आकाराचा छोटा चेंडू. या चेंडूला वरच्या दिशेने असलेलं वाटोळं भोक म्हणजे घरट्याचं दार. अशा या घरट्यात मादी चार ते आठ अंडी घालते. १० सेमी आकाराचा पक्षी एका वेळेस ८ अंडी उबवू शकेल का? अशक्य आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, या पक्ष्यात चक्क नर आणि मादी एकाच वेळी घरट्यात बसून अंफी उबवतात. दोघंही मिळून पिलांसाठी चारा आणतात. लाल मुनिया हा लाल रंगाचा सुंदर पक्षी नद्यांच्या, तलावांच्या काठी वाढलेल्या गवताळ भागात दिसतो. हे पक्षी पिंजऱ्यात पाळतात, मात्र असे पक्षी पिंजऱ्यात बाळगणं आता गुन्हा आहे. पण हे लक्षात ठेवा की पिंजऱ्यातल्या पक्ष्याचं निरीक्षण करण्यापेक्षा निसर्गात मुक्तपणे उडणाऱ्या पक्ष्यांचं निरीक्षण करणं खूपच मनोरंजक आणि अवघडही असतं!

गेंडा
-----
इंग्रजी नाव : इंडियन ऱ्हायनो
शास्त्रीय नाव : ऱ्हायनोसिरस युनिकॉर्निस
---
या सृष्टीत नानाविध प्राण्यांची रेलचेल आहे. अशाच प्राण्यांपैकी एक म्हणजे गेंडा. गेंडा हा जरी डुकरांशी मिळताजुळता असला तरी तो अजस्त्र व दिसायला ओबड धोबड असतो. त्याची साधारण लांबी १० फूट तर उंची ४ फूट १० इंच आणि वजन साधारण चार टन असते. पायाच्या तळाला खुरासारखी धारधार नखे असतात. गोल, चपट्या तोंडावर लहान लहान डोळे व त्यामागे लहानसे कान त्याच्या विद्रुप रुपात अजून भर घालतात. तोंडाच्या वरच्या जबड्यात नाकाजवळ खाच असते. शरीरावर कुठेही केस नसतात. शेपटीच्या टोकास झुपक्यासारखे थोडे केस असतात. गेंड्याचे कातडे जाड असते. असा हा ओबड धोबड अजस्त्र प्राणी जेवढा मोठा तितकाच शांत असतो.
भारतात पुढील तीन प्रकारच्या गेंड्यांचा आढळ आहे. - १. ग्रेट इंडियन ते हिरोज गेंडा- याच्या नाकावर एक धारदार शिंग असते. ज्यामुळे त्याच्या भयानक रुपात भर पडते. २. नावा प्रकारचा गेंडा. ३. आशियाई दोन शिंगांचा गेंडा. गेंडा हा अजस्त्र प्राणी शाकाहारी असून त्याचा वावर साधारणपणे उंच वाढलेल्या गवतात असतो. कातडीच्या उष्णतेमुळे दलदलीच्या भागात राहणे तो पसंत करतो. ऋतुचक्र सुरू झाल्यानंतर मादी नराचा शोध घेत बाहेर पडते. मादीचा गर्भकाळ २१० ते २५५ दिवस असतो.
या गेंड्याचे शिंग खरे नसून तो केसांचा पुंजका एकत्र येऊन जटेसारखा तयार झालेला असतो.  जगात गेंड्याच्या सर्वात मोठ्या शिंगाची लांबी ६२ इंच असल्याची नोंद आहे. गेंड्याचा शत्रू फक्त सिंह आहे.

कस्तुरी मृग
-------------
इंग्रजी नाव : मस्क डियर
शास्त्रीय नाव : moschus moschiferus
हिंदी नाव : कस्तुरीमृग
-----------
सुवर्णापेक्षा बहुमूल्य अशी कस्तुरी कस्तुरीमृगाच्या नाभीत असते. कस्तुरी ही वर्षातून एकदा काढली जाते. ती फक्त नर कस्तुरीमृगाच्या कस्तुरी ग्रंथीमधूनच मिळवता येते.  मादीला ही ग्रंथी नसते.
कस्तुरीमृगाचे कान लांब असतात.  बाकदार पाठ आणि उड्या मारत चालण्याची ढब ही तयाची वैशिष्ट्ये. हिमालयीन कस्तुरी मृग ९.६ ते ११.२ किलोग्राम वजनाचे असतात. तर खांद्यापर्यंतची त्यांची उंची ६० सेमी पर्यंत असते. डोके गडद करडे असते. डोळ्यांच्या वर आणि खाली नारंगी, तपकिरी रंगाचे ठिपके असतात. कानांचे टोक पांढरट असते. जबड्यापासून डोळ्यांपर्यंत एक पांढरट रेषा उमटलेली असते. गळा पांढरा असतो. नर कस्तुरीमृगाला शिंगे नसतात, फक्त दात असतात. अंगावर जाड जाळीदार केस असतात. हे केस त्यांच्या कातडीस घट्ट चिकटलेले नसतात. मांसाहारी शिकारी प्राणी वाघ, कोल्हे, जंगली कुत्रे हे कस्तुरीमृगावर झडप घालून त्यांना पकडतात तेंव्हा हे केस त्यांच्या तोंडात राहतात व कस्तुरीमृग निसटून जाऊ शकतो.
या प्राण्याला एकट्याने राहणे आवडते. एप्रिल ते जून हा काळ मादीच्या प्रसवण्याचा काळ असतो. गर्भारपणाचा काळ हा १८५ ते १९५ दिवसांचा असतो. कस्तुरी मृगाचे अन्न म्हणजे झाडाची पाने, गवत, झुडपे होय. कस्तुरीमृगाला मांसाहारी प्राण्यांपासून विशेष धोका असतो.

बिबट्या
---------
मराठी नाव : बिबट्या, बिबट, खड्या वाघ
इंग्रजी नाव : लेपर्ड
शास्त्रीय नाव : "पँथेरा पार्डस
हिंदी नाव : तेंदूआ
-----------
बिबट्या हा मार्जारवर्गातील बदलत्या परिस्थितीशी सगळ्यात जास्त जुळवून घेणारा प्राणी आहे. बिबट्या हा वाघांएवढा ताकदवान व सामर्थ्यशाली शिकारी नसला तरी त्याचे तंत्र फार जबरदस्त आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा बिबट्या वाघापेक्षा उत्तम रीतीने शिकार करतो आणि प्रतिकूल परिस्थितीतही टिकून राहतो.
याची लांबी साधारण ७ फुटांची असते. मादी नरापेक्षा लांबीने एक फुट कमी असते. याचे वजन जवळपास ७० किलो भरते. मादी ५० किलो वजनाची असते. याचा रंग नारिंगी-पिवळा असून त्यावर काळ्या रंगाचे ठिपके असतात. यापैकी काही ठिपके भरीव तर काही ठिपके पोकळ असतात. थंड प्रदेशातील बिबट्याचा रंग त्यांच्या भरदार केसांमुळे गडद दिसतो तर वाळवंटी प्रदेशातील बिबट्याचा रंग फिकट दिसतो. काळ्या रंगाचा बिबट्या फार क्वचित आढळतो.
दाट जंगले, विरळ झुडपी रान, रानाशेजारचे जंगल असे कुठेही बिबट्या स्वतःला सहजपणे सामावून घेतो. बिबटे सहसा रात्रीच शिकारीसाठी बाहेर पडतात. त्यांची तीक्ष्ण नजर, चौकस कान व आवाज न करणारी चाल भक्ष्याचा मागोवा घेत जाते. बिबट्याचा हल्ला फार जोरदार असतो. त्याच्या तावडीतून सावज फार क्वचित निसटू शकते. बिबटे विविध प्रकारचे भक्ष्य धरतात. जंगलात ते चितळ, सांबर, काकर, चौशिंगा, वानर यांच्या शिकारी करतात. काही वेळेस ते साळिंदर, पाखरे तसेच लहान शिकारी जनावरे यांनाही मारतात. भुकेल्यापोटी बिबट्या खेकडे, प्राणीही खातो. बिबट्या हा वाघाचा प्रमुख खाद्यस्पर्धक असल्यामुळे बिबट्या मारलेल्या भक्ष्याला झाडावर नेऊ शकतो, यावरून त्याच्या ताकदीची कल्पना येते.
मिलन झाल्यावर मादीला २ ते ४ पिल्ले होतात. मादी पिल्लांना दोन ते अडीच वर्षांपर्यंत स्वतःबरोबर ठेवून शिकारीचे प्रशिक्षण देते.

टंकन:-वैभव तुपे

संकलन:-मंजिरी होनकळसे

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

अभंग

माझा मी विचार केला असे मना!!

