ठिपकेवाला मुनिया
---
इंग्रजी नाव : स्पॉटेड मुनिया
शास्त्रीय नाव : लॉन्चुरा पंक्चुलाटा
आकार : १० सेमी
----
कोणत्याही पक्षाची चोच पहिली की त्याची जीवनशैली कळते. जीवनशैली म्हणजे त्याचं राहणं-खाणं-पिणं-घरटं करणं-उडणं इत्यादी. या मुनियाची चोच पहा. बुडाशी जाड आणि टोकाशी निमुळती होत गेलेली त्रिकोणी चोच असलेल्या मुनियाला गांडूळ पकडता येतील का? नाही. बरोबर! गवताच्या बिया किंवा धान्याचे दाणे भरडण्यासाठी त्याला चोचीचा उपयोग होतो. पावसाळ्यात घरटं बांधण्यासाठी याच चोचीचा वापर करून मुनिया गवताचं हिरवंगार पातं खुडतो. जिथे शेत असेल तिथे मुनिया दिसतो.
चॉकलेटी रंगाचा चिमणीपेक्षा लहान असलेला मुनिया पोटाकडून पांढरा असतो. पोटावर काळ्या पिसांची जाळीदार नक्षी असते. या पक्षामध्ये नर-मादी सारखे दिसतात. यालाच 'तिलया-मनोली' असंही नाव आहे. मुनियाचं घरटं ऐन पावसात होतं. भरपूर पाऊस झाला की सगळीकडे हिरवंगार होतं. गवताची पाती वाऱ्यावर डोलण्याइतपत मोठी झाली की पिटुकला मुनिया घरटं बांधण्याच्या कामाला सुरुवात करतो. चोचीनं गवताचं पातं खुडतो आणि लगबगीनं घरट्याची जागा निवडलेल्या झाडाकडे येतो. बाभूळ, हिवर, खैर अशी रानातली, तर कोयनेल, बोगनवेल, जाई-जुई, पानांचा अशोक अशी शहरातली झाडं निवडली जातात. जरा डोळ्यांपुढे आणण्याचा प्रयत्न करा- 'साधारण एखाद्या चिमणीचं पिल्लू वाटावं एवढ्या आकाराचा चॉकलेटी रंगाचा मुनिया आकाशात उडतोय आणि त्यानं चोचीत धरलेलं रसरशीत हिरवं पातं वाऱ्यावर भुरभुरतंय!'
मुनियाचं घरटं म्हणजे फुटबॉलच्या आकाराचा छोटा चेंडू. या चेंडूला वरच्या दिशेने असलेलं वाटोळं भोक म्हणजे घरट्याचं दार. अशा या घरट्यात मादी चार ते आठ अंडी घालते. १० सेमी आकाराचा पक्षी एका वेळेस ८ अंडी उबवू शकेल का? अशक्य आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, या पक्ष्यात चक्क नर आणि मादी एकाच वेळी घरट्यात बसून अंफी उबवतात. दोघंही मिळून पिलांसाठी चारा आणतात. लाल मुनिया हा लाल रंगाचा सुंदर पक्षी नद्यांच्या, तलावांच्या काठी वाढलेल्या गवताळ भागात दिसतो. हे पक्षी पिंजऱ्यात पाळतात, मात्र असे पक्षी पिंजऱ्यात बाळगणं आता गुन्हा आहे. पण हे लक्षात ठेवा की पिंजऱ्यातल्या पक्ष्याचं निरीक्षण करण्यापेक्षा निसर्गात मुक्तपणे उडणाऱ्या पक्ष्यांचं निरीक्षण करणं खूपच मनोरंजक आणि अवघडही असतं!
गेंडा
-----
इंग्रजी नाव : इंडियन ऱ्हायनो
शास्त्रीय नाव : ऱ्हायनोसिरस युनिकॉर्निस
---
या सृष्टीत नानाविध प्राण्यांची रेलचेल आहे. अशाच प्राण्यांपैकी एक म्हणजे गेंडा. गेंडा हा जरी डुकरांशी मिळताजुळता असला तरी तो अजस्त्र व दिसायला ओबड धोबड असतो. त्याची साधारण लांबी १० फूट तर उंची ४ फूट १० इंच आणि वजन साधारण चार टन असते. पायाच्या तळाला खुरासारखी धारधार नखे असतात. गोल, चपट्या तोंडावर लहान लहान डोळे व त्यामागे लहानसे कान त्याच्या विद्रुप रुपात अजून भर घालतात. तोंडाच्या वरच्या जबड्यात नाकाजवळ खाच असते. शरीरावर कुठेही केस नसतात. शेपटीच्या टोकास झुपक्यासारखे थोडे केस असतात. गेंड्याचे कातडे जाड असते. असा हा ओबड धोबड अजस्त्र प्राणी जेवढा मोठा तितकाच शांत असतो.
भारतात पुढील तीन प्रकारच्या गेंड्यांचा आढळ आहे. - १. ग्रेट इंडियन ते हिरोज गेंडा- याच्या नाकावर एक धारदार शिंग असते. ज्यामुळे त्याच्या भयानक रुपात भर पडते. २. नावा प्रकारचा गेंडा. ३. आशियाई दोन शिंगांचा गेंडा. गेंडा हा अजस्त्र प्राणी शाकाहारी असून त्याचा वावर साधारणपणे उंच वाढलेल्या गवतात असतो. कातडीच्या उष्णतेमुळे दलदलीच्या भागात राहणे तो पसंत करतो. ऋतुचक्र सुरू झाल्यानंतर मादी नराचा शोध घेत बाहेर पडते. मादीचा गर्भकाळ २१० ते २५५ दिवस असतो.
या गेंड्याचे शिंग खरे नसून तो केसांचा पुंजका एकत्र येऊन जटेसारखा तयार झालेला असतो. जगात गेंड्याच्या सर्वात मोठ्या शिंगाची लांबी ६२ इंच असल्याची नोंद आहे. गेंड्याचा शत्रू फक्त सिंह आहे.
कस्तुरी मृग
-------------
इंग्रजी नाव : मस्क डियर
शास्त्रीय नाव : moschus moschiferus
हिंदी नाव : कस्तुरीमृग
-----------
सुवर्णापेक्षा बहुमूल्य अशी कस्तुरी कस्तुरीमृगाच्या नाभीत असते. कस्तुरी ही वर्षातून एकदा काढली जाते. ती फक्त नर कस्तुरीमृगाच्या कस्तुरी ग्रंथीमधूनच मिळवता येते. मादीला ही ग्रंथी नसते.
कस्तुरीमृगाचे कान लांब असतात. बाकदार पाठ आणि उड्या मारत चालण्याची ढब ही तयाची वैशिष्ट्ये. हिमालयीन कस्तुरी मृग ९.६ ते ११.२ किलोग्राम वजनाचे असतात. तर खांद्यापर्यंतची त्यांची उंची ६० सेमी पर्यंत असते. डोके गडद करडे असते. डोळ्यांच्या वर आणि खाली नारंगी, तपकिरी रंगाचे ठिपके असतात. कानांचे टोक पांढरट असते. जबड्यापासून डोळ्यांपर्यंत एक पांढरट रेषा उमटलेली असते. गळा पांढरा असतो. नर कस्तुरीमृगाला शिंगे नसतात, फक्त दात असतात. अंगावर जाड जाळीदार केस असतात. हे केस त्यांच्या कातडीस घट्ट चिकटलेले नसतात. मांसाहारी शिकारी प्राणी वाघ, कोल्हे, जंगली कुत्रे हे कस्तुरीमृगावर झडप घालून त्यांना पकडतात तेंव्हा हे केस त्यांच्या तोंडात राहतात व कस्तुरीमृग निसटून जाऊ शकतो.
या प्राण्याला एकट्याने राहणे आवडते. एप्रिल ते जून हा काळ मादीच्या प्रसवण्याचा काळ असतो. गर्भारपणाचा काळ हा १८५ ते १९५ दिवसांचा असतो. कस्तुरी मृगाचे अन्न म्हणजे झाडाची पाने, गवत, झुडपे होय. कस्तुरीमृगाला मांसाहारी प्राण्यांपासून विशेष धोका असतो.
बिबट्या
---------
मराठी नाव : बिबट्या, बिबट, खड्या वाघ
इंग्रजी नाव : लेपर्ड
शास्त्रीय नाव : "पँथेरा पार्डस
हिंदी नाव : तेंदूआ
-----------
बिबट्या हा मार्जारवर्गातील बदलत्या परिस्थितीशी सगळ्यात जास्त जुळवून घेणारा प्राणी आहे. बिबट्या हा वाघांएवढा ताकदवान व सामर्थ्यशाली शिकारी नसला तरी त्याचे तंत्र फार जबरदस्त आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा बिबट्या वाघापेक्षा उत्तम रीतीने शिकार करतो आणि प्रतिकूल परिस्थितीतही टिकून राहतो.
याची लांबी साधारण ७ फुटांची असते. मादी नरापेक्षा लांबीने एक फुट कमी असते. याचे वजन जवळपास ७० किलो भरते. मादी ५० किलो वजनाची असते. याचा रंग नारिंगी-पिवळा असून त्यावर काळ्या रंगाचे ठिपके असतात. यापैकी काही ठिपके भरीव तर काही ठिपके पोकळ असतात. थंड प्रदेशातील बिबट्याचा रंग त्यांच्या भरदार केसांमुळे गडद दिसतो तर वाळवंटी प्रदेशातील बिबट्याचा रंग फिकट दिसतो. काळ्या रंगाचा बिबट्या फार क्वचित आढळतो.
दाट जंगले, विरळ झुडपी रान, रानाशेजारचे जंगल असे कुठेही बिबट्या स्वतःला सहजपणे सामावून घेतो. बिबटे सहसा रात्रीच शिकारीसाठी बाहेर पडतात. त्यांची तीक्ष्ण नजर, चौकस कान व आवाज न करणारी चाल भक्ष्याचा मागोवा घेत जाते. बिबट्याचा हल्ला फार जोरदार असतो. त्याच्या तावडीतून सावज फार क्वचित निसटू शकते. बिबटे विविध प्रकारचे भक्ष्य धरतात. जंगलात ते चितळ, सांबर, काकर, चौशिंगा, वानर यांच्या शिकारी करतात. काही वेळेस ते साळिंदर, पाखरे तसेच लहान शिकारी जनावरे यांनाही मारतात. भुकेल्यापोटी बिबट्या खेकडे, प्राणीही खातो. बिबट्या हा वाघाचा प्रमुख खाद्यस्पर्धक असल्यामुळे बिबट्या मारलेल्या भक्ष्याला झाडावर नेऊ शकतो, यावरून त्याच्या ताकदीची कल्पना येते.
मिलन झाल्यावर मादीला २ ते ४ पिल्ले होतात. मादी पिल्लांना दोन ते अडीच वर्षांपर्यंत स्वतःबरोबर ठेवून शिकारीचे प्रशिक्षण देते.
टंकन:-वैभव तुपे
संकलन:-मंजिरी होनकळसे
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
No comments:
Post a Comment