Tuesday, December 6, 2016

भारतीय वाद्ये

काही तंतुवाद्ये व इतर प्रकारातील काही वैशिष्टयपूर्ण वाद्यांचा परिचय

असामान्य तारशहनाई

सर्वसाधारणपणे तंतुवाद्याच्या तळाशी पोकळ भोपळा किंवा लाकडी ठोकळा हा तारांच्या स्पंदनाच्या ध्वनीच्या वर्धनासाठी व माधुर्यासाठी वापरला जातो व सर्व तंतुवाद्याच्या हा एक अटळ व अत्यंत महत्त्वाचा भाग आहे . पंरतु या संग्रहालयात अत्यंत आगळेवेगळे व सहसा कोठेही  न आढळणारे असे तंतुवाद्ये आहे. त्याचे  नाव सुद्धा तारशहनाई असे वैशिष्टयपूर्णच  आहे.  जरी त्याच्या  नावात शहनाई शब्द असला तरी ते वाद्य नसुन मूलतः तंतुवाद्ये आहे . दिलरुबा किंवा सांरगी प्रमाणे हे गजाने वाजवितात . याला चार प्रमुख मुख्य तारा व आठ उप तारा असतात.

याचे सगळ्यात मोठे वैशिष्टय म्हणजे त्याच्या तळाला भोपळा किंवा लाकुड याचा वापर केलेला जात नाही . तर जुन्या  हिज मास्टर्स व्हॉईस  च्या ग्रामोफोनप्रमाणे याला पिकअप हेड व एक छोटा कर्णा आहे . त्याचा तपशील सोबतच्या फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहे .

या संग्रहालयात प्रतिवर्षी साधारणपणे एक लाख भारतीय व दीड ते दोन हजार परदेशी प्रवाशी भेट देतात. हे आपण या मालेतील पहिल्या लेखात  पाहिलेच आहे . मी या संग्रहालयात मार्गदर्शकव्याख्याता काम करीत असतांना अनेक उत्सुक व जाणकार प्रेक्षकांना या  वैशिष्टयाबद्दल विचारले असता, त्यापैकी  एकाही भारतीय वा परदेशीय प्रेक्षकांने असे वाद्ये अद्याप बाहेर कोठेही पाहिले नसल्याचे प्रांजळपणे सांगीतले . असे हे असामान्य व अमूल्य वाद्य या संग्रहालयाला प्रसिद्ध संगीतकार व आकाशवाणी कलावंत मधुकरराव गोळवलकर यांनी दिले आहे. हे वाद्ये आवर्जुन पाहावे .

या तंतुवाद्याव्यतिरिक्त या संग्रहालयात एक अत्यंत सुंदर  व मोहक अशी वीणा आहे . तिच्या तळाला  सुद्धा भोपळा किंवा लाकुड याचा वापर न करता शहामृग पक्ष्याचे अंडेच भोपळयाच्या जागी वापरले आहे.  त्याच्या जवळच विलादी नाद मंडल , बर्मीस स्वॅम , बिल्लु ,पट्टमा इत्यादी अत्यंत विलोभनीय व पशुपक्ष्यांच्या ,मत्स्याच्या बाह्य आकृतिसदृश्य इतर तंतुवाद्ये  आहेत . ती पाहण्यास विसरू नयेत.

ताल वाद्ये

तालवाद्यांना चर्मवाद्ये असे सुद्धा म्हणतात . कारण या प्रकारात मुख्यतः -

सुशिर वाद्ये

अगदी वर प्रसिद्ध बासरीवादक पन्नालाल घोष यांची बासरी आहे. चामडयाचा वापर करून ही वाद्ये बनाविली जातात . यामध्ये अंवडंबर ,घुमट ,खोल चौघडा, डंका, डफ, डमरू,डिडंम,ढोल, ढोलकी,तबला-डग्गा, दुंदुभी, नगारा,पखवाज , नौबत, मृंदग, संबळ ,  ताशा इत्यादी अनेक वाद्याचा समावेश होतो. यामध्ये लाकडाचे किंवा धातुचे  विविध आकाराचे पोकळ भांडे बनवून त्यावर जनावराचे कातडे चडवून ताणून बनविलेले असते  व तंतु वाद्यात तारेला ताण देण्यासाठी ज्या प्रमाणे खुंटया  असतात त्याप्रमाणे चामडीच्या वादीने ताण दिलेला  असतो .  व तो कमी जास्त करण्यासाठी लाकडी दंडगोलाचा उपयोग पाचरीप्रमाणे करून  छोटया पितळी हातोडीने  ही ठोकतात यालाच ते वाद्ये लावून घेणे म्हणतात. या संग्रहालयात जी वैशिष्टयपूर्ण तालवाद्ये आहेत,त्यामध्ये पंचमुख वाद्यम् हे प्रमुख आहे . त्या शिवाय विशेषतः बंगाल, मणिपूर भागात खोल म्हणून प्रचलित असलेले मृदंगासारखे वाद्य आहे. हे बहुधा मणिपुरी नृत्याच्या वेळी वापरले जाते . याचा विशेष म्हणजे याची  मुख्य घडण लाकूड किंवा धातूऐवजी काचेची केलेली असते . शिवाय ग्वाल्हेरच्या शिंदे सरकार कडील एक मोठा नगारा ,तीन तोंड़ी मृदंग म्हणजेच त्रिपुष्कर  इत्यादी वाद्ये बघण्या सारखी आहेत . महाराष्ट्रात लावणी व पोवाडे आदी लोकगीतामध्ये वापरला जाणारा डफ हा सर्व भारतभर आढळतो ,परंतु अरबी शब्द 'दफ' यावरून डफ हा शब्द सद्ययुगात तयार झाला असावा असा अंदाज आहे .

सुषिर वाद्ये

सुषिर म्हणजे पोकळ म्हणून वायुच्या साह्याने वाजवली जाणारी वाद्ये. मग ती तोंडाने हवा फुंकून असोत किंवा दुसऱ्या यांत्रिक मदतीने  असोत , त्यांना सुषिर वाद्ये म्हणतात .  ही वाद्ये अतिप्राचीन काळापासुन भारतामध्ये प्रसिद्ध आहेत यामध्ये अलगुज ,तुतारी ,बासरी , पावा, वेणू, मुरली, कर्णा , नादस्वरम्, पुंगी, शंख, शिंग, सनई म्हणजे शहनाई, सुंद्री,हार्मोनियम म्हणजेच बाजाची पेटी , ऑर्गन आदी वाद्ये व त्याचे अनेक उपप्रकार आहेत .
अलगुज , बासरी, वेणू, पावा, ही जवळपास एकाच वर्गातील वाद्ये आहेत . ही मुख्यतः पोखळ बांबुपासुन बनवितात . कित्येक वेळ पितळेच्या किंवा तांब्यापासुनसुद्धा बनविलेल्या असतात; परंतु बांबुपासुन बनविलेल्यांचाच मधुर ध्वनी येतो.  याला बहुधा आठ छिद्रे असतात व ती तापवलेल्या सळईने पाडतात या संग्रहालयात प्रसिद्ध बासरीवादक पन्नालाल घोष यांची बासरी बघण्यासारखी आहे. पुंगी हे नाव उच्चारताच आपल्या डोळयासमोर नाग, साप व त्यांना मोहविणारा गारूडी नजरे समोर येतो . देठाकडे निमुळता होत गेलेला कडू भोपळा घेवून त्याच्या रूंद बाजुस दोन भोके पाडून  दोन नळया पंधरावीस सेंटीमीटर लांबीच्या बसवतात. पुंगीचे सुर त्यातल्या त्यात भैरवीला जवळचे असतात. वास्तविक सर्प किवा नाग काना कर्णेंद्रिय  नसतात . त्यामुळे त्यांना श्रवणज्ञान होत नाही ; परंतु गारूडी पुंगी वाजवताना त्याच्या हालचालीकडे त्याचे एकचित्त लक्ष असते व तो गारूडयाच्या डोलण्याप्रमाणे डोलतो म्हणून आपणास तसे वाटते.

शंख, शिंग, भेरी हे धार्मिक अथवा युद्ध प्रसंगी पूर्वी वाजवित; परंतु सुषिर वाद्यातील सध्या सर्वात लोकप्रिय वाद्ये म्हणजे सनई किंवा शहनाई होय. सनईचा आवाज तिच्या अत्यंत कौशल्यपूर्ण घडणीवर अवलंबून असतो . म्हणून तिचे जिभाळ ,पावी ,नळी आणि अन्नस हे चारही भाग घडविणे अत्यंत कौशल्याचे व अनुभवाचे आहे.
 बिस्मिला खान दुर्गादासांनी बनवलेल्या शहनाईशिवाय दुसरी शहनाई वापरत नाहीत. त्यामुळे शहनाईसम्राट बिस्मिल्लाखॉ  यांच्या सनई वादनाबरोबरच ती बनाविणारे त्याचे कारागीर नाशिकचे दुर्गादासजी ठाकूर यांनासुद्धा फाय फाउंडेशनचा पुरस्कार मिळाला. कारागिरांच्या कलेला न्याय देणारे आहे .

हार्मोनियम जरी शास्त्रीय संगीताच्या दृष्टीने अधिक श्रुती वाजवू शकत नाही म्हणून गौण मानला गेला होता , तरी वाजविण्याची सुलभता या गुणामुळे हार्मोनियम पुन्हा खुप लोकप्रिय होत आहे . याची पायपेटी संगीत नाटकात किंवा जलशात जास्त करून वापरतात .

घन किंवा धातुवाद्ये

यांच्या नावावरून ध्यानात येईल, की पूर्णपणे धातुचीच वाद्ये आहेत  . झांजा , चिपळया, किंकिणी ,घुंगरू , घंटा ,जलतरंग , पोलादी त्रिकोण , खुळखुळे ,चिमटा व पियानो इत्यादी वाद्याचा समावेश होतो . पैकी टाळ , झांज्या , चिपळया  यांचा उपयोग मुख्यत्वे भजन,कीर्तन प्रसंगी ,घुंगरु  व किंकिणी नृत्यप्रसंगी , चिमटा हे पंजाब वैगेरे भागात लोकनृत्यात वाजवतात . विशेष म्हणजे बऱ्याच लोकांना पियानो ते पाश्चिमात्य वाद्य सुषिर आहे,असे वाटते ,परंतु ते एक धुतवाद्य आहे . अधिक माहितीसाठी  रसिकांनी पं.  वसंतराव खाडिलकर यांचा *श्री गंधर्ववेद * हा ग्रंथ पाहावा .

लेखक - ना. भा. आदमणे
संकलन - प्रा. र.भ. वनारसे

श्री. लाला तावडे यांनी हा लेख टंकित करून युनिकोडमध्ये उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे शतशः आभार.








No comments:

Post a Comment