नोबेलचे मानकरी
आल्फ्रेड बेअरनार्ड नोबेल
आल्फ्रेड बेअरनार्ड नोबेल हे एक जागतिक कीर्ती लाभलेले संशोधक आहेत. ते स्विडिश गृहस्थ होते. आल्फ्रेड नोबेल यांचा २१ ऑक्टोबर १८३२ रोजी स्टॉकहोम येथे जन्म झाला होता. इमॅन्यूएल नोबेल व आंद्रिएता आल्सेल या पती-पत्नीचे आल्फ्रेड नोबेल हे तिसरे अपत्य. आल्फ्रेड यांचे सगळ्यात मोठे भाऊ रॉबर्ट. रॉबर्ट यांनी रशियात खनिज तेलाचा मोठ्या प्रमाणावर कारखाना उभा केला होता. तर दोन नंबरचे लूटव्हिग यांनी सेंट पीटर्सबर्गला शस्त्रास्त्रांचा कारखाना काढला होता. वडील इमॅन्यूएल हे युद्ध साहित्याचे उत्पादन करीत असत. वडिलांचे आणि आल्फ्रेड यांचेही कोणत्याही प्रकारचे उच्चशिक्षण झालेले नव्हते. स्टॉकहोम मधील ‘सेंट याकोप्स हायर अॅपॉलॉजिस्ट स्कूल’ या शाळेत आल्फ्रेड यांचे वर्षभरच शिक्षण झाले. त्यानंतरचे
त्यांचे शिक्षण रशियन आणि स्विडिश शिक्षकांकडून घरीच झाले. मात्र अतिशय बुद्धिमान असलेल्या आल्फ्रेड यांच्या जवळ स्वयंशिक्षित असे ज्ञान आणि माहितीचे भंडार होते. त्यांना जर्मन, स्विडिश, इंग्रजी आणि रशियन भाषा चांगल्याप्रकारे येत होत्या. वडिलांना व्यवसायात बरेच नुकसान आले असता व्यवसाय पुन्हा उभा राहाण्यासाठी आल्फ्रेड यांनी त्यावेळेस वडिलांना चांगलीच साथ दिली. पुढे आर्थिक स्थिती सुधारल्यावर वडिलांनी शिक्षणासाठी आणि जगाचे ज्ञान होण्यासाठी आल्फ्रेड यांना परदेशी पाठविले. पुढील दोन वर्षे त्यांनी इटली, उत्तर अमेरिका, जर्मनी आणि फ्रान्स येथे दौरा केला. या अभ्यासदौऱ्यामुळे त्यांच्या ज्ञानात विविधांगानी भर पडली. तसेच पॅरिस येथे रसायनशास्त्राबद्दल त्यांनी बरेच ज्ञान मिळविले.
दोन वर्षांनंतर सेंट पीटर्सबर्गला परत आल्यावर आल्फ्रेड वडिलांच्या कारखान्यातच काम करू लागले. वडिलांबरोबर नायट्रोग्लिसरीन वर ते विविध प्रकाराने संशोधन करू लागले. आणि १८६२ मध्ये आल्फ्रेड यांनी नायट्रोग्लिसरीन संबंधातील पहिला स्फोट केला. त्यानंतर पार्कशन डिटोनेटरच्या शोधाचे पेटंट त्यांनी मिळविले. त्यानंतर स्वतंत्र कारखाना उभारला. पण त्यात स्फोट होऊन बरेच नुकसान झाले. त्यात त्यांच्या लहान भावाचे निधन झाले. त्यामुळे त्यांचे वडील फारच खचले होते. मात्र आल्फ्रेड यांनी धीर न सोडता त्यांनी नायट्रोग्लिसरीन तयार करण्यासाठी दुसरी कंपनी काढली. हे करताना अनेक अडचणींना तोंड देत त्यांनी आपला व्यापार अनेक देशांमध्ये विस्तारला. परंतु पूर्वी झालेल्या नायट्रोग्लिसरीन अपघातात आणि नायट्रोग्लिसरीनच्या साठ्याचे अनेकवेळा झालेले स्फोट लक्षात घेऊन आल्फ्रेड यांच्या कारखान्यांवर बंदी घालण्यात आली. ही अडचण लक्षात घेऊन आल्फ्रेड यांनी सुरक्षित स्फोटकांसाठी संशोधन सुरु केले आणि या संशोधनातूनच त्यांना जगप्रसिद्ध झालेल्या ‘डायनामाइट’चा शोध लागला.
कीझेलगूर आणि नायट्रोग्लिसरीन पासून डायनामाइट तयार करण्यात त्यांना यश आले होते. या सुरक्षित स्फोटक द्रव्यामुळे डायनामाइट प्रसिध्द झाले. आल्फ्रेड यांचे डायनामाइट त्यामुळे जगभर पसरले. आल्फ्रेड यांचा व्यापार प्रचंड स्वरुपात वाढला. या शोधामुळे आल्फ्रेड यांना संशोधक म्हणून प्रसिद्धी मिळाली. तरी त्यावर आणखी प्रयोग करून त्यात नाविन्य आणण्याचे आल्फ्रेड यांचे प्रयोग सुरूच होते.