माझा मी विचार केला असे मना,
चाळवण नारायणा पुरें तुमचे॥१॥
तुम्हांवरी भर घातिलेसे ओझे,
हेंचि मी माझे जाणतसें॥२॥
वाऊगे बोलावे दिसे फलकट,
नाही बळकट वर्म आंगीं॥३॥
चोखा म्हणे सुखे बैसेन धारणा,
तुमच्या थोरपणा येईल लाज॥४॥

चोखोबा आणि विठोबा यांच्यामधील हा 'संवाद' तरी कसं म्हणावं? इथे तर केवळ चोखोबाच बोलत आहेत नि विठोबा मात्र मुकाट्याने ऐकत आहे. ते देवाला म्हणतात,"आता मात्र मी आपल्या मनात तुझी भक्ती करण्याचा निर्धार केला आहे माझा उद्धार करण्याचा भार नि जबाबदारी आता तुझ्यावर आहे. आता तुम्हाला याबाबतीत 'चाळवण' (चालढकल) करून चालणार नाही. मला जे करायचे  ते मी केले आहे. आता माझ्या जीवनाचे सार्थक करणं तुमच्या हाती आहे. तसं झालं नाही तर मात्र मी धरणं धरीन आणि मग तुमच्या भक्त वत्सलतेला,मोठेपणाला, महात्म्याला उणेपणा येईल. तेव्हा देवा, आता फार अंत न पाहता माझ्या उद्धारासाठी धावून ये."

हा अभंग म्हणजे चोखोबांच्या आर्त भक्तीचा उत्कट उद्गार व आविष्कार आहे. भक्त जेव्हा अशा निर्धाराच्या शिखरावर पोहोचतो त्यावेळी तो त्यापासून मुळीच मागं हटत नाही व त्याच्या दृढनिश्चयापासून कुणीही परावृत्त करू शकत नाही.या अभंगातून आणखी एक अनुषंगिक बाब जाणवते ती अशी की, धरणं धरायची कल्पना यादव काळातही असावी! ती केवळ आजकालची नाही!!

डॉ. यू.म.पठाण

टंकलेखन:-सौ.मृणाल

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

ओळख तिकिटांची

तिरंगा ध्वजाचे तिकिट

१५ आॅगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. त्यावेळेस पोस्ट तिकिटे म्हणून ब्रिटिश तिकिटे वापरात होती. कारण तेंव्हा स्वतंत्र भारताची अशी नवीन तिकिटांची छपाई झालेली नव्हती.  मग त्यावेळी काही काळ  'जयहिंद' असा पोस्टचा शिक्का दिल्ली येथे वापरला जात होता. १५ डिसेंबर १९४७ रोजी अशोक स्तंभाचे तीन सिहांचे तिकीट आणि भारतीय तिरंगा ध्वजाचे अशी दोन तिकिटे छापण्यात आली. त्यावर १५ ऑगस्ट १९४७ आणि 'जयहिंद' असे छापण्यात आले आहे. तसेच १५ ऑगस्ट १९४७ ला जे भारतीय तिरंगा झेंडा असलेले तिकीट काढण्यात आले ते परदेशीय टपालासाठी वापरण्यात येत असे. जेणे करून जगाला तिरंगी ध्वजाची ओळख व्हावी.

मॅडम कामा, राजेंद्र प्रसाद

स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतीकारक मॅडम भिकाजी कामा ह्यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने भिकाजी कामा यांचे छायाचित्र असणारे तिकीट काढण्यात आले. तसेच मलेरिया निर्मूलन कार्यक्रमाच्या प्रसारासाठी ७ एप्रिल १९६२ रोजी डांसाद्वारे होणाऱ्या मलेरियाच्या औषध निर्मितीचे आणि डांसांचे चित्र या तिकिटावर चित्रांकित करण्यात आले आहे. १३ मे १९६२ रोजी स्वतंत्र भारताचे पाहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद हे आपल्या पदावरून निवृत्त झाले. त्यांच्या सन्मानार्थ १५ पैसे किमतीचे डॉ. राजेंद्र प्रसाद यांचे चित्र असलेले तिकिट प्रकाशित करण्यात आले. २५ मार्च १९६२ रोजी देशभक्त जी. एस. विद्यार्थी यांच्या स्मरणार्थ तिकिट प्रकाशित करण्यात आले.

प्राचीन आणि आधुनिक काळातील तिकिटे

         ६ मे १९६१ या दिवशी देशभक्त आणि राजकीय नेते मोतीलाल नेहरु यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने त्यांच्या सन्मानार्थ त्यांचे छायाचित्र असलेले तिकिट प्रकाशित करण्यात आले.
          प्रफुल्ल चंद्र रे या भारतीय शास्त्रज्ञाच्या जन्मशताब्दी निमित्त तिकीट काढून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. १४ नोव्हेंबर १९६१ रोजी दिल्लीत भरविण्यात आलेल्या भारतीय औद्योगिक प्रदर्शनाच्या निमित्ताने तिकीट काढून भारतातील वाढणाऱ्या उद्योगांचे कौतुक करण्यात आले. तसेच २१ नोव्हेंबर १९६१ रोजी भारतीय शास्त्रीय वनसंरक्षण विद्येच्या शताब्दी निमित्ताने तिकीट प्रकाशित करून या विद्येचा गौरव करण्यात आला. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या शताब्दीच्या निमित्ताने १४ डिसेंबर १९६१ रोजी पितळखोरे येथील यक्षाच्या प्रतिमेचे तिकीट काढण्यात आले.

