Friday, September 1, 2017

प्राणी जग!!

तरस

मराठी नाव : तरस, तडस, लंगड्या वाघ
इंग्रजी नाव : stripped hyena
शास्त्रीय नाव : hyaena hyaena
हिंदी नाव : लकडबघ्घा
----
मोठ्या शिकारी प्राण्यांच्या उदा. वाघ, बिबळ्या उष्ट्यावर जगणारा तरस हा जंगलातील एक अतिशय महत्वाचा प्राणी. एकप्रकारे हा जंगलातील सफाई कामगारच आहे. जनावर सोडून रोगराई पसरण्याआधीच हा त्याचा चट्टामट्टा करतो. त्याचा जबडा मजबूत असल्याने इतर जनावरांना न फोडता येणारी हाडे हा सहज फोडतो व ती मटकावतो.

नार तरसाची लांबी जवळपास पाच फुटांपर्यंत असते. उंची जवळपास तीन फुटांची असते. मादी लांबी व उंचीने नरापेक्षा थोडी लहान असते. नराचे वजन चाळीस किलोच्या आसपास भरते , मादी त्याच्यापेक्षा पाच-सहा किलोने कमी वजनाची असते. श्वानवर्गीय प्राण्यांप्रमाणेच दिसणाऱ्या तरसाचे पुढचे पाय मागच्या पायांपेक्षा जरा जास्त लांब असतात. याच्या डोक्यावरून मानेपर्यंत उंच केसांचा एक लांब पट्टा असतो. त्याच्या कातडीचा रंग करडा, पिवळसर पांढरा, मळकट पांढरा अशा विविध छटांमध्ये दिसतो. तरसाचा आढळ भारतातील सगळ्याच जंगलात आहे. तरस हा घनदाट जंगलांपेक्षा उघड्या मोकळ्या झुडपी अरण्यात, डोंगर व दऱ्यांमध्ये आढळून येतो.

तरसाच्या पाऊलखुणा इतर जनावरांपेक्षा वेगळ्या असतात. त्याच्या पुढच्या पायांचे ठसे  मागच्या पायांपेक्षा मोठे असतात. तरस रात्रीच खाद्य शोधण्याकरता बाहेर पडतात. मारल्या गेलेल्या जनावरांचे मला तरस खातो. हाडे फोडण्याची त्याची क्षमता अद्वितीय आहे. खाल्लेली हाडेही हा पचवतो. इतर जनावरांनी मारलेले भक्ष्य जरी तरस खात असला तरी काही वेळेस तो शेळी, बकरी, कुत्रेदेखील मारतो. याच्या मिलन व विणीबद्दल फार कमी माहिती आहे. हिवाळा याचा मिलनऋतू असतो. पिलांचा जन्म उन्हाळ्यात होतो.

=================================================

कोल्हा

मराठी नाव : कोल्हा
इंग्रजी नाव : jackal
शास्त्रीय नाव : canis aureus
हिंदी नाव : गीदड, कोला
-------
कोल्हा हा सामान्यपणे त्याच्या लांबच लांब कोल्हेकुईमुळे लक्षात राहतो. कोल्हा हा खूप दाट जंगलात न राहता जंगलाच्या सीमेवर असलेल्या वस्तीकाठी राहतो. सडपातळ चणीचा कोल्हा वेगवेगळ्या अधिवासात राहू शकतो. कोल्ह्याची उंची सव्वा ते दीड फुटांपर्यंत असते. त्याच्या शरीराची लांबी दोन ते अडीच फुटांपर्यंत असते. शेपटी जवळपास एक फूट लांब असते. नर कोल्ह्याचे वजन ८ ते ११ किलोंपर्यंत असते.
कोल्ह्याच्या कातडीचा रंग गडद करडा असतो. कान टोकावर बारीक असून त्रिकोणी आकाराचे असतात. शेपूट केसाळ, झुपकेदार असते. पाय काटकुळे पण मजबूत असतात. इतर श्वानवर्गीयांप्रमाणेच कोल्ह्याला देखील नखे पंजाच्या आत ओढून घेता येत नाहीत. कोल्हा दमट पानगळीच्या जंगलापासून ते वाळवंटी भूभाग व उघड्या, शुष्क प्रदेशात देखील आढळतो. हिमालयात तर तो जवळपास बारा हजार फूट उंचीपर्यंत आढळतो. कोल्ह्यांचा निवास दगडाखालचे खड्डे, कपारींमध्ये नेहमीच असतो. ते सहसा दिवसा बाहेर पडत नाहीत. कोल्हा हा एकाकी प्राणी असला तरी काही वेळेस तो कुटुंबातील इतरांसोबत टोळीने आढळतो.
कोल्हा हा संपूर्ण शिकारी प्राणी नाही. तो पक्षी, कृंतक, लहान सस्तन प्राणी यांच्याबरोबरच मेलेले जनावर सुद्धा खातो. त्यांना बोरे, जांभळे अशी पडलेली फळे सुद्धा चालतात. कोल्ह्याच्या विणीबद्दल फारच कमी माहिती आजवर मिळाली आहे. त्याची वीण एखाद्या साळिंदराने सोडून दिलेल्या बिळात किंवा कपारीखालच्या पोकळीत होते. वर्षाच्या कोणत्याही महिन्यात कोल्ह्याला पिले होतात. एका विणीत दोन ते सहा पर्यंत पिलांना मादी जन्म देते.

================================================

वाघ

मराठी नाव : वाघ
इंग्रजी नाव : Tiger
शास्त्रीय नाव : panthera tigris
हिंदी नाव : बाघ, शेर
----
भारतीय जंगलातील सर्वाधिक क्रौर्य, दरारा व भीतीचे प्रतीक म्हणून वाघाचे नकाव प्रसिद्ध आहे. वाघ हा मार्जार (मांजर) कुळात मोडत असून संपूर्ण जगात वाघाच्या प्रमुख ८ जाती आहेत. भारतीय वाघांची लांबी जवळपास १० फुटांपर्यंत मोजली गेली आहे. वाघीण सुमारे साडेआठ फुटांपर्यंत लांब असते. सैबेरीयन वाघ जगातील सर्वात मोठा वाघ असून तो १३ फूट लांब असतो. नराचे वजन ३०० ते ३५०  किलोंपर्यंत तर मादीचे वजन त्याच्यापेक्षा पन्नास किलोने कमी असते.

भारतीय वाघ हा मजबूत बांध्याचा, बळकट स्नायूंचा आणि जबरदस्त हाडापेरांचा शिकारी, मांसाहारी प्राणी आहे. भारतीय वाघ हा जगात आढळणाऱ्या वाघांच्या आठ जातींपैकी एक आहे. भारतात आढळणारा वाघ हा रॉयल बंगाल या जातीतला आहे. याचा रंग नारंगी पिवळा असतो. पोट व पायांच्या आतला भाग हा पांढऱ्या रंगाचा असतो. त्याच्या सर्वांगावर काळ्या लांबुळक्या आकाराचे पट्टे असतात. वाघाच्या पावलांच्या तळव्यांना गादी असल्यामुळे त्यांचा चालतांना आवाज होत नाही. वाघांचे आयुष्यमान साधारण २५ ते ३० वर्ष असते. भारतातील सदाहरित वने, शुष्क पानगळीची जंगले, दमट पानगळीची जंगले, तराई वने, खारफुटीची जंगले ही वाघांची आवडती वस्तीस्थाने आहेत. वाघ आपली हद्द मूत्राचा फवारा, उकिर, नखांचे ओरखडे व विष्ठेच्या साहाय्याने निर्धारित करतो. वाघ आपल्या अणकुचीदार नख्या व जबरदस्त सुळ्यांच्या साहाय्याने भक्ष्याला नामोहरम करतो. भारतीय जंगलांमध्ये चितळ, सांबर, रानडुक्कर, नीलगाय इत्यादी वाघाचे भक्ष्य आहे. भुकेल्या पोटी तो काकर, चौशिंगा व वानरासारख्या लहान जनावरांचीही शिकार करतो. काही वेळेस वाघ रानगवा, हत्तीचे पिल्लू, गेंड्याचे पिल्लू देखील मारतो. वाघाचा मिलनकाळ वर्षभरात कोणत्याही महिन्यात असतो. त्यामुळे त्याची वीण वर्षभरात कधीही होऊ शकते. वाघिणीला एका वेळी २ ते ७ पर्यंत पिले होऊ शकतात. सुरुवातीला पिले आईच्या दुधावरच वाढतात.

संकलन:-मंजिरी होनकसळे

टंकन:-वैभव तुपे

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#युनिकोडिंग

No comments:

Post a Comment