मराठीत छापील स्वरूपातील माहिती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, ती माहिती आंतरजालावर युनिकोड स्वरूपात उपलब्ध करून देणे हा ज्ञानभाषा मराठी समूहाच्या #मराठीयुनीकोडिंग उपक्रमाचा उद्देश आहे. तुमच्याकडे देखील अशी जुनी, कोणत्याही विषयावरील ज्ञानवर्धक माहिती उपलब्ध असेल तर ९०५२३४४४७६ या क्रमांकावर संपर्क साधा.
या उपक्रमातील बाविसावा लेख :
--------------------------------------
औरंगाबाद मधील गुरुद्वारात १७ व १८ जून १९०१ रोजी जगन्नाथ महाराज पंडित यांचे (म्हणजे माझ्या वडिलांचे) दत्तक विधान संपन्न झाले. स्वतः लोकमान्य टिळक उपस्थित होतेच, शिवाय गावातील प्रतिष्ठित मंडळीही हजर होती. सर्वांच्या समक्ष ताई महाराजांनी जगन्नाथाला मांडीवर घेतले. सर्व विधी यथासांग पार पडला.
ताई महाराज म्हणजे पुण्यातील सरदार बाबामहाराज पंडितांच्या पत्नी, आणि बाबामहाराज म्हणजे लोकमान्यांचे जिवलग स्नेही. मृत्युशय्येवर असतांना त्यांनी गळ घातल्याने लोकमान्य ट्रस्टी व्हायला राजी झाले. बाबामहाराजांच्या इस्टेटीची देखभाल करणे व घराण्यासाठी दत्तक घेणे, हे ट्रस्टचे प्रमुख काम होते. बाबामहाराज निवर्तल्यावर दत्तक घेण्याचा प्रश्न निर्माण झाला. ट्रस्टचे अध्यक्ष असल्याने ती जबाबदारी लोकमान्यांच्या खांद्यावर येवून पडली. बाबामहाराजांच्या मूळ घराण्यातील एखादा चुणचुणीत लहान मुलगा दत्तक घ्यावा असे त्यांनी ठरवले होते.
त्यासाठीच स्वतः लोकमान्य मुलाच्या गावी म्हणजे निधोन्याला गेले होते. त्यांच्या सोबत दादासाहेब खापर्डेही होते. मूळ घराण्यातील काही मुले त्यांना तेथे दाखवण्यात आली. बाबामहाराज पंडितांच्या इस्टेटीला वारस म्हणून त्या मुलांतूनच जगन्नाथाची निवड करण्याचे ठरले. तेंव्हा जगन्नाथाचे वय केवळ सहा वर्षाचे होते. प्रत्यक्ष दत्तक विधानापुर्वी जगन्नाथ आपल्या आई-वडिलांबरोबर औरंगाबादला आलाच होता. तिथे त्याची सर्व प्रकारे परीक्षा घेण्यात आली. ताईमहाराजांच्या नजरेखालून त्याला घालण्यात आले. दुर्गेशास्त्रींनी त्याची कुंडली तपासली. त्यात मुलगा भाग्यवान असल्याचा निर्वाळा मिळालाच होता. शेवटी सर्व परीक्षात उत्तीर्ण झालेल्या जगन्नाथाचेच नाव सर्वानुमते मान्य झाले. पण ट्रस्टी कमेटीतील नागपूरकर यांचे मत वेगळे होते. कोल्हापूर कडील भाऊबंदांपैकी १७-१८ वर्षाच्या बाळामहाराज पंडित यांनाच दत्तक घ्यावे, असा त्यांचा अट्टाहास होता. आणि ताई महाराजांवर तर नागपूरकरांचा मोठाच प्रभाव होता. दत्तक विधानासाठी लोकमान्य औरंगाबादला गेले तरी नागपूरकर पुण्यालाच होते. लोकमान्य पुण्यात नाहीत म्हटल्यावर नागपूरकरांना रान मोकळे मिळाले.
दत्तक विधान पूर्ण झाल्यावर खाशी मंडळी पुण्याकडे परतली. सदाशिव पेठेतील आपल्या भाऊमहाराज वाड्यात ताई महाराज गेल्या आणि जगन्नाथाला घेवून लोकमान्य गायकवाड वाड्यात गेले. त्यामुळे ताई महाराज कटकारस्थान करणाऱ्या मंडळींच्या गराड्यात सापडल्या. त्या मंडळींनी ताईमहाराजांच्या मनावर आपले मत बिंबवले आणि जगन्नाथाला झिडकारून नव्याने दत्तक घेण्याविषयी भरीला पाडले.
ताई महाराज या काहीशा अविवेकी व कमकुवत मनाच्या होत्या. त्यांनी लोकमान्यांना डावलून नागपूरकरांचा पक्षच उचलून धरला. एवढेच नव्हे तर दुसरे दत्तक विधान करण्यास त्यांनी मान्यता दिली. तारीखही ठरली. पुण्याचे कलेक्टर मि. अस्टनसाहेब यांचीही त्या मंडळीना फूस होती. कारण त्यांना टिळकांन कुठेतरी गोवायचे होते. आणि इथेच ठिणगी उडाली.......
लोकमान्यांचे हेरखाते अत्यंत कार्यक्षम होते. त्यांच्याकरवी लोकमान्यांना वाड्यातील बित्तमबातमीचा सुगावा लागायचा. दत्तक विधान झाल्यावर १५ दिवस होतात न होतात तोच लोकमान्य कामाला लागले. विघ्नसंतोषी मंडळीचा डाव हाणून पडायचा, जगन्नाथाला संरक्षण द्यायचे आणि बाबामहाराजांच्या इस्टेटीचे जतन करायचे हा त्यामागे लोकमान्यांचा हेतू होता. थोडक्यात म्हणजे मरणसमयी बाबामहाराज पंडितांनी जी जबाबदारी सोपवली होती व जी लोकमान्यांनी स्वीकारली होती, तिचे प्रमुख ट्रस्टी या नात्याने पालन करायचे. ११, १२, व १३ जुलै या काळात लोकमान्यांवर अतिशय ताण पडला. त्या तीन दिवसांत गायकवाड वाड्यातून अनेक तारा व पत्रे बाहेर पडली. त्यानंतर सतत हे सत्र चालूच राहिले. त्यापैकी लोकमान्यांच्या हस्ताक्षरातील बऱ्याच स्थळप्रती माझ्याकडे आहेत. लोकमान्यांचे हस्ताक्षर किती वळणदार होते हे त्यावरून कळून येते.
त्यांचा अभ्यास करता असे लक्षात येते की ११ जुलै रोजी कोल्हापूरच्या सबनीस दिवाणांना लोकमान्यांनी तीन तारा केल्या, आणि त्याच दिवशी त्यांनी एक सविस्तर पत्रही पाठवले. या सर्व पत्र व्यवहारातील आशय असा होता, की इकडे जगन्नाथाला बाजूला सारून दुसरे दत्तक विधान करण्याचा घाट घातला जात आहे. ट्रस्टींच्या संमतीने औरंगाबादला दान प्रतिग्रह होवून दत्तक विधानाचा करार रजिस्टर झालेला आहे. त्यानुळे दुसऱ्या कोणास दत्तक घेतल्यास ते बेकायदेशीर ठरेल म्हणून दुसरे दत्तक विधान झाले तर आम्हाला कसून भांडावे लागेल.
लोकमान्यांची भाषा सडेतोड होती. प्रसंगी ते कसा आक्रमक पवित्रा घेत हेच यावरून दिसून येते. अशीच तंबी त्यांनी बाळामहाराज व पंडित महाराज यांनाही दिली होती. १२ जुलै रोजी सबनिसांच्या पत्रात लोकमान्य म्हणतात, “ट्रस्टी हे अतिशय निस्वार्थीपणे आपले कर्तव्य बजावत आहेत. तरी एकदा कोल्हापूर सरकारने आमची बाजू ऐकून घेतल्याशिवाय कोणतेही हुकुम करू नयेत. असे झाल्यास विनाकारण फिर्यादीअर्यादी होवून त्या भांडणापायीच सर्व इस्टेटीचा नाश होईल.”
ज्या दिवशी दत्तक विधान झाले त्याच दिवशी, म्हणजे २८ जून १९०१ रोजी ताई महाराजांनी जगन्नाथाच्या जनक वडिलांना – श्री. भाऊसाहेब देव निधोनेकरांना- खालीलप्रमाणे पत्र लिहून दिले होते –
“आपण आमच्या विनंतीस मान देवून आपला मधला मुलगा जगन्नाथ यास बाबा महाराजांचा वारस म्हणून आम्हास दत्तक दिलात, त्याचे आम्ही सर्व प्रकारे पुत्राप्रमाणे परिपालन करू, तोच खरा इस्टेटीचा अधिकारी आहे. त्याच्याशिवाय दुसरा दत्तक आम्ही घेणार नाही.”