नवी दिल्लीतील स्मारके

        १८५६ पासून १९२६ पर्यंत भारतीय तिकिटांची छपाई लंडनमध्ये होत असे. १९२८ मध्ये नाशिक येथे सिक्युरिटी प्रेस स्थापन झाल्यावर तेथे भारतीय तिकिटांची छपाई सुरू झाली. 
         प्रारंभी राज्यकर्त्यांच्या छायाचित्रांची तिकिटे छापली जात असत.१९३१ मध्ये नवी दिल्ली ही भारताची राजधानी म्हणून जाहीर झाल्यावर दिल्लीतील अनेक दृष्ये व स्मारके दाखवणारी अनेक तिकीटे छापण्यात आली. १९३५ मध्ये पंचम जॉर्ज बादशाहांचा रौप्य महोत्सव होता. त्यानिमित्त पुन्हा अश्या प्रकारची तिकिटे छापण्यात आली. त्यानंतर पाहिले महायुद्ध संपले. या आनंदप्रित्यर्थ  १९४६ मध्ये चार तिकिटांचा एक संग्रह छापण्यात आला.

पंचायत राज

       स्वातंत्र्यानंतर स्वयंभू होण्यासाठी भारतात अनेक नवीन प्रकल्पांच्या उभारणीचे  काम सुरू होते. अशाच एका प्रकल्पाचे म्हणजेच असाम राज्यातील गुवाहाटी येथील पहिल्या तेल शुद्धीकरण कारखान्याचे उद्घाटनाच्या निमित्ताने पोस्ट खात्याने या प्रकल्पाचे तिकीट काढले. २६ जानेवारी १९६२ रोजी केंद्र सरकारने पंचायत राजची स्थापना केली. भारतातील सर्व ग्रामीण भागांमधील ग्रामपंचायतींना अधिकार व
प्रदान केले. त्यानिमित्त तिकीट प्रकाशित करण्यात आले. या तिकिटावर ग्रामपंचायत, सरपंच आणि सदस्य काम करीत आहेत आणि मागच्या बाजूला भारतीय संसद आणि भारताचा नकाशा दाखविण्यात आला आहे.

  भारतीय वास्तुकलेची तिकीट मालिका

        १९४९ मध्ये भारत सरकारने भारतीय वास्तुकला या विषयावर बऱ्याच तिकिटांची मालिका प्रस्तुत केली.  भारतातील परंपरागत उत्कृष्ट वास्तुकलेचे नमुने समाजासमोर असावेत म्हणून उत्कृष्ट वास्तुकलेच्या तिकिटांची ही कल्पना! वास्तुकलेसंदर्भात प्रथमच ही कल्पना राबविण्यात आली. त्यात अजिंठा, वेरूळ, कोणार्क, त्रिमूर्ती, बोधिसत्व, नटराज, रांची स्तूप, बोधिगया मंदिर,  भुवनेश्नर मंदिर, सुवर्ण मंदिर, अमृतसर विजयस्तंभ, चितोडगड, लालकिल्ला दिल्ली, ताजमहाल आग्रा, कुतुबमिनार इत्यादी १, २, ५ आणि १० रुपये किमतीची या मालिकेतील ही तिकिटे आहेत. तर १५ रुपये किमतीची पालिताना जैन मंदिराचेही तिकीट काढण्यात आले आहे. ही वास्तुकला व वास्तूंची तिकिटं भारतीय जनतेसाठी रोजच्या वापरासाठी प्रकाशित करण्यात आली. ही पहिली असंदिग्ध म्हणजे डेफिनेटीव्ह अशी तिकिटांची मालिका होती.

टंकन:-सौ.अभिलाषा शिंपी

धोंडो केशव कर्वे जन्मशताब्दी

1958 साली वायुदलाच्या रौप्य महोत्सवानिमित्त वापीती आणि हंटर ह्या विमानांची चित्रे असलेली 90 पैशांची तिकिटे काढण्यात आली. थोर स्त्री उद्धारक आणि शिक्षण तज्ज्ञ महर्षी धोंडो केशव कर्वे ह्यांच्या जन्म शताब्दी निमित्ताने ते हयात असताना त्यांचे छायाचित्र असलेले तिकीट भारत सरकारने प्रकाशित करून त्यांचे अभिनंदन केले. त्यांच्या जिवंतपणी हे तिकीट प्रकाशित केले गेले.  एखाद्याच्या जिवंतपणी प्रकाशित असे हे एकमेव तिकीट आहे. 1959 साली नवी दिल्ली येथे भरलेल्या जागतिक शेतीविषयक माहितीच्या प्रदर्शनानिमित्त  भारत सरकारने तिकीट प्रकाशित केले आहे.  त्या तिकिटावर शेती नांगरणारा भारतीय शेतकरी दाखवण्यात आला आहे.

