हत्ती
मराठी नाव :हत्ती
इंग्रजी नाव :Elephant
शास्त्रीय नाव : Loxodonta
हिंदी नाव :हाथी
महिती: सुपासारखे मोठे कान असणाऱ्या हत्ती या अजस्र प्राण्याच्या पृथ्वीवर फक्त दोनच जाती आहेत-
१. भारतीय हत्ती २. आफ्रिकन हत्ती
यात आफ्रिकन हत्ती हा सर्वात मोठा असून त्याची उंचावू ११ १/२ फूट व वजन सहा टनांपर्यंत असते. हत्तीचे मदमस्त शरीर, त्यात लहान किलबिले डोळे, लहान मान, सुपासारखे मोठमोठे कान व खांबासारखे पाय ज्यावर हत्तींचे महाकाय वजन पेलले जाते. त्यामानाने त्याची शेपटी अतिशय लहान असते. जबड्यात दिन मोठे सुळे असून ते त्यांच्या संरक्षणार्थ कामी येतात. याच हस्तिदंतीसाठी हत्तीची शिकार केली जाते. तोंडाच्या खालच्या व वरच्या जबड्याजवळून नाकाच्या भागाची मोठी मांसल सोंड ४ ते६ फूट असून तिच्या टोकास नाकाची दिन छिद्रे असतात. सोंड हे हत्तीचे नाक आहे व या सोंडेचा उपयोग अन्न, झाडांच्या उंच फांद्यांवरील चारा खाण्यासाठी, पाणी पिण्यासाठी, पाणी व धूळ अंगावर फवारण्यासाठी, अवजड लाकडांचे ओंडके उचलण्यासाठी व वास घेण्यासाठी होतो. हत्तीच्या सोंडेत मोठी ताकद असते.
आफ्रिकन हत्तीत नर व मादी या दोघांनाही लांब-लांब सुळे असतात. भारतीय हत्तीत फक्त नरालाच मोठे सुळे असतात. भारतीय हत्तीच्या पायाला चार बोटे असतात, तर आफ्रिकन हत्तीच्या पायाला फक्त तीनच बोटे आसतात. हत्तींना स्मरणशक्तीदेखील चांगली असते. हत्तीची कातडी गेंड्यासारखी जाड असते व जेव्हा जेव्हा ती कोरडी पडते, तेव्हा ते पाण्यात जावून सोंडेने त्यावर पाण्याची फवारणी करतात. याप्रकारे हत्ती त्यांची त्वचा कोरडी व स्वच्छ ठेवतात.
मादी हत्तीचा गर्भारकाळ सर्व प्राणिमात्रांपेक्षा जास्त असून तो २० महिने असतो. हत्तीच्या पिलाचे वजन २०० ते ३०० पौंड तर उंची ३ फूट असते. हत्तीचे आयुष्यमान ६५ ते ७० वर्षाचे आहे. हत्तीचे अन्न पूर्ण शाकाहारी असून गवत, झाडाच्या फांद्यांवरील पाने, वेगवेगळी फळे हे होय. पर्यावरणाच्या दृष्टीने हे अजस्त्र जनावर अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याच्या हिरवा चारा खाण्याने झाडास नवीन पालवी फुटते व वृक्षांची वाढ होते.
=================================================
सांबर
मराठी नाव :सांबर, ढाक
इंग्रजी नाव : Sambar
शास्त्रीय नाव :Cerve Unicolor
हिंदी नाव :सांबर, सामर
माहिती: भारतातील सर्वात मोठे हरीण असलेला सांबर हा प्राणी आहे. दाट रानात वास्तव्य करणारे सांबर बऱ्याच वेळा एकेकटे किंवा लहान कळपाने आढळते. सांबराच्या प्रचंड आकाराप्रमाणेच त्याची भारशिंगेही फार मोठी असतात. पूर्ण वाढ झालेल्या शिंगड्या नराचे वजन २२५ ते ३२० किलोपर्यंत असते. नराची शिंगे चांगलीच मोठी असून, त्यांचा फैलावही बराच मोठा असतो.
