Friday, September 1, 2017

देशातून इंग्रजी घालवावी काय?

देशातून इंग्रजी घालवावी काय? 

लेखक : डॉ. जि. आ. नाईक

'बहार' पुरवणी, दैनिक पुढारी, दि. १ एप्रिल १९९०

-------------------
ब्रिटिशांचे राज्य जाऊन बेचाळीस वर्ष झाली पण इंग्रजी भाषा मात्र आपल्या देशातून काही गेली नाही. याचे कारण आमच्या देशस्तील बहुभाषिकता वा विशालता हे नव्हे, तर आपल्या समाजात, देशात स्वतःचे वर्चस्व गाजवून राहण्याची आपली प्रवृत्तीच नाही, हे आहे. गेल्या कित्येक शतकात आम्ही आमच्या अशा भाषेची जोपासनाच केलेली नाही.
इतर देशात त्यांच्या त्यांच्या भाषेबाबत सावधगिरी बाळगली जाते व भाषांचा विकास करण्यात येतो याचे विवेचन या लेखात केले असून आपण भारतीय मात्र वर्षानुवर्षे इंग्रजी भाषेच्या कुबड्या घेऊन आपले व्यवहार करीत आहोत याची खंतही या लेखकाने या लेखात व्यक्त केली आहे. 'देशातून इंग्रजी घालवावी काय?' हा प्रश्नही त्यांनी आपल्यासमोर मांडला आहे.
--
राजीव गांधींच्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत देशात इंग्रजीचे स्तोम भरमसाठ माजलेले आहे. पंतप्रधान जाहीर सभेत सुद्धा इंग्रजीतून सर्रास भाषण करत होते. दूरदर्शनवर तर इंग्रजीचे साम्राज्यच स्थापन झाले होते. दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या सकाळच्या कार्यक्रमात तर कार्यक्रम चालवणारे अर्धे वाक्य इंग्रजीत आणि अर्धे वाक्य हिंदीत बोलून तो कार्यक्रम आजतागायत ते चालवीत आहेत. पण या देशात ९५ टक्के लोकांना आजही इंग्रजी कळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. अशा वेळी या देशात आम्हाला इंग्रजी पाहिजेच काय, किती दिवस त्याचे स्तोम माजवीत राहायचे याचा आता विचार व्हायला हवा. कुसुमाग्रजांनी जागतिक मराठी परिषदेच्या आपल्या अध्यक्षीय भाषणात ज प्रश्नाला हात घातलेलाच आहे. आता आम्ही , तुम्ही सगळ्यांनीच याचा विचार करायला हवा.

नव्या जनता दलाच्या भाजप-साम्यवादी यांच्या पाठींब्याने चाललेल्या विरोधी पक्षाच्या सरकारचे इंग्रजी बाबतच धोरण काय असावं की काँग्रेसच्या चाकोरीतून या विरोधकांच्या सरकारनेही याबाबत आपली वाटचाल करावी? याबाबतचे धोरण ठरवण्यासाठी इंग्रजी खरोखरच आंतरराष्ट्रीय भाषा आहे काय, तिचा वापर कोणते देश करतात, हे जाणून घेणे आवश्यक आहे. किती देशात इंग्रजी बोलली जाते कुठे कुठे इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले जाते , राजकीय आणि अर्थव्यवहार केला जातो हे जाणणे फायद्याचे ठरेल. बहुतेक भरतीयांच्यात अशीही एक समजूत स्थिर होऊन बसलेली आहे की इंग्रजी बोलणाऱ्या भारतीयाला परदेशात मानाचे स्थान मिळवणे सोपे जाते. या सर्व बाबतीत वस्तुस्थिती काय आहे?

युरोपात

मी काही वर्षे परदेशात इंग्रजी न बोलल्या जाणाऱ्या देशात (रशियात) वास्तव्य केले. या ना त्यानिमित्ताने बऱ्याच वेळेला पूर्व आणि पश्चिम सिंगापूर, हॉंगकॉंग आणि देशातही जाण्याचा मला योग आला होता. रशियात सगळीकडे भ्रमंती केली. ज सगळ्या प्रवासात इंग्रजीचे जगात स्थान आहे हे प्रत्यक्ष डोळ्यांनी पहायची आणि कानानी ऐकायची संधी मिळाली, या अनुभवातून मला काय दिसले?
पश्चिम युरोपमध्ये २० देश आहेत, पूर्व युरोपात ८, या २८ युरोपियन देशात सर्वसामान्य जीवनात इंग्रजीचा वापर किती देशात केला जातो? इंग्रजी माध्यमातून किती देशात शिक्षण दिले जाते?

