तिरंगा ध्वजाचे तिकिट
१५ आॅगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. त्यावेळेस पोस्ट तिकिटे म्हणून ब्रिटिश तिकिटे वापरात होती. कारण तेंव्हा स्वतंत्र भारताची अशी नवीन तिकिटांची छपाई झालेली नव्हती. मग त्यावेळी काही काळ 'जयहिंद' असा पोस्टचा शिक्का दिल्ली येथे वापरला जात होता. १५ डिसेंबर १९४७ रोजी अशोक स्तंभाचे तीन सिहांचे तिकीट आणि भारतीय तिरंगा ध्वजाचे अशी दोन तिकिटे छापण्यात आली. त्यावर १५ ऑगस्ट १९४७ आणि 'जयहिंद' असे छापण्यात आले आहे. तसेच १५ ऑगस्ट १९४७ ला जे भारतीय तिरंगा झेंडा असलेले तिकीट काढण्यात आले ते परदेशीय टपालासाठी वापरण्यात येत असे. जेणे करून जगाला तिरंगी ध्वजाची ओळख व्हावी.
मॅडम कामा, राजेंद्र प्रसाद
स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतीकारक मॅडम भिकाजी कामा ह्यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने भिकाजी कामा यांचे छायाचित्र असणारे तिकीट काढण्यात आले. तसेच मलेरिया निर्मूलन कार्यक्रमाच्या प्रसारासाठी ७ एप्रिल १९६२ रोजी डांसाद्वारे होणाऱ्या मलेरियाच्या औषध निर्मितीचे आणि डांसांचे चित्र या तिकिटावर चित्रांकित करण्यात आले आहे. १३ मे १९६२ रोजी स्वतंत्र भारताचे पाहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद हे आपल्या पदावरून निवृत्त झाले. त्यांच्या सन्मानार्थ १५ पैसे किमतीचे डॉ. राजेंद्र प्रसाद यांचे चित्र असलेले तिकिट प्रकाशित करण्यात आले. २५ मार्च १९६२ रोजी देशभक्त जी. एस. विद्यार्थी यांच्या स्मरणार्थ तिकिट प्रकाशित करण्यात आले.
प्राचीन आणि आधुनिक काळातील तिकिटे
६ मे १९६१ या दिवशी देशभक्त आणि राजकीय नेते मोतीलाल नेहरु यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने त्यांच्या सन्मानार्थ त्यांचे छायाचित्र असलेले तिकिट प्रकाशित करण्यात आले.
प्रफुल्ल चंद्र रे या भारतीय शास्त्रज्ञाच्या जन्मशताब्दी निमित्त तिकीट काढून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. १४ नोव्हेंबर १९६१ रोजी दिल्लीत भरविण्यात आलेल्या भारतीय औद्योगिक प्रदर्शनाच्या निमित्ताने तिकीट काढून भारतातील वाढणाऱ्या उद्योगांचे कौतुक करण्यात आले. तसेच २१ नोव्हेंबर १९६१ रोजी भारतीय शास्त्रीय वनसंरक्षण विद्येच्या शताब्दी निमित्ताने तिकीट प्रकाशित करून या विद्येचा गौरव करण्यात आला. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या शताब्दीच्या निमित्ताने १४ डिसेंबर १९६१ रोजी पितळखोरे येथील यक्षाच्या प्रतिमेचे तिकीट काढण्यात आले.
नवी दिल्लीतील स्मारके
१८५६ पासून १९२६ पर्यंत भारतीय तिकिटांची छपाई लंडनमध्ये होत असे. १९२८ मध्ये नाशिक येथे सिक्युरिटी प्रेस स्थापन झाल्यावर तेथे भारतीय तिकिटांची छपाई सुरू झाली.
प्रारंभी राज्यकर्त्यांच्या छायाचित्रांची तिकिटे छापली जात असत.१९३१ मध्ये नवी दिल्ली ही भारताची राजधानी म्हणून जाहीर झाल्यावर दिल्लीतील अनेक दृष्ये व स्मारके दाखवणारी अनेक तिकीटे छापण्यात आली. १९३५ मध्ये पंचम जॉर्ज बादशाहांचा रौप्य महोत्सव होता. त्यानिमित्त पुन्हा अश्या प्रकारची तिकिटे छापण्यात आली. त्यानंतर पाहिले महायुद्ध संपले. या आनंदप्रित्यर्थ १९४६ मध्ये चार तिकिटांचा एक संग्रह छापण्यात आला.
पंचायत राज
स्वातंत्र्यानंतर स्वयंभू होण्यासाठी भारतात अनेक नवीन प्रकल्पांच्या उभारणीचे काम सुरू होते. अशाच एका प्रकल्पाचे म्हणजेच असाम राज्यातील गुवाहाटी येथील पहिल्या तेल शुद्धीकरण कारखान्याचे उद्घाटनाच्या निमित्ताने पोस्ट खात्याने या प्रकल्पाचे तिकीट काढले. २६ जानेवारी १९६२ रोजी केंद्र सरकारने पंचायत राजची स्थापना केली. भारतातील सर्व ग्रामीण भागांमधील ग्रामपंचायतींना अधिकार व
प्रदान केले. त्यानिमित्त तिकीट प्रकाशित करण्यात आले. या तिकिटावर ग्रामपंचायत, सरपंच आणि सदस्य काम करीत आहेत आणि मागच्या बाजूला भारतीय संसद आणि भारताचा नकाशा दाखविण्यात आला आहे.
भारतीय वास्तुकलेची तिकीट मालिका
१९४९ मध्ये भारत सरकारने भारतीय वास्तुकला या विषयावर बऱ्याच तिकिटांची मालिका प्रस्तुत केली. भारतातील परंपरागत उत्कृष्ट वास्तुकलेचे नमुने समाजासमोर असावेत म्हणून उत्कृष्ट वास्तुकलेच्या तिकिटांची ही कल्पना! वास्तुकलेसंदर्भात प्रथमच ही कल्पना राबविण्यात आली. त्यात अजिंठा, वेरूळ, कोणार्क, त्रिमूर्ती, बोधिसत्व, नटराज, रांची स्तूप, बोधिगया मंदिर, भुवनेश्नर मंदिर, सुवर्ण मंदिर, अमृतसर विजयस्तंभ, चितोडगड, लालकिल्ला दिल्ली, ताजमहाल आग्रा, कुतुबमिनार इत्यादी १, २, ५ आणि १० रुपये किमतीची या मालिकेतील ही तिकिटे आहेत. तर १५ रुपये किमतीची पालिताना जैन मंदिराचेही तिकीट काढण्यात आले आहे. ही वास्तुकला व वास्तूंची तिकिटं भारतीय जनतेसाठी रोजच्या वापरासाठी प्रकाशित करण्यात आली. ही पहिली असंदिग्ध म्हणजे डेफिनेटीव्ह अशी तिकिटांची मालिका होती.
टंकन:-सौ.अभिलाषा शिंपी
धोंडो केशव कर्वे जन्मशताब्दी
1958 साली वायुदलाच्या रौप्य महोत्सवानिमित्त वापीती आणि हंटर ह्या विमानांची चित्रे असलेली 90 पैशांची तिकिटे काढण्यात आली. थोर स्त्री उद्धारक आणि शिक्षण तज्ज्ञ महर्षी धोंडो केशव कर्वे ह्यांच्या जन्म शताब्दी निमित्ताने ते हयात असताना त्यांचे छायाचित्र असलेले तिकीट भारत सरकारने प्रकाशित करून त्यांचे अभिनंदन केले. त्यांच्या जिवंतपणी हे तिकीट प्रकाशित केले गेले. एखाद्याच्या जिवंतपणी प्रकाशित असे हे एकमेव तिकीट आहे. 1959 साली नवी दिल्ली येथे भरलेल्या जागतिक शेतीविषयक माहितीच्या प्रदर्शनानिमित्त भारत सरकारने तिकीट प्रकाशित केले आहे. त्या तिकिटावर शेती नांगरणारा भारतीय शेतकरी दाखवण्यात आला आहे.
