Monday, December 12, 2016

परशुरामावतार (पुराणकथा व इतिहास )

मराठीत छापील स्वरूपातील माहिती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, ती माहिती आंतरजालावर युनिकोड स्वरूपात उपलब्ध करून देणे हा ज्ञानभाषा मराठी समूहाच्या #मराठीयुनीकोडिंग उपक्रमाचा उद्देश आहे. तुमच्याकडे देखील अशी जुनी, कोणत्याही विषयावरील ज्ञानवर्धक माहिती उपलब्ध असेल तर ९०५२३४४४७६ या क्रमांकावर संपर्क साधा.


या उपक्रमातील नववा लेख :

आश्रमामध्ये कार्तवीर्य एक दिवस गेला.तेव्हा परशुराम आश्रमामध्ये नव्हते.कार्तवीर्याने जमदग्नीची सवत्स गाय पळवून नेली.आश्रमामध्ये परत आल्यावर सर्व हकिकत परशुरामांना समजली होती.त्यांनी कार्तवीर्याचा वध करण्याची प्रतिज्ञा केली.त्यांचे वडील जमदग्नी यांनी हे वध करण्याचे कृत्य ब्राम्हणांना शोभत नाही,असे सांगितले ; परंतु प्रथम ब्रम्हदेव,नंतर शंकर यांची परवानगी घेऊन नर्मदेच्या तीरावर परशुरामांनी कार्तवीर्याबरोबर युद्ध केले.त्याचे सहस्त्र बाहू प्रथम तोडले,नंतर त्याचा वध केला.कामधेनू घेऊन परशुराम परत आले; परंतु जमदग्नीनी परशुरामांना बारा वर्षे तपश्चर्या करण्यासाठी,तसेच तीर्थयात्रा करण्यासाठी पाठवले, इकडे कार्तवीर्याचे मुलगे सूड घेण्यासाठी टपून बसले होते.परशुराम आता आश्रमामध्ये नाहीत, हे बघून त्यांनी जमदग्नीच्या आश्रमावर हल्ला केला.जमदग्नी ऋषी ध्यानस्थ बसले होते.त्या स्थितीतच त्यांचा वध केला. त्यांचे शीर तोडून घेऊन कार्तवीर्याचे मुलगे निघून गेले.परशुरामांना हे समजल्यावर त्यांनी एक विलक्षण प्रतिज्ञा केली - ज्या क्षत्रियांनी हे क्रुर कृत्य केले आहे, त्यांना शिक्षा झाली पाहिजे.त्यासाठी मी २१ वेळा पृथ्वी नि;क्षत्रिय करीन.

प्रथम त्यांनी कार्तवीर्याच्या मुलांचा समाचार घेतला.एकवीस वेळा मोहिमा त्यांनी आखल्या आणि क्षत्रियांचा वध केला.आपल्या २१ मोहिमांमध्ये परशुरामांनी अंग,वंग,कलिंग,विदेह,काश्मीर,कुंती,त्रिगर्त आदी अनेक देशातील राजांचा संहार केला. त्यामूळे अनेक क्षत्रिय कुळे नष्ट झाली होती.कित्येक राज्य सोडून गेले. कित्यकांनी नामांतर केले होते.परशुरामांनी अश्वमेध यज्ञ केला आणि सर्व भूमी व संपत्ती दान केली. कश्यपांना सर्व भूमी दान केली.
समाजासाठी ज्ञानी ब्राम्हण हवा तसा शासन करण्यासाठी क्षत्रियही हवाच ; परंतु परशुराम या भूमीवर आहेत, तोपर्यंत पुढे येऊन राज्य करण्याचे धाडस कोणी क्षत्रिय करणार नाही, हे कश्यपांनी ओळखले होते."हि भूमी तू मला दान केली आहेस . त्यामुळे ती माझी झाली आहे . यापुढे तुला या भूमीवर राहण्याचा अधिकार नाही," असे कश्यपांनी परशुरामांना सांगितले . परशुराम महेंद्र पर्वतावर निघून गेले.या पर्वतावरुन बाण सोडून त्यांनी समुद्र मागे हटवला आणि स्वतःचे परशुरामक्षेत्र तयार केले. वैतरणेपासून कन्याकुमारीपर्यंतच्या प्रदेशाला परशुरामक्षेत्र म्हणतात.

परशुराम हे अर्धावतार आहेत. राम - कृष्ण यांच्या पराक्रमाची वर्णने पुराणात केलेली आहेत, तशी परशुरामांच्या पराक्रमाची वर्णने केलेली नाहीत. परशुरामावताराची कहाणी सांगणारे स्वतंत्र पुराण नाही. 'परशुरामकल्पसूत्र' आणि 'परशुरामप्रताप' हे ग्रंथ त्यांच्या संप्रदायात आहेत.

त्रेतायुग आणि द्वापरयुग या दोन युगांच्या संधिकाळात परशुरामांचा अवतार झाला आहे . वैशाख शुद्ध तृतीया म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी परशुरामांचा जन्म झाला आहे . भार्गव कुलातील म्हणून त्यांचे नाव 'भार्गवराम' होते.तसेच , 'परशू' हे त्यांचे महत्त्वाचे अस्त्र होते.त्यामूळे त्यांचे परशुराम हे नाव रुढ झाले होते. या अवतारामध्ये विष्णूने प्रथम हातात शस्त्र घेतलेले दिसते. ते सुद्धा फेकून मारण्याचे, धारदार पात्याचे आहे . परशुरामांना वेगवेगळी ४१ अस्त्र वापरता येत होती ; तसेच धनुर्विद्याही प्रथम  शंकराने परशुरामांना शिकवली आणि त्यांनी या विद्येचा प्रसार केला, असे सांगतात. ब्राम्हणांचा संबंध ज्ञान, विद्या,अध्यापन पौरोहित्य यांपुरता होता. क्षत्रियांचे वर्चस्व वाढू लागले होते . ब्राम्हणांना ते कमी लेखत होते . अशा परिस्थितीत ब्राम्हण आणि ब्राम्हणांचे सामर्थ्य परशुरामांनी सिद्ध केले . परशुरामांना जसे अवतार मानले आहे , तसे चिरंजीवही मानले आहे. भार्गव कुळातील जमदग्नी आणि रेणुका यांना पाच मुलगे होते. सर्वात धाकटे परशुराम होते. परशुरामांचे मूळ नाव राम . भार्गव कुळातील म्हणून त्यांना भार्गवरामही म्हणत असत परशू हे अस्त्र त्यांना शंकराकडून प्राप्त झाले होते. परशूनेच त्यांनी कार्य केले असल्याने त्यांना 'परशुराम' हे नाव पडले. त्यांनी कश्यपांना गुरु करुन सर्व विद्या शिकून घेतल्या. त्यामध्ये धनुर्विद्या त्यांना अधिक आवडत होती. गंधमांधन पर्वतावर तप करुन त्यांनी शंकराला प्रसन्न करुन घेतले.

नर्मदा नदीच्या तीरावर हेहय कुळातील राजा कार्तवीर्य होता. त्याला सहस्त्रार्जुनही म्हणत. त्यांचे साम्राज्य नर्मदेपासून हिमालयापर्यंत पसरलेले होते. साहजिकच त्याला आपल्या सत्येचा आणि पदाचा अहंकार झाला. देव, ब्राम्हण यांचे अपमान करुन त्यांच्यावर अन्याय, जुलूम करीत असे. 'भार्गव कुलोत्पन्न परशुराम तुझे सहस्त्र बाहू तोडून तुझा वध करेल,' असा शाप वसिष्टांनी कार्तवीर्याला दिला होता.

अवतार या दृष्टीने परशुरामांचे कार्य आणि त्यांच्या जीवनातील घटनांचा अर्थ लावता येतो. परशुराम हे साधारण ७००० हजार वर्षापूर्वी झाले आहेत. रामाच्या पूर्वी १५००० वर्षे. परशू हे त्यांचे मुख्य हत्यार होते. त्यापासून रामापर्यंत धनुष्य हे शस्त्र विकसित झाले असावे. ब्राम्हण आणि क्षत्रिय हे तेव्हा समाजातील दोन महत्त्वाचे वर्ग होते; परंतु काही वर्षांनी क्षत्रियांना आपली सत्ता, अधिकार आणि पराक्रम यांचा गर्व झाला होता. आपल्या पराक्रमाचा त्यांना अहंकार झाला होता. वेदविद्येमध्ये मग्न असणा-या आणि पौराहित्य करणा-या ब्राम्हणांना ते तुच्छ मानत होते. त्यांच्यावर प्रसंगी अन्यायही करत होते. ब्राम्हण संघटित नव्हते. लढाई करुन प्रतिकार करत नव्हते. ब्राम्हणांचे आश्रम नष्ट करणे, हा त्यातलाच एक भाग होता. ब्राम्हणांच्या स्त्रियांनाही पळवून नेत होते. वसिष्ठ आणि जमदग्नी यांच्या आश्रमातील कामधेनू कार्तवीर्यने पळवून नेली. याचा अर्थ, ती प्रत्यक्ष गाय नसून आश्रमातील स्त्री असावी. कार्तवीर्याचे सहस्त्र बाहू हे त्याच्या सामर्थ्याचे आणि एकूणच क्षत्रियांच्या सामर्थ्याचे प्रतीक आहे. ब्राम्हणांचे समाजव्यवस्थेतील स्थान क्षत्रियांइतके महत्त्वाचे आहे , हे सिद्ध करणेही आवश्यक होते. ते कार्य परशुरामांनी केले आहे. कार्तवीर्याच्या मुलांबरोबर युद्ध केल्यानंतरच्या मोहिमांमध्ये परशुरामांना इतरांनी मदत केली असावी. त्यामूळे ब्राम्हणांप्रमाणेच क्षत्रियांनाही परशुरामांचे श्रेष्ठत्व मान्य झाले होते. परशुरामांना अनेक क्षत्रियांनी दैवत मानले आहे.

परशुरामांच्या पुढचे काम पुढील अवतारामध्ये रामाने केले. ब्राम्हण आणि क्षत्रिय दोघांनाही एकत्र आणून सहकार्य व सहयोग घडवून आणला.

लेखिका - डॉ. स्वाती कर्वे
संकलन - प्रा. र. भ. वनारसे
वरील लेख, श्री. बाळासाहेब बारवेकर, राजगुरुनगर यांनी टंकित केल्याबद्दल त्यांचे आभार.






1 comment:

  1. सप्तचिरंजीव आणि दशावतार या नावाने ही लेखमाला प्रकाशित झाली होती. यातील चित्रांची माझ्याकडे कातरणे होती. लेख मात्र गहाळ झाले! कृपया सर्व लेख मला उपलब्ध होऊ शकतील काय?
    माझा संपर्क क्रमांक 9075402838!

    ReplyDelete