असे लिहून दिल्यावरही ताई महाराज बदलल्या व दुसरा दत्तक घेण्यास प्रवृत्त झाल्या. त्यामुळे १२ जुलैच्या रात्री एक मोठा बाका प्रसंग उद्भवला...... १२ जुलैच्या रात्री बाळा महाराजांचा दत्तक विधी उरकून घ्यायचा असे नागपूरकर व त्यांच्या मंडळींनी ठरवले होते. या निर्णयाची चाहूल रात्री ११ वाजेपर्यंत कोणालाच लागू दिलेली नव्हती. पण जसे ११ वाजत आले तशी गडबड सुरु झाली. उपाध्यायाला दत्तक विधीची तयारी करण्याची आज्ञा झाली. तो उपाध्याय मोठा हुशार होता. त्याने एक युक्ती केली. वाड्यात कडेकोट बंदोबस्त होता. कोणाला बाहेर जाऊ दिले जात नव्हते व कोणाला आत घेतले जात नव्हते. ‘दत्तक विधीची पोथी घरी विसरलीय, ती घेवून येतो.’ आसे सांगून त्याने घरी जाण्याची नागपूरकरांकडून परवानगी मिळवली. तो घरी न जाता तडक कारकुनाकडे गेला आणि १२ वाजता दत्तक विधी होणार असल्याची त्याने वर्दी दिली. कार्कूनही टिळकांच्याच बाजूचा होता, तितक्या रात्री झपझप पावले टाकत तो टिळकांकडे जाऊन पोचला. लोकमान्य बाळासाहेब नातुंकडे गेलेले होते. कारकुनाची स्वारी तिथे पोहचली. टिळकांन बातमी समजताच त्यांनी व नातूंनी ठरवले, कि लगोलग वाड्यात जायचे वआणि विघ्नसंतोषी मंडळींचा डाव हाणून पाडायचा, मग ते तिघे वाड्याकडे आले. वाडा बंद होता, आत येण्यास मनाई होती. पण कारकुनाने मोठ्या हुशारीने ‘दत्तकाची पोथी घेवून आलोय, दार उघड.’ असे दर्वानाला फर्मावले. त्याबरोबर दिंडी दरवाजा उघडला गेला. टिळक आणि नातू कोपऱ्यावरच उभे होते. कारकुनाने एक पाय आत आणि दुसरा पाय दिंडी दरवाजा बाहेर ठेवून टाळी वाजवली. त्याबरोबर लोकमान्य आत घुसले. त्यांना पाहताच दरवान दचकला. लोकमान्य लगबगीने तडक आतल्या चौकात जाऊन उभे राहिले आणि आपल्या करड्या आवाजात त्यांनी नागपूरकरांना हाक मारली. “नागपूरकर!” त्यावेळी ते दत्तक विधानाची पूर्वतयारी करत होते. पण टिळकांच्या आकस्मिक आगमनामुळे दत्तक विधानाचा बेत आपोआपच रद्द झाला... या प्रसंगातून लोकमान्यांची धाडसी वृत्ती, त्वरित निर्णय घेण्याची शक्ती आणि कार्यतत्परताच दिसून येते.
याप्रकरणी लिहिलेल्या एका पत्रावर इंग्लिश मध्ये ‘बाळ गंगाधर टिळ’ अशी स्वाक्षरी आहे, तर काही परतात ‘बी.जी.टी.’ अशी अक्षरे आहेत. या सर्व पत्रातून लोकमान्यांच्या कडक व सौम्य अशा दोन्ही रूपांचे दर्शन घडते. बाबामहाराजान्न दिलेला शब्द पाळणे, आपल्या निर्णयाशी ठाम राहणे आणि कर्तव्याची जाणीव ठेवणे हे त्यांचे स्वभाव विशेषही उठून दिसतात. लंडनच्या प्रीव्ही कौन्सिलमध्ये १९१५ मध्ये अपिलाचा निकाल लागून जगन्नाथ महाराजांचे दत्तक विधानही शाबित झाले.त्यामुळे लोकमान्यांच्या कामात भरच पडली. आता सरकार दरबारी जगन्नाथ महाराजांचे नाव लावणे, जमिनीच्या ७/१२ च्या उताऱ्यावर त्यांच्या नावाची नोंद करणे, कोर्ट ऑफ वार्डस ताब्यातील इस्टेट सोडवणे, यासाठी त्यंची धडपड सुरु झाली. यातला बराचसा पत्रव्यवहार स्वतः लोकमान्यांनीच केलेला आहे, स्थावर मिळकतीच्या सनदांवर अर्जदार म्हणून लोकमान्यांचेच नाव आहे, त्यापैकी बऱ्याच सनदा अजूनही माझ्याकडे आहेत.
लोकमान्यांनी अशा प्रकारे माझ्या वडिलांसाठी अपार कष्ट सोसले. पण ते सर्व आपुलकीने व कर्तव्यबुद्धीने! याचे कारण म्हणजे लोकमान्यांनी माझ्या वडिलांना आपला तिसरा मुलगाच मानले होते.
----------
लेखक - बाळ. ज. पंडीत
संकलन - प्रा. र. भ. वनारसे
वरील लेख, श्री. वैभव तुपे यांनी टंकित केल्याबद्दल त्यांचे आभार.

No comments:
Post a Comment