लामा
मराठी नाव : लामा
इंग्रजी नाव : Llama
शास्त्रीय नाव : Llama glama
हिंदी नाव : लामा
माहिती : अमेरिकेतील अनेक शेतकरी आपल्या पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी लामा हा प्राणी पाळतात. लामा हा दिसायला मेंढ्याप्रमाणे असतो. त्याचे शेपूट लहान असते. लामाला जेव्हा लांडगा, खोकड किंवा जंगली कुत्रा यांसारखे प्राणी दिसतात तेव्हा तो मोठमोठ्याने ओरडू लागतो. त्याचा आवाज ऐकून हिंस्र प्राणी पळ काढतात. या युक्तीचा उपयोग झाला नाही तर लामा त्या प्राण्याला लाथा मारून त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करतो.
सर्वसाधारण लामाची उंची साडेपाच ते सहा फूट असते. त्यांचे वजन १३० ते २०० किलोच्या दरम्यान असते. मेंढ्यांप्रमाणेच लामाकडूनही लोकर मिळते. लामा वाळलेले गवत खातो. याच्या चरबीपासून मेणबत्त्या तसेच केसांपासून दोऱ्या तयार करता येतात. लामा त्यांच्या वजनाच्या २५ ते ३० टक्के भार वाहून नेवू शकतात.
लामा मादीचा गर्भावस्थेचा काळ ३५० दिवसांचा असतो. लामांचे आयुष्यमान सरासरी १५ ते २८ वर्षे असते. लामांच्या विणीचा कालावधी ६ ते १२ आठवड्यांचा असतो.
=================================================
लोरीस
मराठी नाव : लोरीस
इंग्रजी नाव : Slender Loris
शास्त्रीय नाव : Loris Tardigradus
माहिती : माकडाच्या जातीत मोडणाऱ्या लोरीस या लहान आकाराच्या निशाचर प्राण्यास ‘शर्मिली बिल्ली’ असेही म्हणतात किंवा ‘लाजरे माकड’ या नावानेसुद्धा तो ओळखला जातो. याचे डोळे बटबटीत, चेहरा गोलाकार तसेच हातपाय बारीक असतात. याचे दोन प्रकार आहेत – १) रेड स्लेंडर लोरीस, २) ग्रे स्लेंडर लोरीस. लोरीसला शेपूट नसते. याची लांबी १७.५ ते २६ सेंमी. असते. याचे सरासरी वजन ८५ ते ३५० ग्रॅम असते. याच्या पायाची पकड जोरकस असते. यांच्या खाद्यात किडे, फुले, फळे, अंडी तसेच लहान सस्तन प्राणी, पक्षी यांचा समावेश होतो. त्यांच्या भक्ष्याचा ते लहान हाडांसकट संपूर्ण समाचार घेतात. हे सहसा झाडाच्या ढोलीत राहतात. हे खूप चपळ असतात.
यांची वीण वर्षातून दोनदा मे ते डिसेंबरदरम्यान होते. मादीच्या गर्भावस्थेचा काळ १६६ ते १६९ दिवसांचा असतो. मादी एक ते दोन पिलांना जन्म देते. यांचे सरासरी आयुष्यमान १५ ते १८ वर्षांचे असते.
=================================================
मराठी नाव : सिंह
इंग्रजी नाव : LION
शास्त्रीय नाव : पॅन्थ्रिया लियो
हिंदी नाव : बब्बर शेर, सिंह
माहिती : वाघांप्रमाणे पुरेशा आच्छादीत दाट जंगलात न राहता सिंह खुरट्या झुडुपांच्या प्रदेशात व पानगळीच्या जंगलात राहणे पसंत करतात. त्यांची श्रवणेंद्रिये अतिशय तीक्ष्ण असतात. शिकार ते रात्रीच करतात. आयाळ फक्त सिंहालाच असते. सिंहिणीला नसते. आफ्रिकन जातीच्या सिंहाच्या तुलनेत भारतीय सिंहाची आयाळ विरळ असते. त्याचे अंग फिकट पिवळ्या अथवा वाळूच्या रंगाचे असते. त्यावर काही डाग नसतात. परंतु, त्यांच्या पिलांच्या अंगावर मात्र ठिपके व रेघा असतात. सिंह हा मार्जर कुळातील सर्वात अधिक सामाजिक प्राणी आहे. सिंह व विशेषतः त्यांच्यातील नर जरी एकटे राहत असले तरी बरेच वेळा ते लहान – लहान कळपात राहताना दिसतात. सिंह जेव्हा कमजोर होतो, तेव्हा त्याला इतर तरुण व बलवान सिंह हाकलून लावतात व स्वतः कळपाचा ताबा घेतात. हरणे, गुरे-ढोरे, डुकरे व इतर शाकाहारी प्राण्यांवर सिंह जगतात. एका तासाला ८० किलोमीटरच्या जोरदार वेगाने पण छोट्या पल्ल्यातच ते आपल्या भक्ष्यावर हल्ला करतात. सिंह भक्ष्याचे फक्त मांसच खातात.
नर कुटुंबाच्या रक्षणाचे कार्य करतात तर माद्या प्रामुख्याने शिकार करतात. शिकार जरी माद्यांनी केली तरी ती शिकार सर्वप्रथम खाण्याचा मान नराचा असतो. एकदा शिकार केली की, पोट पुरेपूर भरेपर्यंत सिंह ते खातात आणि मग कित्येक दिवस ते शिकार करीत नाहीत. दिवसभर सिंह झोपतात आणि सायंकाळी जागे होऊन शिकारीच्या शोधात बाहेर पडतात. प्रौढ सिंहाच्या विणीचा हंगाम खास असा असतो. एका वेळेस साधारण १ ते ६ पिले जन्मास येतात. सिंह साधारणपणे २० ते ३० वर्षे जगतात.
संकलन:-मंजिरी होनकळसे
टंकन:-अभिजित शिंदे
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#युनिकोडिंग
No comments:
Post a Comment