मराठीत छापील स्वरूपातील माहिती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, ती माहिती आंतरजालावर युनिकोड स्वरूपात उपलब्ध करून देणे हा ज्ञानभाषा मराठी समूहाच्या #मराठीयुनीकोडिंग उपक्रमाचा उद्देश आहे. तुमच्याकडे देखील अशी जुनी, कोणत्याही विषयावरील ज्ञानवर्धक माहिती उपलब्ध असेल तर ९०५२३४४४७६ या क्रमांकावर संपर्क साधा.
या उपक्रमातील बारावा लेख :
चित्रपट गृहात खास महिलांसाठी 'लेडीज डोअर किपर' तुम्ही कधी पाहिलीय ? प्रेक्षक चित्रपटगृहाकडे आकर्षित व्हावेत म्हणून चक्क त्यांचं दळण फुकट देणारा रसिकप्रिय मालक तुम्हाला माहिती आहे? नाही ना?
तो काळ होता १९१५ चा.त्यावेळी चित्रपट पाहणं म्हणजे थोड रीतीला सोडून वागल्यासारखं होत. अशा प्रतिकूल परिस्थितीत पुण्यात मोठ्या डौलाच चित्रपटगृह उभारणार्या रसिकवेड्याचं नाव आहे गंगाधरपंत ऊर्फ बापूसाहेब पाठक.
पुण्यातील पहिलं चित्रपटगृह 'आर्यन' सुरू करण्याचा मान त्यांच्याकडेच जातो.त्याच्या उभारणीची तारिख होती ७ फेब्रुवारी १९१५.फुले मडंई समोरील प्रशस्त जागेत उभ्या राहीलेल्या या चित्रपटगृहानं सलग ६७ वर्षे रसिकांच्या मनावर राज्य केलं.१९४० ते ४२ पर्यंत आणखी काही चित्रपटगृहं पुण्यात उभी राहिली त्यात प्रामुख्यानं 'मिनर्व्हा', 'प्रभात', 'श्रीकृष्ण', 'विजयानंद', 'डेक्कन', 'विजय', 'भानुविलास', 'वसंत', 'कँपिटॉल', 'वेस्टएंड', 'एम्पायर', नोव्हेल त्याचबरोबर 'भारत'(निशात), 'ग्लोब' (श्रीनाथ), 'शिरीन'(अल्पना), 'पँरेमाऊंट'(रतन) होती.
हा सारा काळ ब्रिटीशांच्या राजवटीचा होता. चित्रपटांची मांडणी,विषय, तंत्र सारं अनोखं होतं. पौराणिक, ऐतिहासिक आणि ज्वलंत सामाजिक विषय मांडले जात होते. सन१९३१ च्या सुमारास 'आलमआरा'च्या निमित्तानं चित्रपटसृष्टित बोलपटाचं पर्व सुरू झालं.
व्ही.शांताराम, फत्तेलाल-दामले, बापूसाहेब करंदीकर, पांडूरग तलगेरी, नानासाहेब सरपोतदार यांचे स्टुडिओ ही याच काळात उभे राहिले. आता मिळून दहा वर्षे झाली होती. चित्रपटगृहात ३५ एम.एम.चे पडदे आले होते.साऊंड सास्टिमही सुधारली होती. 'ईस्टमनकलर'चे 'ज्युबली' चित्रपट गर्दी करू लागले.आता डेक्कन आणि लष्करी छावणीच्या पलिकडेही चित्रपटगृहे थाटू लागली. यानंतर १९६५-६८ च्या सुमारास चित्रपटगृहांनी कात टाकली. ३५ एम.एम ची साथ सोडुन ७० एम.एम.च्या पडद्यांची चित्रपटगृहे पुण्यात आली. 'नटराज' (पुर्वीचे हिंदविजय), 'राहुल', 'निलायम', 'अलंकार','अपोलो', लक्ष्मीनारायण', 'मंगला' ही त्यातील काही नावं. भव्य पडद्याबरोबरचं या चित्रपटगृहांतुन 'स्टिरिओ साऊंड' दणाणू लागला. त्यानंतर मात्र चित्रपटगृह चालविणे कठिण जाऊ लागलं. याच पार्श्वभुमीवर चारूदत्त सरपोतदार यांच्यासारख्या हरहुन्नरी व्यक्तीनं 'मराठी चित्रपट महामंडळ' स्थापण करून मराठी चित्रपट जिवत ठेवण्याचा प्रयत्न केला पण तो फारसा टिकला नाही.ऐतिहासिक 'आर्यन' आणि लगोलग 'मिनर्व्हा' जमिनदोस्त झाली.'भानुविलास'ही बंद पडलं.'रतन', 'वसत', 'नटराज' आणि 'वेस्टएंड'च्या मालकांनी चित्रपटगृह चालविण्यापेक्षा ती जमिन बांधकाम व्यावसायिकांना विकली.
पुणं आता पेंशनरांच किंवा टांगेवाल्यांच राहिलं नव्हतं.बदललेल्या पुणेकरांची नाडी चतुर व्यावसायिकानी ओळखली आणि त्याच्या प्रयत्नांतुन 'सिटी प्राईड', 'आयनॉक्स' आणि 'ई-स्क्वेअर' सारखी विविध अंगानी मनोरंजनाचा अनुभव देणारी मल्टिप्लेक्स डौलान येथे उभी राहिली. आज पुण्यात तिन ' मल्टिप्लेक्स' असून कोथरूड भागात 'सिटी पँव्हेलियन' नावाचं आणखी एक 'मल्टिप्लेक्स' लवकरच सुरू होत आहे.'मंगला'च्या ठिकाणी 'मल्टिप्लेक्स' होण्याची शक्यता आहे.
बापू वाटवे, रामभाऊ गबाले, चारूदत्त सरपोतदार या मंडळींनी पुण्याच्या चित्रपटगृहांचा इतिहास पाहिला आहे. या क्षेत्रातील घटनांचे ते साक्षिदार आहेत. ते म्हणतात, "पुण्याची जीवनशैली बदलली आहे. त्यानुसार आपल्यालाही बदलावं लागेल हे खरं आहे. मात्र मल्टिप्लेक्स चा आनंद लुटताना मनात कुठेतरी 'आर्यन'चाही विचार यावा." या विचारातच 'पुणेरीपण' दडलेल आहे.
लेखिका - सुरेश ठाकोर
संकलन - प्रा. र. भ. वनारसे
वरील लेख, श्री. योगेश वाघमोडे, राजगुरुनगर यांनी टंकित केल्याबद्दल त्यांचे आभार.



No comments:
Post a Comment