नोबेलचे मानकरी
गेरहार्ट योहान रोबेर्ट हाउप्टमान
साहित्यातील १९१२ सालचे नोबेल पारितोषिक प्राप्त साहित्यिक.
गेरहार्ट हाउप्टमान हे जर्मन नाटककार म्हणून प्रसिध्द आहेत. हाउप्टमान यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८६२ साली पोलंड मधील सिल्सिया भागातील ओबरसालझब्रुन येथे झाला. त्यांचे वडील हे हॉटेलचे व्यवस्थापक होते. गेरहार्ट हाउप्टमान यांचे सुरुवातीचे शिक्षण त्यांच्या जन्म गावातील खेड्यात झाले. त्यानंतर त्यांना शेतीच्या कामासाठी त्यांच्या काकांकडे पाठविण्यात आले. परंतु तेथून लवकरच ते ब्रेसलॉ येथे परत आले आणि आर्ट स्कूल मध्ये प्रवेश घेऊन मूर्तिकार होण्याचा त्यांचा विचार होता. परंतु १८८५ मध्ये ते बर्लीन येथे आले आणि तेथेच स्थायिक झाले. पुढील सर्व आयुष्य त्यांनी साहित्य सेवेसाठी वाहून घेतले. आधुनिक नाटककार म्हणून लवकरच त्यांचे नाव प्रसिद्धीस आले. असाधारण आणि वेगळ्याच वळणाचे त्यांचे नाट्यलेखन लोकप्रियतेमुळे यशाचे शिखर गाठणारे ठरले. जर्मन साहित्याच्या इतिहासात हाउप्टमान हे एक वादग्रस्त लेखक म्हणून संबोधले जातात. त्यांचे सर्व लेखन हे वास्तवतेवर आधारित होते. स्वतःच्या आयुष्यात आलेले अनुभव त्यांच्या लेखनात सतत आलेले दिसतात. त्यांनी लिहिलेल्या जवळ जवळ सर्वच साहित्याचे इंग्रजी भाषेत रूपांतर करण्यात आले आहे. हाउप्टमान यांच्या साहित्य सेवेबद्दल त्यांना १९१२ सालचे नोबेल पारितोषिक देऊन गौरविण्यात आले आहे.
लुडविंग कार्ल मार्टिन लिओन्हार्ड आल्ब्रेख्ट कोसेल
वैद्यकशास्त्राचे १९१० सालचे नोबेल पारितोषिक प्राप्त शास्त्रज्ञ.
कोसेल हे जर्मनीतील एक प्रसिध्द डॉक्टर होते. कोसेल यांचा जन्म १६ सप्टेंबर १८५३ रोजी रोस्टोक येथे झाला. त्यांचे वडील हे एक पर्शियन अधिकारी होते. माध्यमिक शिक्षण झाल्यानंतर १८७२ मध्ये कोसेल यांनी वैद्यकीय शिक्षणासाठी स्ट्रासबर्ग या विद्यापीठात प्रवेश घेतला. तेथे त्यांना अॅन्टोनी डी बरी, वॉल्डेयर आणि फ्लिक्स होप सेलर या प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. रोस्टोक विद्यापीठातून १८७८ साली त्यांनी पदवी घेतली. आपल्या पेशा बरोबरच कोसेल यांनी शारीरिक रसायनशास्त्रात संशोधन करण्यास सुरुवात केली. विशेषतः शरीरातील टिश्यू आणि पेशी यांच्याबद्दल रासायनिक संशोधन ते करीत होते. १८८० च्या अखेरीस त्यांनी शरीरातील पेशींची जडण घडण याबाबत संशोधनाला प्रारंभ केला आणि पुढे १८९० मध्ये त्यांनी आपले संशोधन प्रथिनांकडे वळवले. शरीरातील प्रथिनांमध्ये बदल होऊन त्याचे पेप्टोन मध्ये कसे रूपांतर होते हे त्यांनी शोधून काढले. त्यानंतर त्यांनी न्युक्लिइक् अम्लांमधून मुलभूत घटक शोधून काढले. त्यांनी शोधून काढलेले हे घटक, अनुवंशिक गुण एका पिढीतून पुढील पिढीत नेण्यासाठी महत्त्वाचे आहेत असे लक्षात आले. पेशी विषयक रसायनशास्त्राच्या या शोधाबद्दल त्यांना १९१० सालचे वैद्यक क्षेत्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले.
