Monday, June 19, 2017

रणसिंगे प्रेमदासा स्टेडीयम

रणसिंगे प्रेमदासा स्टेडीयम हे क्रिकेटचे मैदान असून ते श्रीलंकेत कोलंबो येथे आहे. जून १९९४ च्या आधी हे स्टेडीयम खेत्तारमा क्रिकेट स्टेडीयम या नावाने ओळखले जात असे. आज हे मैदान श्रीलंकेतील खेळाडूंसाठी एक प्रमुख मैदान म्हणून ओळखले जाते. श्रीलंकेचे माजी अध्यक्ष रणसिंगे प्रेमदासा यांच्या कल्पनेतून साकार झालेलं हे स्टेडीयम आहे. ३५००० आसन क्षमतेच्या श्रीलंकेतील सर्वात मोठ्या स्टेडीयम च्या निर्मितीची धुरा रणसिंगे प्रेमदासा यांनी पुढाकार घेवून सांभाळली. श्रीलंका बी संघ आणि इंग्लंड बी संघ यांच्या पहिल्या सामन्याने या स्टेडीयम चे उद्घाटन करण्यात आले होते. हे स्टेडीयम एक पाणथळ जागेवर बांधण्यात आलेले आहे. स्टेडीयम बांधण्याच्या पूर्वी खेत्तारमा मंदिरात जाणारे भक्त या जागेतून जातांना बोटीचा वापर करून पलीकडे जात असत. या मैदानावरील पहिल्या आंतर राष्ट्रीय एकदिवसीय सामन्याचे उद्घाटन ५ एप्रिल १९८६ रोजी श्रीलंका विरुध्द ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्याने झाले. यावेळची या मैदानावरील एक अविस्मरणीय घटना म्हणजे येथे ९५२/६ अशा धावा काढून सर्वोच्च जागतिक विक्रम नोंदवण्यात आला. १९९७-१९९८ साली खेळण्यात आलेल्या या सामन्यात सनथ जयसूर्या याने ३४० धावा तर रोशन महानामा याने २२५ धावा काढल्या. दुसऱ्या विकेट साठी या दोघांची भागीदारी ५७६ धावांची होती. अजूनही हा सामना जागतिक विक्रम जपणारा आहे. या मैदानाची धावपट्टी संथ असल्यामुळे येथे चेंडू उसळतो. या मैदानाच्या मागच्या बाजूला ट्रेनिंग सेंटर सुरु करण्यात आले असून सरावासाठी येथे १६ धावपट्ट्यांची उभारणी करण्यात आलेली आहे.  २००३ साली खेळाडूंसाठी सुरु करण्यात आलेल्या सोनी मॅक्स क्रिकेट अकॅडमीतील खेळाडूंसाठी येथे राहण्याची आणि निवासाची सोय करण्यात आली आहे.

टंकलेखन:-वैभव तुपे
संकलन:-सौ.मंजिरी होनकळसे
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

No comments:

Post a Comment