Friday, September 1, 2017

ओळख तिकिटांची


पहिले पोस्टाचे तिकीट

तिकीट लावून पाठवण्याची व्यवस्था सुरु झाली .तेव्हा जगातले पहिले तिकीट इंग्लंडमध्ये'पेनी ब्लॅक' नावाने 6 मे 1840 रोजी प्रचारात आले. तर भारतात इंग्रजी राजवट असतांना सिंध प्रांताचे कमिशनर मि. वार्टल परियर यांनी सिंध प्रांतापुरते 'सिंध डॉक्स' नावाने पहिले तिकीट 1852 मध्ये काढले. हे केवळ भारतातील नव्हे तर संपूर्ण आशिया खंडातले पहिले तिकीट ठरले. पहिले अखिल भारतीय तिकीट 1854 मध्ये अर्ध्या आण्याचे निळ्या रंगाचे तिकीट छापण्यात आले. त्यावर व्हिक्टोरिया राणीचे चित्र होते. त्यानंतर 1 आणा, 2 आणे व 4 आण्यांची तिकिटे छापण्यात आली.

प्राचीन संदेश वाहक

जगभरात पूर्वीपासून टपाल  व्यवस्था अस्तित्वात होती. पोस्ट खाते जरी त्यावेळेस नव्हते तरी संदेश पोहचवणारे राजे महाराजे यांचे दूत होतेच. प्रसिद्ध महाकवी कालिदास यांनी लिहिलेल्या काव्यात शकुंतला दुष्यंन्त राजाला पत्र लिहितानाचे वर्णन आलेले आहे. तेच दृश्य पोस्ट खात्याने 1960 साली  काढलेल्या एका तिकिटात दर्शवले आहे. तसेच कालिदासाच्या मेघदूत काव्यात ढगांद्वारे यक्षाने आपल्या प्रेयसीस संदेश पाठविला असे वर्णन आहे. हे वर्णन चित्ररुप करून असे दृश्य असणाऱ्या तिकिटाचे प्रकाशन करून श्रेष्ठ कवी कालिदास यांचा गौरव करण्यात आला आहे. तसेच प्रसिद्ध कवी तिरुवेलूवर आणि सुब्रमण्यमभारती यांची यावर्षी दोन तिकीटे प्रकाशित केली गेली

रेडक्रॉस, बालदिन, विद्यापीठ

1957 मध्ये झालेल्या 19 व्या आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस संमेलननिमित्त रेडक्रॉसचे संस्थापक हेनरी ड्युनंट यांचे छायाचित्र असलेले तिकीट काढण्यात आले.  1957 सालापासून भारताचे पहिलेे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन हा बाल दिन म्हणून सर्व भारतभर साजरा करण्यात येऊ लागला. या बाल दिनाच्या निमित्ताने 8 पैसे किमतीचे तिकीट  हस्तकला या विषयावर आधारित अशी तीन तिकिटे काढण्यात आली. भारतीय लोखंड उद्योग शताब्दी निमित्त 15 पैशांचे तिकीट काढण्यात आले. मुंबई, कोलकाता आणि मद्रास विद्यापीठाच्या चित्राची तिकिटे प्रकाशित करण्यात आली. पुढे दर वर्षी ह्याच तारखेला विविध प्रकारची तिकिटे तिकिटे प्रकाशित केली गेली.

पहिली विमान टपाल सेवा

जगप्रसिध्द इंजिनीयर सर डॉ.एम विश्वेश्वरय्या यांची जन्म शताब्दी 1960 साली साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने त्यांचे छायाचित्र असलेले तिकीट प्रकाशित करून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. युनिसेफच्या बालक दिन फंडाच्या निमित्ताने 15 पैसे किमतीचे तिकीट प्रकाशित केले गेले. त्यावर आनंदित झालेली लहान मुले दर्शविण्यात आली आहेत. 1911 साली पहिल्यांदा विमानाने टपाल पाठविण्याची सुरुवात झाली होती. अलाहाबाद ते नैनी ह्या मार्गावर हि सेवा सुरु करण्यात आली होती. ही सेवा सुरू होऊन 1961 साली पन्नास वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्ताने एकंदर तीन तिकिटांचा संच काढण्यात आला. 5 पैसे, 15 पैसे आणि 1 रुपया किमतीची हि तिकिटे होती.  त्यावर एअर इंडिया बोईंग 707, जेट लायनर इत्यादी विमाने दर्शवली होती.

संकलन:-मंजिरी होनकळसे

टंकन:-अभिलाषा शिंपी

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#युनिकोडिंग

No comments:

Post a Comment