पहिले पोस्टाचे तिकीट

तिकीट लावून पाठवण्याची व्यवस्था सुरु झाली तेव्हा जगातले पहिले तिकीट इंग्लंडमध्ये'पेनी ब्लॅक' नावाने 6 मे 1840 रोजी प्रचारात आले. तर भारतात इंग्रजी राजवट असतांना सिंध प्रांताचे कमिशनर मि. वार्टल परियर यांनी सिंध प्रांतापुरते 'सिंध डॉक्स' नावाने पहिले तिकीट 1852 मध्ये काढले. हे केवळ भारतातील नव्हे तर संपूर्ण आशिया खंडातले पहिले तिकीट ठरले. पहिले अखिल भारतीय तिकीट 1854 मध्ये अर्ध्या आण्याचे निळ्या रंगाचे तिकीट छापण्यात आले. त्यावर व्हिक्टोरिया राणीचे चित्र होते. त्यानंतर 1 आणा, 2 आणे व 4 आण्यांची तिकिटे छापण्यात आली.

प्राचीन संदेश वाहक

जगभरात पूर्वीपासून टपाल  व्यवस्था अस्तित्वात होती. पोस्ट खाते जरी त्यावेळेस नव्हते तरी संदेश पोहचवणारे राजे महाराजे यांचे दूत होतेच. प्रसिद्ध महाकवी कालिदास यांनी लिहिलेल्या काव्यात शकुंतला दुष्यंन्त राजाला पत्र लिहितानाचे वर्णन आलेले आहे. तेच दृश्य पोस्ट खात्याने 1960 साली  काढलेल्या एका तिकिटात दर्शवले आहे. तसेच कालिदासाच्या मेघदूत काव्यात ढगांद्वारे यक्षाने आपल्या प्रेयसीस संदेश पाठविला असे वर्णन आहे. हे वर्णन चित्ररुप करून असे दृश्य असणाऱ्या तिकिटाचे प्रकाशन करून श्रेष्ठ कवी कालिदास यांचा गौरव करण्यात आला आहे. तसेच प्रसिद्ध कवी तिरुवेलूवर आणि सुब्रमण्यमभारती यांची यावर्षी दोन तिकीटे प्रकाशित केली गेली.

रेडक्रॉस, बालदिन, विद्यापीठ

1957 मध्ये झालेल्या 19 व्या आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस संमेलननिमित्त रेडक्रॉसचे संस्थापक हेनरी ड्युनंट यांचे छायाचित्र असलेले तिकीट काढण्यात आले.  1957 सालापासून भारताचे पहिलेे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन हा बाल दिन म्हणून सर्व भारतभर साजरा करण्यात येऊ लागला. या बाल दिनाच्या निमित्ताने 8 पैसे किमतीचे तिकीट  हस्तकला या विषयावर आधारित अशी तीन तिकिटे काढण्यात आली. भारतीय लोखंड उद्योग शताब्दी निमित्त 15 पैशांचे तिकीट काढण्यात आले. मुंबई, कोलकाता आणि मद्रास विद्यापीठाच्या चित्राची तिकिटे प्रकाशित करण्यात आली. पुढे दर वर्षी ह्याच तारखेला विविध प्रकारची तिकिटे तिकिटे प्रकाशित केली गेली.

पहिली विमान टपाल सेवा

जगप्रसिध्द इंजिनीयर सर डॉ.एम विश्वेश्वरय्या यांची जन्म शताब्दी 1960 साली साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने त्यांचे छायाचित्र असलेले तिकीट प्रकाशित करून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. युनिसेफच्या बालक दिन फंडाच्या निमित्ताने 15 पैसे किमतीचे तिकीट प्रकाशित केले गेले. त्यावर आनंदित झालेली लहान मुले दर्शविण्यात आली आहेत. 1911 साली पहिल्यांदा विमानाने टपाल पाठविण्याची सुरुवात झाली होती. अलाहाबाद ते नैनी ह्या मार्गावर हि सेवा सुरु करण्यात आली होती. ही सेवा सुरू होऊन 1961 साली पन्नास वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्ताने एकंदर तीन तिकिटांचा संच काढण्यात आला. 5 पैसे, 15 पैसे आणि 1 रुपया किमतीची हि तिकिटे होती.  त्यावर एअर इंडिया बोईंग 707, जेट लायनर इत्यादी विमाने दर्शवली होती.

टंकन:-अमोल शिंपी

संकलन:-सौ.मंजिरी होनकळसे

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

स्टेडियम-माहिती

सेडॉन पार्क स्टेडीयम
-------------------------
सेडॉन पार्क स्टेडीयम हे मैदान न्यूझीलंड मधील हॅमिल्टन या शहरात आहे. हॅमिल्टन हे न्यूझीलंड मधील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. तसेच तेथील सुरेख वातावरणामुळे व्हिलेज ग्रीन या नावाने हे शहर प्रसिद्ध आहे. येथील निसर्ग सौंदर्यामुळे पिकनिक स्पॉट म्हणून अनेक निसर्ग प्रेमी येथे सहलीला येतात. येथील सेडॉन क्रिकेट स्टेडीयम हे न्यूझीलंडमधील दोन नंबरचे सर्व सुखसोयींनी समृद्ध असे मोठे मैदान आहे. न्यूझीलंडचे माजी पंतप्रधान रिचर्ड जॉन सेडॉन यांचे नाव या स्टेडीयमला देण्यात आले आहे. हे स्टेडीयम ट्रस्ट बँक पार्क म्हणूनही ओळखले जाते. तसेच वेस्टपॅक ट्रस्ट पार्क आणि वेस्ट पॅक पार्क अशा प्रकारची त्यातील काही भागांना नावे देण्यात आली होती. परंतु २००६ साली वेस्टपॅक ट्रस्ट बँक न्यूझीलंड यांनी ठरवले कि प्रत्येक खेळाच्या वेगवेगळ्या प्रकारासाठी मैदानाचे वेगवेगळे भाग आणि त्यासाठी वेगवेगळे प्रायोजक असण्यापेक्षा हि सर्व नावे मागे घेवून फक्त सेडॉन पार्क याच नावाने हे स्टेडीयम ओळखले जाईल. २००६-२००७ पासून या स्टेडीयम चे सेडॉन पार्क हेच नाव निश्चित करण्यात आले. सेडॉन पार्क या मैदानाचा आकार हा संपूर्णतः गोल आहे. क्रिकेट मैदानाच्याच दृष्टीने मग या मैदानावर क्रिकेटसाठी लागणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सेडॉन पार्क हे मैदान अतिशय उत्तम तऱ्हेच्या हिरवळीने सजवलेले मैदान आहे. या हिरवळीवर मध्यभागी नऊ धावपट्ट्या तयार करण्यात आल्या आहेत. जेणेकरून सरावासाठी किंवा सामन्यांसाठी आलटून पालटून उत्कृष्टपणे तयार केलेल्या धावपट्टीवर खेळता यावे. या सर्व धावपट्ट्या या दक्षिणोत्तर आहेत. फलंदाजी साठी उत्कृष्ट अशा या धावपट्ट्या आहेत या मैदानाच्या बाहेरच्या बाजूने उंच आणि भव्य असे कुंपण घातलेले आहे. समोरच्या बाजूला धावफलक असून त्यावर खेळणाऱ्या संघांच्या खेळाडूंची नावे उद्धृत केलेली असतात. तसेच धावांचा बदलता निर्देशही  त्यावर असतो. हे मैदान क्रिकेट प्रमाणे इतर अनेक खेळ आणि कार्यक्रमांसाठी उपयोगात आणले जाते. क्रिकेटचा मोसम नसतांना तेथे हॉकी, रग्बी आणि रग्बी लीग यांचे सामने घेतले जातात. याशिवाय अनेक समारंभासाठी या मैदानाचा उपयोग केला जातो. या मैदानाची पाणी निचरा होण्याची पद्धत हि आधुनिक पद्धतीने तयार करण्यात आली असून ती उत्कृष्टपणे कार्यक्षम असल्यामुळे मैदानावर पाणी साठून राहात नाही. येथे आंतरराष्ट्रीय, एकदिवसीय आणि प्रथम श्रेणीचे सामने खेळले जातात. नऊ एकदिवसीय आणि पाच कसोटी सामने येथे खेळविले गेले आहेत.

