Wednesday, January 11, 2017

इतिहासाचा साक्षीदार - विश्रामबागवाडा

मराठीत छापील स्वरूपातील माहिती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, ती माहिती आंतरजालावर युनिकोड स्वरूपात उपलब्ध करून देणे हा ज्ञानभाषा मराठी समूहाच्या #मराठीयुनीकोडिंग उपक्रमाचा उद्देश आहे. तुमच्याकडे देखील अशी जुनी, कोणत्याही विषयावरील ज्ञानवर्धक माहिती उपलब्ध असेल तर ९०५२३४४४७६ या क्रमांकावर संपर्क साधा.


या उपक्रमातील अकरावा लेख :

         
(दैनिक -सामना, रविवार १८नोंव्हे.२००१)                          

इ. स.१७९८चा काळ पुण्यातील शनिवारवाड्यात कौटुंबिक कलह विकोपाला गेले होते.त्यातच नारायणाचा खून.अशात राजकीय परिस्थिती यामुळे दुसरे बाजीराव पेशवे नव्या, शांत अश्या निवासाच्या शोधात होते.पुण्यात बुधवार वाडा ,शुक्रवार वाडा आणि दुस्तर खुद्द पेशवांचा शनिवार वाडा असूनही अंतर्गत कलहामुळे दुसऱ्या बाजीराव पेशव्यांना नव्या वाड्याचे वेध लागले होते.                            

पुण्यातील सध्याच्या लक्ष्मी रोडवरील जागेत पेशवाईच्या काळात हरिपंत फडक्यांची बाग होती.दुसऱ्या बाजीरावांना नवीन वाड्याकरिता ही जागा पसंत पडली.त्यांनी ही जागा इ. स.१७९८ ला विकत घेण्याचा मनोदय हरिपंत फडक्यांकडे व्यक्त केला.फडक्यांनी ही जागा पेशव्यांना बक्षीस म्हणून देऊन ही टाकली . पुण्यातील अशांत राजकीय परिस्थिती मुळे प्रत्यक्ष बांधकामास इ. स.१८०३ला सुरुवात झाली.वाड्याच्या बांधकामाचा ठेला मानसाराम लक्ष्मण  नाईक व दाजी सुतार यांना ७५हजार रूपयांच्या मजुरीवर मुक्रर करण्यात आला.दोघांनीही  मोठे कसब  पणास लावून वाड्याची उभारणी केली.या वाड्याची लांबी २६०फूट व रुंद ९०फूट ठेवली होती .
संपूर्ण शिसवी खांब लाकडावरील नक्षीदार पिसारा फुलविलेले मोर, आक्राळ विक्राळ सुसरी, दर्शनी भागात लाकडावर उत्कृष्ट कोरीव काम केलेली मेघडंबरी असा पेशवाई चा दिमाख दाखवणारा हा वाडा उभारताना त्या काळात २ लाख ५४ हजार रुपये इतका खर्च आला.          

मराठेशाहीच्या अस्तानंतर इंग्रज राजवटीत इ. स.१८२१ मध्ये दख्खनचे त्यावेळेचे कानेनरा मि. चॅपलीन यांचा मान्यतेनुसार विश्रामबाग वाड्यात वेदांचे व शास्त्रांचे शिक्षण देणारी पाठशाळा सुरु करण्यात आली.इ. स.१८४५ मध्ये  ही पाठशाळा बंद करुन खाजगी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु करण्यात आली.मराठी शब्दकोषाचे लेखक मेजर कँडिना शाळेच्या स्टाफचे प्रमुख बनविण्यात आले.१८५६मध्ये खाजगी  इंग्रजी शाळेबरोबरच डेक्कन कॉलेजचा कारभार विश्रामबाग वाड्यातून  नवीन इमारतीतून सुरु करण्यात आला.इंग्रजच्या ताब्यात असलेल्या या वाड्यात काही काळ वासुदेव बळवंत फडके यांनीही कैदेत ठेवल्याची नोंद सापडते

 स्वातंत्र्यपूर्व काळात इ. स.१८७९मध्ये या वाड्याला आग लागून याचे बऱ्याच प्रमाणात नुकसान झाले.                    अलीकडील काळात १९८५साली शिवशाहीर बाणासाहेब पुरंदरे यांना त्यांच्या शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वस्तुसंग्रहालय आणि कार्यलयासाठी जागा हवी होती.त्याकरिता विश्रामबाग वाड्याचा काही भाग त्यांनी चाळीस वर्षा करीता भाड्याने घेतला.सदर  भागास भवानी महल असे संबोधण्यात येते.या भवानी महालात बाबासाहेबांनी छोटीशी शिवसृष्टी उभारली आहे.या भवानी महलात बाणासाहेबांनी संपूर्ण हिंदुस्थानभर फिरून मोठ्या कष्टाने जमविलेल्या ऐतिहासिक वस्तू  मोठ्या दिमाखदार पद्धतीने मांडल्या आहेत.भवानी मातेचं आणि छत्रपती शिवाजी महाराजाचे  दर्शन घेऊन आपण ऐतिहासिक वस्तू पाहू शकता.यात इतिहास कालीन विविध प्रकारच्या तलवारी , भाले, सांग, विटा, दाणपट्टे, बंदुका, कासवाच्या पाठीच्या ढाली, तोफा , तोफगोळे, यांचे रोमांचकारी दर्शन आपल्याला होते. तसेच लामण दिवे ,हंड्या, झुंबरे, उंटाच्या कातडीपासून बनवलेला तूप साठविण्याचा हंडा, ताम्रपट, विविध किल्ल्यांची देवीदेवतांची छायाचित्रे, शिवचारित्रावरील प्रसंग चित्रे आपण येथे पाहू शकतो.
 ३५०वर्षांपूर्वी छत्रपतींच्या नेतृत्त्वाखाली हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या मावळयांची ही आयुध पाहून आपण नकळतच इतिहासात हरवून जातो.साक्षात आदिशक्ती तुळजाभवानी  आपल्या डोळ्यासमोर उभी टाकते आणि बाबासाहेबांनी या महलाला दिलेले भवानी महल हे नाव किती सार्थक आहे ,याची प्रचिती येते. बाबसाहेबांकडून मार्गदर्शन घेताना असे समजले की , पुण्याजवळील कात्रज जवळ याहीपेक्षा भव्यदिव्य अशी शिवसृष्टीबद्दलच्या त्यांच्या योजना कल्पना ते आम्हाला भरभरून सांगत होते. त्यांच्या बोलण्यात जबर आत्मविश्वास अगदी ठासून भरला होता. हयातभर कष्ट उपसून शिवचारित्रावरील व्याख्याने शिवकालीन हत्यारे, आयुध,भावी पिढी साठी  जमविणाऱ्या आणि याही वयात कात्रजजवळ शिवसृष्टी उभारण्याची शिवशाहिरांची जिद्द पाहून नकळत त्यांच्या समोर नतमस्तक झालो.          

विश्रामबाग वाड्याची निर्मिती होऊन जवळ जवळ दोन शतके पूर्ण होतील.तरीही पुण्याच्या सदाशिवपेठेत हा वाडा अजूनही दिमाखात उभा आहे. विश्रामबाग वाडा व त्याच्या पहिल्या मजल्यावरील भवानी महल बुधवार सोडून सकाळी ९ ते सायंकाळी ७पर्यंत सर्वांकरिता मोफत पाहण्याकरिता खुला असतो. पुण्यात जर आपण कधी  यापुढे गेलात तर पुण्याच्या गतइतिहासातील पेशवाईची व शिवशाहीची  सांगड घालणाऱ्या विश्रामबाग वाड्याला जरूर भेट द्या.                  

लेखिका - संदीप शशिकांत विचारे
संकलन - प्रा. र. भ. वनारसे
वरील लेख, शामल पाटील यांनी टंकित केल्याबद्दल त्यांचे आभार.


No comments:

Post a Comment