याचा रंग गडद पिवळसर- तपकिरी असतो. भौगोलिक बदलांप्रमाणे हा रंग गडद किंवा फिकट होतो. खूप जास्त वयाचा नर प्रचंड आकारचा व जवळपास कळ्याच रंगाचा असतो. याच्या खाद्यात प्रामुख्याने गवत, काही झाडांची पाने व अनेक वन्य फळांचा समावेश असतो. सांबरे ही रात्रभर चरतात. रात्री भरपूर चरून ती दिवस उगवण्याच्या सुमारास दाट जंगलात निघून जातात व पुन्हा संध्याकाळ झाल्याशिवाय बाहेर पडत नाही.
त्यांना घनदाट जंगले आवश्यक असल्याने अशाच भागात ती दिसून येतात. डोंगराळ भागातील शेताजवळचे जंगल हे सांबराचे आवडते वसतिस्थान आहे. सांबर अतिशय संवेदनशील हरीण आहे. त्याची घ्राणेंद्रियें अतिशय सक्षम असतात. त्यांची दृष्टी तीक्ष्ण असून ऐकण्याची शक्ती चांगली असते. संबरांना पाण्यात उतरून पोहायला आवडते. ती पाणलिलीची पाने खाण्याकरिता पाण्यात उतरतात तेव्हा त्यांचे डोके व शिंगेच फक्त पाण्यावर दिसून येतात.
बहुतेक सांबरांची शिंगे उन्हाळ्याच्या सुमारास गळतात व पावसाळ्याच्या सुरुवातीला नवीन येतात. पावसाळ्यात त्यांच्या शिंगांवरची मखमल बघता येते. सांबरांची वीण पावसाळ्याच्या सुमारास होते. पिले जन्मतःच फार चपळ असतात व नेहमी आईसोबतच राहतात.
=================================================
मुंगूस
मराठी नाव :मुंगूस
इंग्रजी नाव :Common Mongoose
शास्त्रीय नाव : Herpestes edwardsil
हिंदी नाव :नेवला
माहिती: सर्वसाधारणपणे घराशेजारी, शेताजवळ, बागेत दिसणारा सामान्य मुंगूस हा चपळ व देखणा प्राणी आहे. मुंगूस हा काही घनदाट अरण्यात राहणारा प्राणी नाही. याचा जास्त आढळ उघड्या माळरानात, झुडपी जंगलात, शेतामध्ये असतो. अशा ठिकाणी हा सहजपणे वावरतो. एखाद्या दगडाखालच्या बिळात याचे नेहमीच वास्तव्य असते. काही वेळेस हा झाडाच्या बुडाशी स्वतः खोदलेल्या खड्डयातही वास्तव्य करतो. सामान्य मुंगसाची लांबी जवळपास ३ फूटांची असते. त्यापैकी दीड फूट नुसते त्याचे शेपूटच असते. साधाराणपणे त्याचे वजन दीड किलोपर्यंत असते. नर नेहमीच मादीपेक्षा मोठा असतो. घरातल्या उंदीर, घुशींचा नाश करण्याच्या कामगिरीमुळे मुंगूस शेतकऱ्यांचा मित्र ठरते.
मुंगूसचा रंग पिवळसर-करडा असतो. त्याच्या अंगावर कुठेही ठिपके किंवा पट्टे नसतात. भारतात या मुंगूसाच्या ३ उपजातींची नोंद करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारच्या अधिवासात स्वतःला सामावून घेण्याची सामान्य मुंगसाची क्षमता अद्वितीय आहे.
मुंगूसाच्या खाद्यात उंदीर, घुशी, साप, सरडे, बेडूक, मोठे कीटक, विंचू, गोम यांचा समावेश असतो. ते पक्ष्यांची अंडी, पिल्ले, फळे हेही तेवढ्याच चवीने खाते. मुंगूस बऱ्याच वेळेस मेलेल्या जनावरांचे मांसही खातात. मुंगूस एकेकट्याने किंवा जोडीने शिकार करतात. मुंगूसाला सापाबरोबर लढतानाही काही वेळेस पाहिले गेले आहे. मात्र, मुंगूस व सापामध्ये पारंपरिक शत्रुत्व असते की भक्ष्य-भक्षक स्पर्धा, हे कळणे मनोरंजक ठरेल.
मुंगूसाची वीण वर्षभर होते. एका विणीमध्ये मादी ३ पिल्लांना जन्म देते.
संकलन:-मंजिरी होनकळसे
टंकन:-अभिलाषा शिंपी
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#युनिकोडिंग
No comments:
Post a Comment