रणसिंगे प्रेमदासा स्टेडीयम
------------------------------
रणसिंगे प्रेमदासा स्टेडीयम हे क्रिकेटचे मैदान असून ते श्रीलंकेत कोलंबो येथे आहे. जून १९९४ च्या आधी हे स्टेडीयम खेत्तारमा क्रिकेट स्टेडीयम या नावाने ओळखले जात असे. आज हे मैदान श्रीलंकेतील खेळाडूंसाठी एक प्रमुख मैदान म्हणून ओळखले जाते. श्रीलंकेचे माजी अध्यक्ष रणसिंगे प्रेमदासा यांच्या कल्पनेतून साकार झालेलं हे स्टेडीयम आहे. ३५००० आसन क्षमतेच्या श्रीलंकेतील सर्वात मोठ्या स्टेडीयम च्या निर्मितीची धुरा रणसिंगे प्रेमदासा यांनी पुढाकार घेवून सांभाळली. श्रीलंका बी संघ आणि इंग्लंड बी संघ यांच्या पहिल्या सामन्याने या स्टेडीयम चे उद्घाटन करण्यात आले होते. हे स्टेडीयम एक पाणथळ जागेवर बांधण्यात आलेले आहे. स्टेडीयम बांधण्याच्या पूर्वी खेत्तारमा मंदिरात जाणारे भक्त या जागेतून जातांना बोटीचा वापर करून पलीकडे जात असत. या मैदानावरील पहिल्या आंतर राष्ट्रीय एकदिवसीय सामन्याचे उद्घाटन ५ एप्रिल १९८६ रोजी श्रीलंका विरुध्द ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्याने झाले. यावेळची या मैदानावरील एक अविस्मरणीय घटना म्हणजे येथे ९५२/६ अशा धावा काढून सर्वोच्च जागतिक विक्रम नोंदवण्यात आला. १९९७-१९९८ साली खेळण्यात आलेल्या या सामन्यात सनथ जयसूर्या याने ३४० धावा तर रोशन महानामा याने २२५ धावा काढल्या. दुसऱ्या विकेट साठी या दोघांची भागीदारी ५७६ धावांची होती. अजूनही हा सामना जागतिक विक्रम जपणारा आहे. या मैदानाची धावपट्टी संथ असल्यामुळे येथे चेंडू उसळतो. या मैदानाच्या मागच्या बाजूला ट्रेनिंग सेंटर सुरु करण्यात आले असून सरावासाठी येथे १६ धावपट्ट्यांची उभारणी करण्यात आलेली आहे.  २००३ साली खेळाडूंसाठी सुरु करण्यात आलेल्या सोनी मॅक्स क्रिकेट अकॅडमीतील खेळाडूंसाठी येथे राहण्याची आणि निवासाची सोय करण्यात आली आहे.

सेंट जेम्स पार्क स्टेडीयम
----------------
सेंट जेम्स पार्क स्टेडियम हे मैदान इंग्लंड मधील न्यूकॅस्टल येथे आहे. न्यूकॅस्टल युनायटेड फुटबॉल क्लब चे १८३२ पासून ते होम ग्राउंड आहे. इंग्लंडच्या उत्तर पूर्व भागातील हे सर्वात मोठे आणि सर्वात जुने फुटबॉल स्टेडीयम आहे. युनायटेड किंग्डम मध्ये असलेल्या फुटबॉल स्टेडीयम पैकी हे सातव्या क्रमांकाचे मोठे स्टेडीयम आहे. या स्टेडीयमची आसन क्षमता ५२३८७ आहे. न्यूकॅस्टल च्या मध्यभागी हे स्टेडीयम आहे. या स्टेडीयमच्या नुतनीकरणाच्या विषयाबद्दल दोन वेळा वाद झाले.स्थानिक निवासी व स्थानिक कौन्सिल यांच्यातील मतभेदांमुळे १९६० आणि १९९५ अश्या दोन वेळा हे नुतनीकरण वादग्रस्त ठरले. क्लब व स्थानिक फुटबॉल सामन्यांशिवाय अनेक आंतरराष्ट्रीय  फुटबॉल सामन्यांसाठी हे मैदान वापरण्यात आले आहे. २०१२ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक साठी तसेच २०१८ मध्ये होणाऱ्या फुटबॉल वर्ल्ड कप साठी आणि २०१५ मध्ये होणाऱ्या रग्बी वर्ल्ड कप साठी या मैदानाची निवड करण्यात आली आहे. तसेच हे मैदान फुटबॉल च्या चॅरिटी सामन्यांसाठी आणि टेलेव्हिजनच्या रिऍलिटी शोसाठी वापरण्यात येते. प्रारंभी या मैदानाची आसन क्षमता ३०००० होती. न्यूकॅस्टल युनायटेड चे सर्व खेळाडू १९०४ पासून लाल आणि पांढऱ्या रंगाचे कपडे घालूनच सामना खेळतात. १९०५ मध्ये या स्टेडीयमची आसन व्यवस्था बरीच वाढवण्यात आली. त्यामुळे आसनक्षमता वाढण्यास मदत झाली. त्याबरोबर काही कलात्मक गोष्टीही येथे वाढवण्यात आल्या. जुन्या कलेचा सांभाळ व्हावा म्हणून त्या दृष्टीने त्यांच्या संग्रहालयाची व्यवस्था येथे केली गेली आहे. याशिवाय एक मोठा तरण तलाव बांधण्यात आला असून तो पोहण्याचा सराव तसेच स्पर्धांसाठी उपयोगात आणला जातो. १९०८ मध्ये रग्बी लीग आणि ग्रेट ब्रिटन यांच्यात त्या मोसमातील रग्बीचा दुसरा सामना झाला. २३ जानेवारी १९०९ रोजी ऑस्ट्रेलियन कांगारू टीमशी येथे सामना झाला. १९२० ते १९३० च्या दरम्यान प्रसिद्ध आर्कीटेक्ट कडून आराखडा तयार करण्यात आला होता. परंतु त्यावरून झालेल्या वाद विवादामुळे तेथे फक्त लहान छत उभारण्यात आले. १९६० मध्ये सुरु झालेल्या बांधकामाविषयीचे वाद १९६६ पर्यंत सुरूच होते. नंतर या स्टेडीयम ची क्षमता ५३१४३ पर्यंत वाढविण्यात आली. त्यावेळी नवीन बांधकाम जुलै २००० मध्ये पूर्ण करण्यात आले.