इंग्लंडच्या स्वतःच्या खंडात इंग्रजी भाषेचा वापर फक्त एकाच देशात केला जातो, तो देश म्हणजे इंग्लंड! इतर कुठल्याही युरोपीय देशात कुठल्याही शाखेतले  शिक्षण इंग्रजी भाषेतून दिले जात नाही. इतर कुठल्याही देशाचा राज्यकारभार वा न्यायदानपद्धती ही इंग्रजी भाषेतून चालवली जात नाही. पूर्व प्राथमिक शाळेपासून ते पी. एचडी. पर्यंतचे सर्व तऱ्हेचे शिक्षण प्रत्येक युरोपियन देश स्वतःच्या भाषेतूनच देतो.

हे देश किती मोठे आहेत? यांची स्वतःची भाषा म्हणजे कोणती भाषा? पश्चिम युरोप मधल्या २० देशांपैकी १५ देश इतके लहान आहेत की त्यांची लोकसंख्या एक कोटीपेक्षा कमी आहे. या सर्व देशातून विज्ञान, वास्तुकला, आयुर्विज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आदी सेवा क्षेत्रातील सर्व शिक्षण फक्त त्यांच्याच मातृभाषेतून दिले जाते. कुठल्याही परकीय भाषेचा शिक्षणाचे माध्यम म्हणून कोणत्याही क्षेत्रात कोणत्याही युरोपीय देशाने अद्याप वापर केलेला नाही.

याचा अर्थ प्रत्येक  देशाची वेगळी भाषा आहे असा आहे का? तसे नाही. जर्मन आणि फ्रेंच भाषा युरोपमध्ये बऱ्याच देशात लोक मातृभाषा म्हणून वापरतात. जर्मन आणि फ्रेंच युरोपमध्ये सगळीकडे गेले, स्थायिक झाले, आणि असे बरेच युरोपियन देश बनले. युरोपमधल्या बऱ्याच देशात दोन किंवा तीन मातृभाषा असणारे लोक मोठ्या संख्येत आहेत. या सगळ्या देशांच्या राष्ट्रभाषा शिक्षणाचे माध्यम या सर्व भाषेतून चालते. कुठलीही फक्त एक भाषा, मग ती कितीही प्रगत असो, युरोपमध्ये कोणत्याही देशात इतर भाषिकांच्यावर लादली गेलेली नाही. युरोपमध्ये फ्रेंच भाषा बोलणारे लोक फ्रान्स, बेल्जियम, स्वित्झर्लंड आणि लुकझेंबर्ग या देशात राहतात. या चारही देशात ती राष्ट्रभाषा, मातृभाषा आणि सर्व व्यवहारांची भाषा म्हणून राहिली आणि वाढली. जर्मन भाषा बोलणाऱ्या लोकांची युरोपमध्ये पश्चिम जर्मनी, पूर्व जर्मनी, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया आणि लुकझेंबर्ग असे पाच देश आहेत. तिथे जर्मन भाषिक लोकांची सर्व व्यवहारासाठी जर्मन हीच भाषा आहे. स्वित्झर्लंडमध्ये ३ राष्ट्रभाषा जर्मन, फ्रेंच आणि इटालियन आहेत. इवल्याशा लुकझेंबर्ग मध्ये जर्मन आणि फ्रेंच या तीन राष्ट्रभाषा आहेत. एकापेक्षा अधिक राष्ट्रात व्यवहारासाठी वापरली जाणारी भाषा म्हणजे आंतरराष्ट्रीय भाषा. या अर्थाने पहायचे असेल तर युरोपमध्ये फ्रेंच, जर्मन आणि इटालियन या तीनच आंतरराष्ट्रीय भाषा आहेत. इंग्रजी नाही. ती इंग्लंडबाहेर कुठेही वापरली जात नाही. जर्मन फ्रेंच व्यतिरिक्त स्वतःच्या भाषा वापरणारे इतर १२ लहानमोठे देश पश्चिम युरोपमध्ये आहेत.

युरोप सोडला की दुसरा महत्वाचा खंड म्हणजे अमेरिका. अमेरिका खंड दक्षिण आणि उत्तर भागात विभागला गेलेला आहे. उत्तर आणि दक्षिण अमेरिकेत ११ प्रमुख देश आहेत. त्यापैकी फक्त इंग्रजी भाषिक असणारे देश किती? फक्त आणि तो म्हणजे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरीका. कॅनडाच्या दोन राष्ट्रभाषा आहेत. इंग्रजी आणि फ्रेंच. इतर कुठल्याही नऊ देशात इंग्रजी अमेरिका खंडात चालत नाही. ब्राझीलमध्ये पोर्तुगीज भाषा आहे.  इतर सर्व ठिकाणी स्पॅनिश. अमेरिका खंडात स्पॅनिश ही बहुदेशात चालणारी आंतरराष्ट्रीय भाषा आहे, इंग्रजी नव्हे.

आशियात काय परिस्थिती आहे? परमुलखात सर्व तऱ्हेच्या व्यवहाराची भाषा म्हणून इंग्रजी ही फक्त आशिया आणि आफ्रिकेतच काही देशात स्वीकारली गेली आहे. आणि ती फक्त गुलामगिरीच्या पार्श्वभूमीमुळे. इंग्रजी फक्त हिंदुस्तान, पाकिस्तान, बांगला देश, श्रीलंका, सिंगापूर, फिलिपाईन्स आणि हाँगकाँग या सहा देशातच शिक्षण आणि प्रशासनाचे माध्यम म्हणून वापरली जाते. इतर कुठेही नाही. जपानमध्ये लोकांना इंग्रजी कळत नाही. चीनमधील तिच परिस्थिती. मला आश्चर्य वाटते ते हाँगकाँगचे! या शहरावर इंग्रजी लोक शंभर वर्षे राज्य करताहेत पण इथे सुद्धा बहुसंख्य चिनी लोकांना इंग्रजी कळत तर नसावी किंवा इंग्रजीतून ते तुमच्याशी व्यवहार करायला साफ नाकारत तरी असावेत. प्रवासी म्हणून असा अनुभव मला फ्रान्सनंतर फक्त हाँगकाँगमध्येच आला.

पाश्चात्य जगतातून आपण जेव्हा साम्यवादी जगात प्रवेश करतो तेंव्हा परिस्थिती काही फारशी वेगळी दिसत नाही. पूर्व युरोपमध्ये मी जिथे जिथे फिरलो- रशिया व्यतिरिक्त पोलंड, पू. जर्मनी- तिथे तिथे इंग्रजीच्या कुबड्यांचा प्रवासी म्हणून सुद्धा मला कसलाही उपयोग झाला नाही. पूर्व युरोपमध्ये सगळ्या देशात बहुसंख्य लोकांना रशियन भाषा कळते आणि रशियन भाषेचाच इथे उपयोग होतो.

लोकांची प्रतिक्रिया

महाराष्ट्रात आणि बाहेर बऱ्याच भारतीयांची अशी समजूत झालेली दिसते की तुम्हाला इंग्रजी चांगल्यापैकी आले की बाहेर तुम्हाला व्यवहार तर करता येतोच, पण मान मिळतो. वस्तुस्थिती काय आहे? इंग्रजीचे कुबडे घेऊन वावरणाऱ्या भरतीयांबाबत इतरांचे अशा लोकांबद्दल काय मत आहे हे जाणण्यासाठी इंग्लंड, अमेरिका आणि इंग्रजी भाषिक देशाबाहेर राहायची संधी मिळायला हवी. जग इंग्लंड अमेरिकेपेक्षा खूपच मोठे आहे. दुर्दैवाने भारतीयांना याची फारशी जाणीव नाही. हे जाणायचे असेल तर तुम्हाला रशियात काही दिवस तर रहायला हवे. फ्रान्समध्ये रहायला हवे, जपान, इटली, जर्मनीत राहायला हवे. दोन भारतीय जेंव्हा एकत्र येतात तेंव्हा ते इंग्रजीत बोलतात. अशा इंग्रजी बोलणाऱ्या भारतीयांबाबत रशियात सर्व स्तरात अत्यंत तिरस्काराची भावना मला दिसली. हीच परिस्थिती फ्रान्स, जपान व जर्मनीत आढळली. माझे काही जवळचे जपानी, जर्मन मित्र आहेत. त्या कुणालाही आम्ही इंग्रजी बोललेले आवडत नाही. त्यांची भाषा शिका आणि बोला असे त्यांचे चुकूनही म्हणणं नाही. त्यांना फक्त एकाच गोष्टीची खंत वाटते की तुमच्या देशात तुम्ही तुमचीच भाषा का बोलत नाही, तुमचीच संस्कृती का वाढवत नाही? बऱ्याच वेळेला मी इंग्लंडला गेलो, निरनिराळ्या व्यवसायाच्या स्थरातल्या गोऱ्यांच्यात मला वावरायची संधी मिळाली. एकाही गोऱ्या इंग्रजाला आमच्या इंग्रजीचं कौतुक वाटल्याचं मला आढळून आलं नाही. लंडन मध्ये बरेच वेस्ट इंडिज मधून आलेले आफ्रिकी आणि भारतीय उपखंडातून गेलेले हिंदुस्तानी पाकिस्तानी स्थायिक झालेले आहेत. आफ्रिकी माणसांना जशी स्वतःची भाषा आणि संस्कृती नाही तशीच भारतीयांनाही नाही अशीच बहुतेक सगळ्या इंग्रजांची समजूत झालेली असावी असे मला दिसले.

