Wednesday, July 5, 2017

स्टेडियम-माहिती

सेडॉन पार्क स्टेडीयम
-------------------------
सेडॉन पार्क स्टेडीयम हे मैदान न्यूझीलंड मधील हॅमिल्टन या शहरात आहे. हॅमिल्टन हे न्यूझीलंड मधील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. तसेच तेथील सुरेख वातावरणामुळे व्हिलेज ग्रीन या नावाने हे शहर प्रसिद्ध आहे. येथील निसर्ग सौंदर्यामुळे पिकनिक स्पॉट म्हणून अनेक निसर्ग प्रेमी येथे सहलीला येतात. येथील सेडॉन क्रिकेट स्टेडीयम हे न्यूझीलंडमधील दोन नंबरचे सर्व सुखसोयींनी समृद्ध असे मोठे मैदान आहे. न्यूझीलंडचे माजी पंतप्रधान रिचर्ड जॉन सेडॉन यांचे नाव या स्टेडीयमला देण्यात आले आहे. हे स्टेडीयम ट्रस्ट बँक पार्क म्हणूनही ओळखले जाते. तसेच वेस्टपॅक ट्रस्ट पार्क आणि वेस्ट पॅक पार्क अशा प्रकारची त्यातील काही भागांना नावे देण्यात आली होती. परंतु २००६ साली वेस्टपॅक ट्रस्ट बँक न्यूझीलंड यांनी ठरवले कि प्रत्येक खेळाच्या वेगवेगळ्या प्रकारासाठी मैदानाचे वेगवेगळे भाग आणि त्यासाठी वेगवेगळे प्रायोजक असण्यापेक्षा हि सर्व नावे मागे घेवून फक्त सेडॉन पार्क याच नावाने हे स्टेडीयम ओळखले जाईल. २००६-२००७ पासून या स्टेडीयम चे सेडॉन पार्क हेच नाव निश्चित करण्यात आले. सेडॉन पार्क या मैदानाचा आकार हा संपूर्णतः गोल आहे. क्रिकेट मैदानाच्याच दृष्टीने मग या मैदानावर क्रिकेटसाठी लागणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सेडॉन पार्क हे मैदान अतिशय उत्तम तऱ्हेच्या हिरवळीने सजवलेले मैदान आहे. या हिरवळीवर मध्यभागी नऊ धावपट्ट्या तयार करण्यात आल्या आहेत. जेणेकरून सरावासाठी किंवा सामन्यांसाठी आलटून पालटून उत्कृष्टपणे तयार केलेल्या धावपट्टीवर खेळता यावे. या सर्व धावपट्ट्या या दक्षिणोत्तर आहेत. फलंदाजी साठी उत्कृष्ट अशा या धावपट्ट्या आहेत या मैदानाच्या बाहेरच्या बाजूने उंच आणि भव्य असे कुंपण घातलेले आहे. समोरच्या बाजूला धावफलक असून त्यावर खेळणाऱ्या संघांच्या खेळाडूंची नावे उद्धृत केलेली असतात. तसेच धावांचा बदलता निर्देशही  त्यावर असतो. हे मैदान क्रिकेट प्रमाणे इतर अनेक खेळ आणि कार्यक्रमांसाठी उपयोगात आणले जाते. क्रिकेटचा मोसम नसतांना तेथे हॉकी, रग्बी आणि रग्बी लीग यांचे सामने घेतले जातात. याशिवाय अनेक समारंभासाठी या मैदानाचा उपयोग केला जातो. या मैदानाची पाणी निचरा होण्याची पद्धत हि आधुनिक पद्धतीने तयार करण्यात आली असून ती उत्कृष्टपणे कार्यक्षम असल्यामुळे मैदानावर पाणी साठून राहात नाही. येथे आंतरराष्ट्रीय, एकदिवसीय आणि प्रथम श्रेणीचे सामने खेळले जातात. नऊ एकदिवसीय आणि पाच कसोटी सामने येथे खेळविले गेले आहेत.

रणसिंगे प्रेमदासा स्टेडीयम
------------------------------
रणसिंगे प्रेमदासा स्टेडीयम हे क्रिकेटचे मैदान असून ते श्रीलंकेत कोलंबो येथे आहे. जून १९९४ च्या आधी हे स्टेडीयम खेत्तारमा क्रिकेट स्टेडीयम या नावाने ओळखले जात असे. आज हे मैदान श्रीलंकेतील खेळाडूंसाठी एक प्रमुख मैदान म्हणून ओळखले जाते. श्रीलंकेचे माजी अध्यक्ष रणसिंगे प्रेमदासा यांच्या कल्पनेतून साकार झालेलं हे स्टेडीयम आहे. ३५००० आसन क्षमतेच्या श्रीलंकेतील सर्वात मोठ्या स्टेडीयम च्या निर्मितीची धुरा रणसिंगे प्रेमदासा यांनी पुढाकार घेवून सांभाळली. श्रीलंका बी संघ आणि इंग्लंड बी संघ यांच्या पहिल्या सामन्याने या स्टेडीयम चे उद्घाटन करण्यात आले होते. हे स्टेडीयम एक पाणथळ जागेवर बांधण्यात आलेले आहे. स्टेडीयम बांधण्याच्या पूर्वी खेत्तारमा मंदिरात जाणारे भक्त या जागेतून जातांना बोटीचा वापर करून पलीकडे जात असत. या मैदानावरील पहिल्या आंतर राष्ट्रीय एकदिवसीय सामन्याचे उद्घाटन ५ एप्रिल १९८६ रोजी श्रीलंका विरुध्द ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्याने झाले. यावेळची या मैदानावरील एक अविस्मरणीय घटना म्हणजे येथे ९५२/६ अशा धावा काढून सर्वोच्च जागतिक विक्रम नोंदवण्यात आला. १९९७-१९९८ साली खेळण्यात आलेल्या या सामन्यात सनथ जयसूर्या याने ३४० धावा तर रोशन महानामा याने २२५ धावा काढल्या. दुसऱ्या विकेट साठी या दोघांची भागीदारी ५७६ धावांची होती. अजूनही हा सामना जागतिक विक्रम जपणारा आहे. या मैदानाची धावपट्टी संथ असल्यामुळे येथे चेंडू उसळतो. या मैदानाच्या मागच्या बाजूला ट्रेनिंग सेंटर सुरु करण्यात आले असून सरावासाठी येथे १६ धावपट्ट्यांची उभारणी करण्यात आलेली आहे.  २००३ साली खेळाडूंसाठी सुरु करण्यात आलेल्या सोनी मॅक्स क्रिकेट अकॅडमीतील खेळाडूंसाठी येथे राहण्याची आणि निवासाची सोय करण्यात आली आहे.

सेंट जेम्स पार्क स्टेडीयम
----------------
सेंट जेम्स पार्क स्टेडियम हे मैदान इंग्लंड मधील न्यूकॅस्टल येथे आहे. न्यूकॅस्टल युनायटेड फुटबॉल क्लब चे १८३२ पासून ते होम ग्राउंड आहे. इंग्लंडच्या उत्तर पूर्व भागातील हे सर्वात मोठे आणि सर्वात जुने फुटबॉल स्टेडीयम आहे. युनायटेड किंग्डम मध्ये असलेल्या फुटबॉल स्टेडीयम पैकी हे सातव्या क्रमांकाचे मोठे स्टेडीयम आहे. या स्टेडीयमची आसन क्षमता ५२३८७ आहे. न्यूकॅस्टल च्या मध्यभागी हे स्टेडीयम आहे. या स्टेडीयमच्या नुतनीकरणाच्या विषयाबद्दल दोन वेळा वाद झाले.स्थानिक निवासी व स्थानिक कौन्सिल यांच्यातील मतभेदांमुळे १९६० आणि १९९५ अश्या दोन वेळा हे नुतनीकरण वादग्रस्त ठरले. क्लब व स्थानिक फुटबॉल सामन्यांशिवाय अनेक आंतरराष्ट्रीय  फुटबॉल सामन्यांसाठी हे मैदान वापरण्यात आले आहे. २०१२ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक साठी तसेच २०१८ मध्ये होणाऱ्या फुटबॉल वर्ल्ड कप साठी आणि २०१५ मध्ये होणाऱ्या रग्बी वर्ल्ड कप साठी या मैदानाची निवड करण्यात आली आहे. तसेच हे मैदान फुटबॉल च्या चॅरिटी सामन्यांसाठी आणि टेलेव्हिजनच्या रिऍलिटी शोसाठी वापरण्यात येते. प्रारंभी या मैदानाची आसन क्षमता ३०००० होती. न्यूकॅस्टल युनायटेड चे सर्व खेळाडू १९०४ पासून लाल आणि पांढऱ्या रंगाचे कपडे घालूनच सामना खेळतात. १९०५ मध्ये या स्टेडीयमची आसन व्यवस्था बरीच वाढवण्यात आली. त्यामुळे आसनक्षमता वाढण्यास मदत झाली. त्याबरोबर काही कलात्मक गोष्टीही येथे वाढवण्यात आल्या. जुन्या कलेचा सांभाळ व्हावा म्हणून त्या दृष्टीने त्यांच्या संग्रहालयाची व्यवस्था येथे केली गेली आहे. याशिवाय एक मोठा तरण तलाव बांधण्यात आला असून तो पोहण्याचा सराव तसेच स्पर्धांसाठी उपयोगात आणला जातो. १९०८ मध्ये रग्बी लीग आणि ग्रेट ब्रिटन यांच्यात त्या मोसमातील रग्बीचा दुसरा सामना झाला. २३ जानेवारी १९०९ रोजी ऑस्ट्रेलियन कांगारू टीमशी येथे सामना झाला. १९२० ते १९३० च्या दरम्यान प्रसिद्ध आर्कीटेक्ट कडून आराखडा तयार करण्यात आला होता. परंतु त्यावरून झालेल्या वाद विवादामुळे तेथे फक्त लहान छत उभारण्यात आले. १९६० मध्ये सुरु झालेल्या बांधकामाविषयीचे वाद १९६६ पर्यंत सुरूच होते. नंतर या स्टेडीयम ची क्षमता ५३१४३ पर्यंत वाढविण्यात आली. त्यावेळी नवीन बांधकाम जुलै २००० मध्ये पूर्ण करण्यात आले.

द सिटी ऑफ मँचेस्टर स्टेडियम
------------------
द सिटी ऑफ मँचेस्टर स्टेडियम हे सीओएमएस किंवा ईस्टलँड स्टेडियम या नावानेही ओळखले जाते. हे स्टेडियम इंग्लंड मधील मँचेस्टर येथे आहे.  या स्टेडियमचे बांधकाम हे २००० समर ऑलिम्पिक आणि २००२ कॉमनवेल्थ गेम्स च्या निमित्ताने केले गेले. या प्रकल्पाला एकंदर ११० दशलक्ष पौंड इतका खर्च आला. फुटबॉल सामान्यांसाठी तयार करण्यात आलेले मैदान म्हणून त्या दृष्टीने या मैदानात बदल करण्यात आले. मँचेस्टर सिटी फुटबॉल क्लबचे हे मैदान होम ग्राउंड आहे. या मैदानाचा २५० वर्षांचा लीजचीझ करार झालेला आहे. या स्टेडियमचा आकार बाउल शेप मध्ये आहे. संपूर्ण ग्राउंड मध्ये दोन मजली बैठक व्यवस्था असून दोन बाजूंच्या स्टँड वर मात्र तीन मजली व्यवस्था करण्यात आली  आहे. १ जुलै २००८ नंतर युनायटेड किंग्डम मधील हे बारावे मोठे मैदान ठरले आहे. तर फा प्रीमियर लीग चे ते चौथे मोठे मैदान आहे. या मैदानाची आसन  क्षमता ४७७२६ आहे. ५ डिसेंबर २००९ रोजी झालेल्या फुटबॉल सामन्यांच्या वेळेस दर्शकांची सर्वोच्च उपस्थिती या मैदानावर नोंदवली गेली. या स्टेडियमचा कोनशिला कार्यक्रम पंतप्रधान टोनी ब्लेयर यांच्या हस्ते करण्यात आला. या मैदानाचा आर्किटेक्चरल आराखडा 'अरुप' यांनी काढलेला असून बांधकामाची जबाबदारी जॉन लाईंग यांच्याकडे सोपविण्यात आली होती. एकूण ११० दशलक्ष पौंड खर्चापैकी ७७ दशलक्ष पौंड खर्च इंग्लंड स्पोर्ट्स कडून देण्यात आला. कॉमनवेल्थ स्पर्धांसाठी या स्टेडियम वर तीन बाजूला अॅथलेटिक्स चे ट्रॅक तयार करण्यात आले होते. तर दुसऱ्या बाजूला तात्पुरता स्टँड उभारण्यात आला होता. जुलै २००२ च्या कॉमनवेल्थ स्पर्धांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने येथे पहिला जाहीर असा मोठा सार्वजनिक कार्यक्रम गजण्यात आला. क्वीन एलिझाबेथ २ यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सोहळा पार पडला. दहा दिवस चालणाऱ्या या स्पर्धांची, स्टेडियमची, अॅथलिट्स आणि रग्बी सामन्यांच्या खेळाडूंची येथे उत्तम प्रकारे व्यवस्था करण्यात आली. कॉमनवेल्थ स्पर्धांचे चार विक्रम या मैदानावर प्रस्थापित केले गेले. महिलांचे ट्रिपल जम्प्स आणि ५००० मीटरच्या स्पर्धा येथे घेण्यात आल्या. कॉमनवेल्थ स्पर्धांनंतर अनेक वाढीव कामं या मैदानावर सुरू करण्यात आली, जी फुटबॉल स्टेडियम साठी आवश्यक होती. ह्यात स्टँडची संख्या वाढवण्यात येऊन १२००० आसन क्षमतेची वाढ करण्यात आली. या नूतनीकरणासाठी ३० दशलक्ष पौंड खर्च आला. हा खर्च फुटबॉल क्लब तर्फे करण्यात आला.

टंकन:-श्री.वैभव तुपे

संकलन:-सौ.मंजिरी होनकळसे

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

1 comment: