मराठीत छापील स्वरूपातील माहिती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, ती माहिती आंतरजालावर युनिकोड स्वरूपात उपलब्ध करून देणे हा ज्ञानभाषा मराठी समूहाच्या #मराठीयुनीकोडिंग उपक्रमाचा उद्देश आहे. तुमच्याकडे देखील अशी जुनी, कोणत्याही विषयावरील ज्ञानवर्धक माहिती उपलब्ध असेल तर ९०५२३४४४७६ या क्रमांकावर संपर्क साधा.
या उपक्रमातील एकोणीसावा लेख : पुण्याचा इतिहास दिन
शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्थापनेच्या कार्यातला सर्वात महत्त्वाचा प्रसंग म्हणजे शायिस्तेखानाला पुणे सोडायला लावणे, हा होय. चैत्र शुद्ध अष्टमी ५ एप्रिल १६६३ रोजी, उत्तर रात्री शिवाजी महाराजांनी पुण्यातील लालमहालात मुक्काम ठोकून बसलेल्या शायिस्तेखानावर हल्ला केला, त्याच्या मुलाला ठार मारले आणि शायिस्तेखानाची बोटे छाटली. अशा प्रकारे पुण्यातला मुक्काम हलवून औरंगाबादला जाण्यास त्याला भाग पाडले. पुढे तर औरंगजेबाने शायिस्तेखानाची बदली त्यावेळी कुप्रसिद्ध असलेल्या बंगालच्या सुभेदारीवर केली. या पराक्रमाने महाराजांनी स्वराज्यावरचे प्राणांतिक संकट तर दूर केलेच; परंतू पुण्याचे पुणेपण राखले.
शिवाजी महाराजांनी शायिस्तेखानावर केलेल्या या पराक्रमामुळे खास पुण्याचा म्हणून जर काही 'इतिहास दिन' साजरा करावयाचा असेल, तर तो हा ऐतिहासिक महत्वाचा 'चैत्र शुद्ध अष्टमी' हाच दिवस होय.
शायिस्तेखान : एक मोठा माणूस
शिवाजी महाराजांच्या या पराक्रमाचे मर्म समजण्यास शायिस्तेखानाचा पराक्रम केवढा मोठा होता हे समजणे जरुर आहे. रामाचा पराक्रम समजण्यास रावणाचा पराक्रम वर्णन केला व अशा रावणास रामाने जिंकले एवढे एक वाक्य लिहिले म्हणजे पुरे होते, असा अलंकार शास्त्रात नियम आहे, तीच गोष्ट याबाबतीत आहे. शिवाजी महाराजांनी शायिस्तेखानाची बोटे तोडून त्याची फजिती केली, म्हणून शायिस्तेखान आज थट्टेचा विषय झाला आहे; पण कुणीही उठावे व शायिस्तेखानाला हसावे, इतक्या कमी योग्यतेचा माणूस शायिस्तेखान नव्हे.
महाराजांनीही, 'आम्ही शायिस्तेखानाची शास्त केली. पातशहाने नांव ठेविले, पण ते यथार्थ ठेविले नाही, आम्ही शास्त करुन ते रुजू केले' असा शायिस्तेखानावर विनोद केला; पण हा विनोद शिवाजी महाराजांनी केला आहे व तो शायिस्तेखानावर केला आहे, हे विसरणे योग्य नाही. शायिस्तेखान हा फार मोठ्या योग्यतेचा पुरुष होता. तो औरंगजेबाचा मामा. शहाजहान व त्याच्या दारा, शुजा व मुराद या मुलांचा पाडाव करुन त्याने औरंगजेबाला तख्त मिळवून दिले. त्या प्रसंगी त्याने जी कारस्थानपटूता दाखवली त्याबद्दल 'शायिस्तेखानाइतका मुत्सद्दी पुरुष साऱ्या हिदुस्थानात कुणी नव्हता,' अशी बर्नियरने त्याची यथार्थ प्रशंसा केली आहे. तो जितका मुत्सद्दी होता तितकाच पराक्रमीही होता. गोवळकोंड्याच्या स्वारीत व माळव्यात त्याने पराक्रम केला व २८ जानेवारी १६६० ते ५ एप्रिल १६६३ या तीन वर्षांत शिवाजी महाराजांसारख्या हरहुन्नरी माणसाला सुद्धा जेरीस आणले. त्याने 'शिवाजीशी तह करावा' असा शहाणपणाचा सल्ला औरंगजेबाला दिला; परंतू औरंगजेबासारख्या महाहट्टी सत्ताधिशापुढे शायिस्तेखानासारख्या शहाण्या सल्लागाराचा सल्ला गार पडला. फिरंगोजी नरसाळ्याला त्याने सन्मानाने व औदार्याने शिवाजी महाराजांकडे परत पाठविले. तो उत्कृष्ट प्रशासक होता. तो पुण्यात असतांना एका रुपयाला दोन मण गहू मिळत असंत. तो बंगालचा सुभेदार असतांना, बंगाल खरोखरच 'सुफलां सुजलाम सस्यश्यामलाम' झालेला होता व रुपयाला आठ मण तांदूळ मिळत असत. तो धर्मात्मा होता व त्याने आपले ९६ वर्षांचे प्रदीर्घ आयुष्य लाखो रुपयांचा दानधर्म करुन सार्थकी लावले. अशा शूर, शहाण्या अष्टपैलू शत्रूचा पराभव केला म्हणून शिवाजी महाराज मोठे.
लेखक - प्रा. श. श्री. पुराणिक
संकलन - प्रा. र. भ. वनारसे
वरील लेख, श्री. अमोल शिंपी यांनी टंकित केल्याबद्दल त्यांचे आभार.

No comments:
Post a Comment