पहिले पोस्टाचे तिकीट
तिकीट लावून पाठवण्याची व्यवस्था सुरु झाली तेव्हा जगातले पहिले तिकीट इंग्लंडमध्ये'पेनी ब्लॅक' नावाने 6 मे 1840 रोजी प्रचारात आले. तर भारतात इंग्रजी राजवट असतांना सिंध प्रांताचे कमिशनर मि. वार्टल परियर यांनी सिंध प्रांतापुरते 'सिंध डॉक्स' नावाने पहिले तिकीट 1852 मध्ये काढले. हे केवळ भारतातील नव्हे तर संपूर्ण आशिया खंडातले पहिले तिकीट ठरले. पहिले अखिल भारतीय तिकीट 1854 मध्ये अर्ध्या आण्याचे निळ्या रंगाचे तिकीट छापण्यात आले. त्यावर व्हिक्टोरिया राणीचे चित्र होते. त्यानंतर 1 आणा, 2 आणे व 4 आण्यांची तिकिटे छापण्यात आली.
प्राचीन संदेश वाहक
जगभरात पूर्वीपासून टपाल व्यवस्था अस्तित्वात होती. पोस्ट खाते जरी त्यावेळेस नव्हते तरी संदेश पोहचवणारे राजे महाराजे यांचे दूत होतेच. प्रसिद्ध महाकवी कालिदास यांनी लिहिलेल्या काव्यात शकुंतला दुष्यंन्त राजाला पत्र लिहितानाचे वर्णन आलेले आहे. तेच दृश्य पोस्ट खात्याने 1960 साली काढलेल्या एका तिकिटात दर्शवले आहे. तसेच कालिदासाच्या मेघदूत काव्यात ढगांद्वारे यक्षाने आपल्या प्रेयसीस संदेश पाठविला असे वर्णन आहे. हे वर्णन चित्ररुप करून असे दृश्य असणाऱ्या तिकिटाचे प्रकाशन करून श्रेष्ठ कवी कालिदास यांचा गौरव करण्यात आला आहे. तसेच प्रसिद्ध कवी तिरुवेलूवर आणि सुब्रमण्यमभारती यांची यावर्षी दोन तिकीटे प्रकाशित केली गेली.
रेडक्रॉस, बालदिन, विद्यापीठ
1957 मध्ये झालेल्या 19 व्या आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस संमेलननिमित्त रेडक्रॉसचे संस्थापक हेनरी ड्युनंट यांचे छायाचित्र असलेले तिकीट काढण्यात आले. 1957 सालापासून भारताचे पहिलेे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन हा बाल दिन म्हणून सर्व भारतभर साजरा करण्यात येऊ लागला. या बाल दिनाच्या निमित्ताने 8 पैसे किमतीचे तिकीट हस्तकला या विषयावर आधारित अशी तीन तिकिटे काढण्यात आली. भारतीय लोखंड उद्योग शताब्दी निमित्त 15 पैशांचे तिकीट काढण्यात आले. मुंबई, कोलकाता आणि मद्रास विद्यापीठाच्या चित्राची तिकिटे प्रकाशित करण्यात आली. पुढे दर वर्षी ह्याच तारखेला विविध प्रकारची तिकिटे तिकिटे प्रकाशित केली गेली.
पहिली विमान टपाल सेवा
जगप्रसिध्द इंजिनीयर सर डॉ.एम विश्वेश्वरय्या यांची जन्म शताब्दी 1960 साली साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने त्यांचे छायाचित्र असलेले तिकीट प्रकाशित करून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. युनिसेफच्या बालक दिन फंडाच्या निमित्ताने 15 पैसे किमतीचे तिकीट प्रकाशित केले गेले. त्यावर आनंदित झालेली लहान मुले दर्शविण्यात आली आहेत. 1911 साली पहिल्यांदा विमानाने टपाल पाठविण्याची सुरुवात झाली होती. अलाहाबाद ते नैनी ह्या मार्गावर हि सेवा सुरु करण्यात आली होती. ही सेवा सुरू होऊन 1961 साली पन्नास वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्ताने एकंदर तीन तिकिटांचा संच काढण्यात आला. 5 पैसे, 15 पैसे आणि 1 रुपया किमतीची हि तिकिटे होती. त्यावर एअर इंडिया बोईंग 707, जेट लायनर इत्यादी विमाने दर्शवली होती.
टंकन:-अमोल शिंपी
संकलन:-सौ.मंजिरी होनकळसे
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
No comments:
Post a Comment