द सिटी ऑफ मँचेस्टर स्टेडियम
------------------
द सिटी ऑफ मँचेस्टर स्टेडियम हे सीओएमएस किंवा ईस्टलँड स्टेडियम या नावानेही ओळखले जाते. हे स्टेडियम इंग्लंड मधील मँचेस्टर येथे आहे.  या स्टेडियमचे बांधकाम हे २००० समर ऑलिम्पिक आणि २००२ कॉमनवेल्थ गेम्स च्या निमित्ताने केले गेले. या प्रकल्पाला एकंदर ११० दशलक्ष पौंड इतका खर्च आला. फुटबॉल सामान्यांसाठी तयार करण्यात आलेले मैदान म्हणून त्या दृष्टीने या मैदानात बदल करण्यात आले. मँचेस्टर सिटी फुटबॉल क्लबचे हे मैदान होम ग्राउंड आहे. या मैदानाचा २५० वर्षांचा लीजचीझ करार झालेला आहे. या स्टेडियमचा आकार बाउल शेप मध्ये आहे. संपूर्ण ग्राउंड मध्ये दोन मजली बैठक व्यवस्था असून दोन बाजूंच्या स्टँड वर मात्र तीन मजली व्यवस्था करण्यात आली  आहे. १ जुलै २००८ नंतर युनायटेड किंग्डम मधील हे बारावे मोठे मैदान ठरले आहे. तर फा प्रीमियर लीग चे ते चौथे मोठे मैदान आहे. या मैदानाची आसन  क्षमता ४७७२६ आहे. ५ डिसेंबर २००९ रोजी झालेल्या फुटबॉल सामन्यांच्या वेळेस दर्शकांची सर्वोच्च उपस्थिती या मैदानावर नोंदवली गेली. या स्टेडियमचा कोनशिला कार्यक्रम पंतप्रधान टोनी ब्लेयर यांच्या हस्ते करण्यात आला. या मैदानाचा आर्किटेक्चरल आराखडा 'अरुप' यांनी काढलेला असून बांधकामाची जबाबदारी जॉन लाईंग यांच्याकडे सोपविण्यात आली होती. एकूण ११० दशलक्ष पौंड खर्चापैकी ७७ दशलक्ष पौंड खर्च इंग्लंड स्पोर्ट्स कडून देण्यात आला. कॉमनवेल्थ स्पर्धांसाठी या स्टेडियम वर तीन बाजूला अॅथलेटिक्स चे ट्रॅक तयार करण्यात आले होते. तर दुसऱ्या बाजूला तात्पुरता स्टँड उभारण्यात आला होता. जुलै २००२ च्या कॉमनवेल्थ स्पर्धांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने येथे पहिला जाहीर असा मोठा सार्वजनिक कार्यक्रम गजण्यात आला. क्वीन एलिझाबेथ २ यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सोहळा पार पडला. दहा दिवस चालणाऱ्या या स्पर्धांची, स्टेडियमची, अॅथलिट्स आणि रग्बी सामन्यांच्या खेळाडूंची येथे उत्तम प्रकारे व्यवस्था करण्यात आली. कॉमनवेल्थ स्पर्धांचे चार विक्रम या मैदानावर प्रस्थापित केले गेले. महिलांचे ट्रिपल जम्प्स आणि ५००० मीटरच्या स्पर्धा येथे घेण्यात आल्या. कॉमनवेल्थ स्पर्धांनंतर अनेक वाढीव कामं या मैदानावर सुरू करण्यात आली, जी फुटबॉल स्टेडियम साठी आवश्यक होती. ह्यात स्टँडची संख्या वाढवण्यात येऊन १२००० आसन क्षमतेची वाढ करण्यात आली. या नूतनीकरणासाठी ३० दशलक्ष पौंड खर्च आला. हा खर्च फुटबॉल क्लब तर्फे करण्यात आला.

टंकन:-श्री.वैभव तुपे

संकलन:-सौ.मंजिरी होनकळसे

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान