Wednesday, January 11, 2017

कसब्यात दोन हजार वर्षांपूर्वीच्या पुण्येश्वर मंदिराचे अवशेष

मराठीत छापील स्वरूपातील माहिती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, ती माहिती आंतरजालावर युनिकोड स्वरूपात उपलब्ध करून देणे हा ज्ञानभाषा मराठी समूहाच्या #मराठीयुनीकोडिंग उपक्रमाचा उद्देश आहे. तुमच्याकडे देखील अशी जुनी, कोणत्याही विषयावरील ज्ञानवर्धक माहिती उपलब्ध असेल तर ९०५२३४४४७६ या क्रमांकावर संपर्क साधा.


या उपक्रमातील पंधरावा लेख :

पुण्यात कसबा पेठेतील घर क्रमांक १३०३ येथे राष्ट्रकूटकालीन पुण्येश्वर मंदिराचे अवशेष शुक्रवारी सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. या शिळेवरील कोरीव नक्षीत काढलेले वेली स्तर, गंधर्व स्तर व स्तंभ स्तर स्पष्ट दिसत आहेत.

पुणे , ता. २ : शहराला पुणे हे नाव देणाऱ्या आणि आता अस्तित्वात नसलेल्या पुण्येश्वर मंदिराचे अवशेष सापडल्याचा दावा इतिहासाचे अभ्यासक पांडुरंग बलकवडे  यांनी आज केला.कसबा पेठेतील घर क्रमांक १३०३ येथे हे अवशेष सापडले आहेत.

सुमारे २००० वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या पुण्येश्वर मंदिराचे अवशेष असू शकतील अशा दोन शिळा सापडल्या. मात्र त्यातील विविध मूर्ती आणि लेख असणाऱ्या दोन शिळांपैकी लेख असणारी शिळा आजच बेपत्ता झाली, असे श्री बलकवडे यांनी सांगितले.

ते म्हणाले, ‘ पवळे चौकातील घर क्रमांक १३०३ येथे सध्या बांधकाम चालू आहे. आज सकाळी या ठिकाणी दोन शिळा सपडल्या. एका शिळेवर मूर्ती कोरल्या आहेत, दुसऱ्या शिळेवर काही लेख कोरले आहेत, असे स्थानिक लोकांनी सांगितले. लेख असणारी शिळा इतर दगडांबरोबरच तिथे कामावर असणाऱ्या ट्रकने उचलून नेली. मूर्ती कोरलेली शिळा अडीच फूट लांब, रुंद आणि उंच आहे. हि शिळा राष्ट्रकूट राजांच्या काळातील पुण्येश्वर मंदिराच्या द्वारशाखेचा भाग असावी. या शिळेवर तीन स्तर असून , वेली स्तरावर नाजूक आणि कोरीव नक्षी आहे. गंधर्व स्तरावर सोळा वादक  विविध वाद्य वाजवत असल्याच्या मूर्ती कोरल्या आहेत. स्तंभ स्तरावर सप्तनाग छत्र असलेली नंदी देवता , नारसिंह मूर्तीबरोबरच ध्यानमुद्रेतील संन्यासी आदी देवतांच्या सात मूर्ती आहेत. नामदेवांनी आळंदीच्या पंचक्रोशीचे वर्णन  करताना “दक्षिणे पुण्येश्वर देवो” असा उल्लेख केला आहे. सुलतानी काळात या ठिकाणी हिस्सार किल्ला बांधण्यात आला होता. सध्याच्या पवळे चौकात या किल्ल्याचा पूर्व दरवाजा होता. गावाचा सर्वात जुने भाग असलेल्या या ठिकाणी नव्या बांधकामासाठी पाया खोदताना जुन्या वास्तूचे अवशेष सापडत आहेत. सातवाहनकालीन खापरांचे तुकडे, शंखापासून बनविलेल्या बांगड्या , भाजलेल्या मातीचे खेळण्यांचे तुकडे आतापर्यंत सापडले आहेत.

“या परिसरात खोदकाम करताना अधिक काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे. लेख असलेली शिळा इथून नेली नसती , तर आज आपल्याला खूप मोठी माहिती मिळू शकली असती.अशा प्रकारच्या कोणत्याही शिळा सापडल्यास त्या फेकून न देता इतिहास संशोधक मंडळाला अथवा मला दूरध्वनी क्रमांक २४४९९८९८ येथे संपर्क साधावा” असे आवाहनही त्यांनी केले.

लेखक - 
संकलन - प्रा. र. भ. वनारसे
वरील लेख, सौ विदुला थोरात यांनी टंकित केल्याबद्दल त्यांचे आभार.


No comments:

Post a Comment