या उपक्रमातील चौदावा लेख :
पुणे,ता.७:"पुण्याचा इतिहास इसवीसन पूर्व दुसऱ्या शतकापासून सुरू होतो ,असे पुरावे नुकतेच सापडले होते.आता थेऊरजवळ ताम्रपाषाणयुगिन वस्तूंचे अवशेष मिळाले आहेत.याचा मोठ्या प्रमाणावर अभ्यास केल्यास पुण्यातही ताम्रपाषाणयुगाचे अवशेष मिळू शकतील.असे झाले तर पुण्याचा इतिहास आणखी काही हजार वर्षे मागे जावू शकेल "असे मत येथे झालेल्या परिसंवादात व्यक्त करण्यात आले.
श्री देवदेवेश्वर संस्थान तर्फे भरविण्यात आलेल्या "प्राचीन पुणे:एक आंतरशाखिय संशोधन "या विषयावरील परिसंवादात डेक्कन महाविद्यालयाचे माजी सहसंचालक प्रा.शरद राजगुरु ,डॉ.वसंत शिंदे ,डॉ.प्रमोद जोगळेकर ,डॉ.म.के.ढवळीकर, पांडुरंग बलकवडे,डॉ.वि.वि.पेशवा,पर्वती संस्थानचे प्रमुख विश्वस्त राम चव्हाण ,बापूसाहेब जोशी आदि सहभागी झाले होते.
पुण्याचा इतिहास पाषाणयुगानंतर म्हणजे केवळ सातव्या आठव्या शतकापासून सुरू होतो असा समज होता असे नमूद करून डॉ.शिंदे म्हणाले,"कसबा पेठेत नुकत्याच झालेल्या संशोधनाने हा दावा फोल ठरवला.येथे सापडलेली खापरे ,बांगड्याच्या अवशेषांवरील नक्षी सातवाहन काळातील म्हणजे इसवीसन पूर्व दुसऱ्या शतकातील आहे .यामुळे पुण्याचा इतिहास एक हजार वर्षे मागे गेला आहे .
डॉ.राजगुरु म्हणाले ,"मुळा-मुठा नदीच्या खोऱ्यात थेऊरजवळ साडेतीन हजार वर्षांपूर्वीच्या शेतीप्रधान संस्कृतीचे पुरावे सापडतात.त्यानंतर दुष्काळामुळे हि संस्कृति धोक्यात आली.पुढे मान्सूनचा पाऊस सुधारल्यावर मुठेला येणाऱ्या पुरामध्ये वाढ झाली आणि सातवाहन काळात मुळा-मुठेच्या खोऱ्यातच नव्हे तर महाराष्ट्राच्या पठारी आणि किनारी भागातदेखील वसाहत वाढली; मात्र काही विशिष्ट कालावधीनंतर दुष्काळामुळे येथील वसाहत धोक्यात आल्याचे आढळते.त्यामुळे पुण्याच्या प्राचीन पर्यावरणाचा अभ्यास करताना प्रामुख्याने दुष्काळाचा विचार करावा लागतो.सध्या कमी झालेल्या पावसाच्या प्रमाणाचाहि याच दृश्टिकोनातून विचार करणे गरजेचे आहे
जैवतंत्रज्ञान आणि पुरातत्वशास्त्र एकत्र आल्याने जीवाश्मांच्या संशोधनाला आणखी चालना मिळाली आहे ,असे नमूद करून डॉ.जोगळेकर म्हणाले ,"प्राण्यांच्या अवशेषांचा अभ्यास करताना माणसाने कापलेले हाड आणि नैसर्गिकरित्या तुटलेले हाड यात फरक करता येतो.यावरून प्राचीन काळात मनुष्याचे अस्तित्व किती काळापूर्वीपासून होते,याचा अंदाज करता येणे शक्य आहे".
डॉ.ढवळीकर ,डॉ.पेशवा ,श्री. बलकवडे ,श्री.चव्हाण यांचीही भाषणे या वेळी झाली.
हा लेख वसुंधरा शर्मा यांनी टंकित केल्याबद्दल त्यांचे आभार.

No comments:
Post a Comment