नील्स बोहर
भौतिकशास्त्रातील १९२२ चे नोबेल पारितोषिक प्राप्त शास्त्रज्ञ.
अणू सूर्यमालेसारखा आहे हे विधान अगदीच निरुपयोगी ठरत होते. वर्तुळाकार भ्रमण करणाऱ्या इलेक्ट्रॉनची उर्जा त्वरणामुळे कमी होते व तो केंद्रावर का आदळत नाही? या प्रश्नाचे उत्तर शास्त्रज्ञांना सापडत नव्हते. सुप्रसिद्ध नील्स बोहर या डॅनिश शास्त्रज्ञाने क्वांटम भौतिकीच्या साह्याने ते उलगडून दाखविले. काही ठराविक कक्षेतच इलेक्ट्रॉन्स केंद्रकाभोवती भ्रमण करू शकतात. तिथेच त्यांची उर्जा टिकून राहते. काही विशिष्ट कारणांमुळे इलेक्ट्रॉनची पुरेशी किंवा अतिरिक्त उर्जा काढून घेतली तर तो इलेक्ट्रॉन दुसऱ्या कक्षेत उडी मारतो. उर्जेतील हा इलेक्ट्रॉन प्रकाशाच्या रुपाने बाहेर पडतो वा शोषला जातो. बोहरच्या या सिद्धांतामुळे इलेक्ट्रॉनच्या कक्षा, पदार्थांचे वर्णपट, रासायनिक गुणधर्म अशा अनेक गोष्टी उजेडात येऊन त्यांची संरचना शोधक ठरली. सर्व गोष्टींची संगती लागली. या त्यांच्या संशोधनामुळे १९२२ सालचा भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार त्यांना बहाल करण्यात आला.
सर फ्रेड्रिक बॅन्टिग
वैद्यकशास्त्रातील १९२३ चे नोबेल पारितोषिक प्राप्त शास्त्रज्ञ.
फ्रेड्रिक ग्रँट बॅन्टिग हा कॅनेडियन संशोधक होता. १४ नोव्हेंबर १८९१ साली अॅलिस्टोन आँट येथे कॅनडामध्ये त्याचा जन्म झाला. भौतिकशास्त्राचा प्रगाढ अभ्यासक व डायबेटिस या भयानक रोगावर औषध शोधून काढणारा हा शास्त्रज्ञ होता. ‘मधुमेह’ हा जीवघेणा रोग कसा बरा करता येईल, यासाठी १९२० सालापासून तो अथक परिश्रम करीत होता. एक दिवस तो काम करून थकला व झोपी गेला. त्यावेळी पहाटेचे दोन वाजले होते. तो लगेच उठला आणि त्याने नोंदवहीत फक्त तीन वाक्ये लिहिली. ‘कुत्र्याच्या पँक्रिअॅटिक नळीजवळ रिबीनने गाठ मार. सहा ते आठ आठवडे वाट पहा. तो अर्क पिळून पहा.’ या नोंदवहीतून तो पुढे प्रयोग करू लागला व पँक्रिआसनजीक आयलेटस् ऑफ लँगरहॅन या पेशीतून इन्शुलीनची निर्मिती होते हे सिद्ध केले व ते इन्शुलीन वेगळे करण्यातही त्याने यश मिळवले. बॅन्टिगची प्रयोगशाळा लहानच होती; पण शोध मात्र महान ठरला. मॅक्लीयाड व वेस्ट या सहकाऱ्यांच्या मदतीने त्याने हा शोध लावला. १९२३ सालचे नोबेल पारितोषिक तिघांनी वाटून घेतले. ब्रिटिश एम्पायरने त्याला ‘नाईट’ हा किताब देऊन त्याचा गौरव केला.
संकलन:-मंजिरी होनकठसे
टंकन:-अभिजित शिंदे
No comments:
Post a Comment