Monday, December 12, 2016

साद निसर्गाला

मराठीत छापील स्वरूपातील माहिती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, ती माहिती आंतरजालावर युनिकोड स्वरूपात उपलब्ध करून देणे हा ज्ञानभाषा मराठी समूहाच्या #मराठीयुनीकोडिंग उपक्रमाचा उद्देश आहे. तुमच्याकडे देखील अशी जुनी, कोणत्याही विषयावरील ज्ञानवर्धक माहिती उपलब्ध असेल तर ९०५२३४४४७६ या क्रमांकावर संपर्क साधा.

या उपक्रमातील आठवा लेख :
_____________________________

सर्व प्रकारच्या प्रदुषणांमूळे कोंदटलेल्या पुण्यात निसर्गाचे सुखद व शीतल दर्शन एम्प्रेस गार्डन मध्ये घडते. धकधकीच्या जीवनात वावरताना निसर्गाला घातलेली हि साद आहे. या उद्यानाविषयी. जणू जंगलात आलो आहोत; असे वाटण्याइतपत दाट झाडी, विवीधरंगी फुले, झुळूझुळू वाहणारा ओढा, वेगवेगळ्या पक्ष्यांचा किलबिलाट.... भोवतालच्या जगाचा विसर पाडायला लावणा-या अशा ह्या निसर्गाची ओढ सर्वांनाच असते;

पण सिमेंटच्या जंगलात आणि वाहतुकीच्या गोंगाटात अडकलेल्या शहरवासीयांना या निसर्गाची अनुभूती दूर्मिळच. तुलनेने पुणेकर मात्र सुदैवी. कारण अशा निसर्गाच्या शोधासाठी त्यांना खूप दूरवर जाण्याची गरज नाही. एम्प्रेस गार्डनच्या रुपाने पुण्यातच हा निसर्ग ठेवा त्यांच्यासाठी उभा आहे.

सदतीस एकरांच्या विस्तीर्ण परिसरात जाणीवपूर्वक वाढविण्यात आलेल्या या उद्यानात निसर्गाचे सुखद व शीतल दर्शन घडते. मोठाल्या वृक्षांसाठी प्रसिध्द असलेले हे उद्यान कोणत्याही निसर्ग प्रेमींना सतत साद देणारे आहे. शहराच्या पूर्व भागातील या उद्यानात पाऊल टाकल्यानंतर प्रथम दर्शन घडते हे हिरव्या निसर्गाचे. या उद्यानाचा इतिहास रंजक आहे. या उद्यानाची मूळ जागा ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याची. त्यांनी ही जागा ब्रिटीशांना दिली. सुमारे ४१ एकर ऐवढे क्षेत्र त्यावेळी होते. त्या ठिकाणी ब्रिटिशांच्या गँरिसन फलटणीने उद्यान उभारले. हीच पलटन त्याची व्यवस्था पाहायची. त्यामुळे 'सोल्जर्स गार्डन' या नावाने ती प्रसिद्ध होती. सर रिचर्ड टेम्पल यांनी या उद्यानाचा १८७८ मध्ये कायापालट केला. पुणे खडकीच्या विशेष अभियंत्याकडे कारभार सोपवला. येथे आठवड्यातून दोन वेळा लष्करी बँड वाजवला जात असे. सप्टेंबर १८८४ मध्ये गणेशखिंडीतील बोटँनिकल गार्डन येथे हालवण्याचा निर्णय झाला.

दरम्यान,  मुंबई प्रांताचे तत्कालीन गव्हर्नर सर जॉन माल्कम यांच्या प्रोत्साहनाने 'अँग्री हॉल्ल्टिकल्चर सोसायटी अॉफ वेस्टर्न इंडिया' या संस्थेची स्थापना झाली. ब्रिटिशांनी १८९२ मध्ये या संस्थेकडे उद्यान सोपवले आणि या उद्यानाचे नाव 'द एम्प्रेस गार्डन' करण्यात आले. मध्यंतरीच्या काळात या उद्यानाची दुरावस्था झाली. शासनाने संस्थेकडून हे उद्यान स्वतःच्या ताब्यात घेतले होते; पण त्याकडे पुरेसे लक्ष दिले नाही. हे उद्यान पुन्हा संस्थेच्या ताब्यात द्यावे, असा उद्योगपती (कै.) शंतनुराव किर्लोस्कर, विधानसभेचे माजी सभापती (कै.) जयंतराव टिळक यांनी आग्रह धरला. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन वीस वर्षांनी पुन्हा उद्यान संस्थेकडे आले.

पर्यावरणचक्राला कसलाही धक्का न लावता येथे जॉगिंग ट्रँक , मुलांसाठी खेळणी, बसण्यासाठी आसने आदींची सोय करण्यात आली आहे. उद्यानाचे स्वरूप बदलत असताना त्याचे शास्त्रीय महत्व ही कायम राखण्यात आले आहे. वेगवेळ्या जातीचे एकहजार वृक्ष येथे आहेत. झुडपे निवडुंग आहेत. अडीचशे वर्षापूर्वीचे वडाचे झाड आहे. दीडशे वर्षापूर्वीची 'कांचनवेल' (बॉहिनिया वाहिली) आहे. वेल म्हटले, की एक नाजूक, मोठ्या वृक्षाला अलगद बिलगलेली वेल डोळ्यांसमोर उभी राहील. ही कांचनवेल मात्र आता एखाद्या दणकट वृक्षाच्या खोडाशी स्पर्धा करते आहे. वाढीच्या वयात रोज पाऊण मिटरने वाढणारा व सुमारे तीस मीटरपर्यंत जाणारा 'जाएंट बांबू' येथे पाहायला मिळतो.

एरवीच्या धकाधकीच्या जीवनक्रमातून मोकळे होण्यासाठी या हिरव्या निसर्गाला कधीतरी प्रतिसाद द्यायलाच हवा.......

- १५ मार्च २००२ प्रतिबिंब
- संकलन : प्रा. र. भ. वनारसे
- वरील लेख, श्री. सोमनाथ पुरी यांनी टंकित केल्याबद्दल त्यांचे आभार.


No comments:

Post a Comment