गुलामगिरी

भारताची अशी परिस्थिती का झालेली आहे? काही वर्षे इंग्रजांनी राज्य केले म्हणून? जगात अशी फारच थोडी राष्ट्रे आणि संस्कृती असेल की जिथे काही वर्षे तर परकीयांनी राजू केले नाही. रशीयावर मागासलेल्या मंगोलांचे राज्य होते, फ्रान्सवर जर्मनीचे राज्य होते, अर्थात जर्मनी अद्यापही रशियन वर्चस्वाखाली आहे. जपानवर अमेरिकेने राज्य केले, चीनवर जपान्यांनी. पण या सगळ्या लोकांनी गुलाम गिरीचे आपले संस्कार केंव्हाच दूर केले आणि स्वतःची संस्कृती, इतिहास, भाषा, वाङ्मय या सगळ्यांनीच वाढवली आणि हे सर्व ज्या लोकांनी केले त्यांची राष्ट्रेही वाढली. खुद्द इंग्लंडची परिस्थिती तरी याबाबत काय होती? जितकी वर्षे इंग्रजांनी दुसऱ्यांवर राज्य केले त्यापेक्षा कितीतरी वर्षे अधिक दुसऱ्यांनी इंग्रजांवर राज्य केले आहे. 'ब्रिटन अन ऑफिशियल हँडबुक' या नावाचे दरवर्षी ब्रिफिश सरकार तर्फे एक पुस्तक प्रसिद्ध केले जाते. त्या त्या वर्षात इंग्लंड मध्ये काय काय घडले याबाबत त्या पुस्तकात माहिती असते. १९८२ साली प्रसिद्ध झालेल्या या पुस्तकातली ही माहिती पहा. रोमन लोकांनी इंग्रजांच्यावर २०० ते ३०० वर्षे राज्य केलेले आहे. डॅनिश राजांनी १०१७ ते १०४२ पर्यंत इथे राज्य केले. फ्रेंचांनी जवळ जवळ ३०० वर्षे राज्य केले. या तीन शतकात खुद्द इंग्लंडची राजभाषा, शिक्षण, संस्कृतीचे माध्यम फ्रेंच भाषा होती. जर इंग्रज, जर्मन, रशियन या सगळ्यांनी फ्रेंच भाषेचे आणि संस्कृतीचे वर्चस्व झुगारून देऊन आपापल्या भाषा आणि संस्कृती वाढवल्या तर ही असली गोष्ट भारतातच का होऊ शकत नाही?
हे असे होऊ शकत नाही याचे प्रमुख कारण म्हणजे आमची बहुभाषिकता वा विशालता हे नसून स्वतःच्या समाजात, देशात स्वतःचे वर्चस्व चालवून राहण्याच्या सवयीचा इथला अभाव. आम्ही आमच्यावर खऱ्या अर्थाने गेल्या कित्येक शतकात राज्य केलेच नाही. आमच्या संस्कृतीची जोपासना केलीच नाही. इथे परकीयांचे लाड नेहमीच पुरवलेले गेलेले आहेत. बहुभाषिकता हे एक वरवरचे कारण. इवल्याश्या स्वीत्झर्लंड मध्ये जर तीन भाषा राज्यभाषा म्हणून वावरू शकत असतील ते भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये फक्त हिंदीचाच आग्रह काय म्हणून? हिंदीबरोबर दक्षिणेतली एक आणि पूर्वेतली एक (बंगाल, आसाम, ओरिसा) अशा तीन आंतरराज्यीय संपर्काच्या भाषा इथे चालू शकणार नाहीत? इतर सर्व व्यवहारात - शिक्षण, प्रशासन आदी क्षेत्रात इतर सर्व प्रांतात स्वभाषेतच व्यवहार होऊ शकणार नाही? हे सर्व होऊ शकते. फक्त करणाराच हवा. या देशाचे दुर्दैव हे की आमच्याच देशात आमचेच वर्चस्व गाजवू शकू असे गुण आमच्या संस्कृतीत आम्ही जोपासलेच नाही, मग इथून इंग्रजी जाणार कशी?

टंकन:-वैभव तुपे

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#युनिकोडिंग

No comments:

Post a Comment