डायनामाइटचा शोध आल्फ्रेड नोबेल यांना लागला. तो जगभर पसरला. पण आल्फ्रेड तेवढ्या शोधावर समाधानी नव्हते. डायनामाइट मध्ये असणारे काही दोष काढून टाकून आणखी चांगल्या स्वरूपाचे स्फोटक बनविण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. त्यात त्यांना चांगले यश सुद्धा मिळत होते. वेगवेगळ्या स्फोटकांची निर्मिती होत होती. आणि आल्फ्रेड त्याचे एकस्व मिळवत ही होते. धूर रहित आणि अधिक शक्तिशाली स्फोटकांचा शोध लावताना स्फोट घडवून आणण्यासाठी उपयोगी असेल अशा डिटोनेटरचा शोध सुद्धा त्यांनी लावला. हा शोध महत्त्वाचा मानला जातो. स्फोटकांबरोबरच आल्फ्रेड नोबेल यांनी बायॉलॉजी, इलेक्ट्रोकेमेस्ट्री, फिजिऑलॉजी इत्यादी विषयातही संशोधन केले आहे. डायनामाइट, स्फोटके आणि स्फोटक जिलेटीन या आल्फ्रेड यांच्या शोधामुळे या क्षेत्रातील पुढील संशोधन करणाऱ्यांना त्याची मदत झाली. तसेच खाणकाम क्षेत्रात या विस्फोटकांचा खूपच उपयोग झाला. त्यांनी आपल्या शोधासंबंधी ३६० च्या जवळपास पेटंट मिळविली होती. या मिळालेल्या पेटंटच्या साह्याने आल्फ्रेड यांनी अनेक देशात कारखाने उभारले. या कारखान्यांना होणाऱ्या प्रचंड प्रमाणातील नफ्यातून त्यांनी गडगंज संपत्ती मिळविली. चांगल्या कामासाठी निर्माण केलेल्या स्फोटकांचा विध्वंसक दुरुपयोग होत असलेला पाहून मात्र ते दुःखी झाले. बहुतेक त्यामुळेच त्यांनी आपल्या मृत्यूपत्रात आयुष्यभर जमविलेल्या प्रचंड संपत्तीचा विनियोग विधायक कार्यासाठी केला जावा असे नमुद केले. यातूनच नोबेल पारितोषिकाच्या कल्पनेचा जन्म झाला.
३६० च्या जवळपास स्वतःच्या संशोधनाचे पेटंट मिळवणारे थोर संशोधक आल्फ्रेड नोबेल यांनी आपल्या संशोधनाच्या द्वारे जगभरात अनेक कारखाने काढले. त्यातून भरपूर संपत्ती मिळविली. मागे अनेक व्याप वाढल्यामुळे १८८० ते १८९६ पर्यंत त्यांनी अनेक संकटे व कटकटी यांना तोंड दिले. लहानपणी प्रकृतीने नाजूक असणाऱ्या आल्फ्रेडला शेवटी तब्बेतीने बराच त्रास दिला. परंतु जिद्दीने सर्व सांभाळणाऱ्या नोबेल यांनी आपल्या मागे आपल्या सर्व संपत्तीचे नीट वितरण व्हावे म्हणून १८९५ मध्ये स्वतःचे मृत्यूपत्र लिहून ठेवले. १० डिसेंबर १८९६ रोजी सानरेमो, इटली येथे त्यांचे निधन झाले. १८९७ च्या जानेवारी मध्ये त्यांनी लिहिलेले मृत्यूपत्र जाहीर झाले. मृत्यूपत्राप्रमाणे त्यांच्या मालमत्तेतील मोठ्या हिस्स्यातून एक विश्वस्त निधी उभारण्यात येऊन त्या निधीद्वारे येणाऱ्या उत्पन्नातून दरवर्षी जागतिक पातळीवर पाच पारितोषिक देण्यात यावी; असा त्यात उल्लेख होता.
ही पारितोषिक मानव जातीसाठी अत्युच्च असे विधायक कार्य करणाऱ्या व्यक्तींना देण्यात यावीत अशी त्यांची इच्छा होती. या त्यांच्या इच्छेवर जगभरात प्रतिक्रिया उमटल्या. मृत्यूपत्र खरे आहे की नाही इथपासून त्यासंबंधी अनेक वादविवाद झाले. या अडचणीतून बाहेर येऊन मृत्यूपत्राची अंमलबजावणी करण्यासाठी नोबेल प्रतिष्ठान स्थापन करण्यात आले. त्याला सरकारची मान्यता मिळाली. पारितोषिकाबद्दल अनेक नियम व अटी ठरवून शेवटी वैद्यक, रसायनशास्त्र, भौतिक आणि साहित्य या चार पारितोषिकांचे हक्क स्वीडनकडे ठेवण्यात आले आणि पाचव्या शांततेच्या पुरस्काराचे हक्क नॉर्वे या देशाकडे ठेवण्यात येऊन आल्फ्रेड नोबेल यांच्या निधनानंतर पाच वर्षांनी १९०१ मध्ये या पाच क्षेत्रासाठी नोबेल पारितोषिक देण्यास सुरुवात झाली.
संकलन:-मंजिरी होनकळसे
टंकन:-अभिजित शिंदे
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा