Thursday, December 14, 2017

नोबेल पारितोषिक

पाउल योहान लुटव्हिग फोन हायझे

साहित्यातील १९१० सालचे नोबेल पारितोषिक प्राप्त शास्त्रज्ञ
----------------------------------------
हायझे हे एक प्रसिद्ध जर्मन साहित्यिक होते. हायझे यांचा जन्म १५ मार्च १८३० रोजी जर्मन बर्लिन या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव करी विल्हेम लूटव्हिग हायझे तर आईचे नाव जुली सलिंग होते. हायझे यांचे वडील करी विल्यम हायझे हे एक प्रसिद्ध भाषा शास्त्रज्ञ होते. तर आई ही जेविश कुटुंबातील होती. जेविश हे कुटुंब अतिशय श्रीमंत होते. पाउल योहान हायझे यांचे शिक्षण बर्लिन आणि बोन येथे झाले. दर्जेदार भाषांचे ज्ञान त्यांनी आपल्या शिक्षणातून मिळविले होते. त्या नंतर हायझे यांनी अनेक इटालियन कवितांचे भाषांतर केले. तसेच त्यांनी बऱ्याच लघुकथा लिहिल्या ज्या जगप्रसिद्ध झाल्या. विविध विषयांवर त्यांनी कादंबऱ्या लिहिल्या. १८७३ मध्ये प्रकाशित झालेले त्यांचे पुस्तक ‘चिल्ड्रेन ऑफ दि वर्ल्ड” हे फार गाजले. बर्लिनच्या पोयेट सोसायटीचे ते सभासद होते. तसेच परंपरावादी म्युनिच स्कूलचेही ते सभासद होते. कवितांच्या बरोबरीने त्यांनी नाटकं लिहिली त्यांची संख्या ६० च्या वर आहे. आपल्या लेखन शैली मुळे ते लोकप्रिय साहित्यिक झाले. त्यांचे साहित्य हे आदर्श वादावर आधारित होते. तसेच ते कलात्मक आणि परिपूर्ण होते. त्यांच्या लेखणीत नाविन्य असे. त्यामुळे त्यांच्या प्रतिभेचा स्पर्श लाभलेल्या लघुकथा फार गाजल्या. अशा या कादंबरीकार, नाटककार, भावकवी, भाषा तज्ञ, लघुकथाकार असलेल्या हायझे यांना १९१० सालचा साहित्यातील नोबेल पुरस्कार देवून त्यांना गौरविण्यात आले होते.

संकलन:-मंजिरी होनकळसे

टंकन:-वैभव तुपे

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा

No comments:

Post a Comment