बालमित्रांनो,
पुण्याच्या मध्यवस्तीत मोठ्या दिमाखात उभी असलेली आणि एकेकाळचे मराठा साम्राज्याचे सेनानी पेशवे यांचे निवासस्थान असलेली मी एक ऐतिहासिक वास्तू. माझं महत्त्व जाणून भारत सरकारनं मला महाराष्ट्रातील राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलं. बरोबर ओळखलंत मित्रांनो! मी शनिवारवाडा बोलतोय.
मित्रांनो, पेशवाईच्या कालखंडात आपल्या कर्तृत्वान पेशव्यांनी अटकेपार झेंडे लावले आणि सर्व उत्तर हिंदुस्थान आपल्या अंमलाखाली आणला होता. या काळात सर्व सत्ता सूत्रे पुण्यातूनच हलत असल्यानं पुणे हे सत्ता केंद्र झालं होत. मराठ्यांच्या या सत्तेला, वैभवाला साजेशी गादी असावी, या हेतूनं थोरले बाजीराव पेशवे यांनी पुण्यामध्ये मुठा नदीच्या काठावर एक भव्य आणि सुरक्षित वास्तू बांधायचं ठरवलं. वास्तूसाठी योग्य जागा मिळाल्यावर १० जानेवारी १७३० रोजी त्यांनी या वास्तूचा भूमीपूजन समारंभ केला. बाजीराव पेशव्यांनी हि वास्तू बांधून घेण्याचं काम अतिशय जलद गतीनं पूर्ण करुन घेतलं. अवघ्या दोन वर्षात पाच एकर क्षेत्रफळात वसलेला मराठी सत्ता व वैभवाला साजेसा सहा मजली आलिशान प्रासाद तयार केला. वास्तुपुजन समारंभ २२ जानेवारी १७३२ रोजी झाला. या दिवशी शनिवार असल्यानं माझं नामकरण 'शनिवारवाडा' असं करण्यात आलं. माझ्या बांधकामासाठी त्याकाळी १६ हजार ११० रुपये खर्च आला. बाजीरावांच्या जीवनशैलीप्रमाणंच माझी बांधणी केली होती.
मित्रांनो, आज केवळ अवशेष रूपात मी तुम्हाला दिसत असलो, तरी माझ्या बांधकामाच वर्णन अचंबित करणारं आहे. तब्बल २१ फूट उंच आणि चारही बाजूनी ९५० फूट लांबीची तटबंदी भिंत अशी माझी बांधणी केली होती. माझा मुख्य प्रासाद सहा मजली होता. आळंदीच्या देवळाचा कळस माझ्या सहाव्या मजल्यावरून दिसत असे. आज दिसणाऱ्या दिल्ली दरवाजावर असलेल्या नगारखान्याच्या उंचीवरून माझ्या प्रासादाच्या उंचीची कल्पना तुम्हाला येऊ शकते.
माझ्या भोवतालच्या भिंतींना पाच मोठे दरवाजे होते. दिल्ली दरवाजा, अलीबहाद्दर किंवा मस्तानी दरवाजा, खिडकी दरवाजा, गणेश दरवाजा आणि नाटकशाळा ऊर्फ जांभूळ दरवाजा या नावांनीच आजही हे दरवाजे ओळखले जातात. सर्व दरवाजे टोकदार कमानींमध्ये असून, अणकुचीदार लोखंडी खिळे व जाडजूड पट्टया ठोकून ते भक्कम केले आहेत. यातील दिल्ली दरवाजातून आत गेल्यावर एका बुरुजाच्या माथ्यावर तोफांचा गोल रचला होता. याच्या मध्यभागी भगवं निशाण फडकत असे. माझ्या पटांगणावर चौक बांधले होते. आग्नेयकडील चौकाला लाल चौक किंवा बाहेरील चौक म्हणत. नैऋत्येकडील चौकाला मोतीचौक किंवा गोपिकाबाईंचा चौक नाव होतं. वायव्येकडील चौकाला हिरकणी चौक किंवा मधला चौक या नावानं ओळखलं जात असे. शेवटच्या म्हणजे ईशान्येकडील चौकाला माणिकचौक किंवा हौदाचा चौक म्हणत. या मोठ्या चौकांशिवाय फडाचा चौक, ताकचौक, मुदपाकचौक पक्वान्नचौक असे अनेक पोटचौक होते. या सर्व चौकात मिळून गणपतीचा रंगमहाल, नानांचा दिवाणखाना, नवा आरसेमहाल, जुना आरसे महाल, दादासाहेबांचा दिवाणखाना, थोरल्या रायांचा जुना दिवाणखाना, खाशांचा दिवाणखाना, हस्तिदंती दिवाणखाना, नारायणरावांचा महाल, अस्मानी महाल असे अनेक महाल, दिवाणखाने व देवघरे होती. याशिवाय जामदारखाना, जिन्नासखाना, दप्तरखाना, पुस्तकशाळा, गोशाळा, पिलखाना, उष्ट्रखाना, शिकारखाना, शिलेखाना, वैद्यखाना, कबुतरखाना, कोठी इत्यादी कारखान्यांची योजना वेगवेगळ्या चौकातून केली होती. कात्रजच्या तलावातून आत पाणी आणलं होतं. सभा मंडपावर चित्रे कोरलेली होती. हिरकणी चौकीतील गणपती महालात रामायण-महाभारतातील अनेक कथांची चित्रं होती. याशिवाय पश्चिम तटाला घोड्यांची पागा आणि गोशाळा होती.
माझ्या संरक्षणासाठी सर्व तटांवर मिळून २७५ शिपाई, ५०० स्वार आणि अंतर्गत बंदोबस्तासाठी एक हजारहून अधिक नोकर होते. सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात नाना फडणवीस यांनी माझ्यामध्ये अनेक सुधारणा घडवून आणल्या. नवीन खोल्या, दिवाणखाने, टॉवर आणि कारंजी बांधली.
मित्रांनो, माझ्या या वैभवाला १७९१, १८०८, १८१२, १८१३ या वर्षी छोट्या-मोठ्या आगी लागल्या. यामुळं सौंदर्य ढासळलं. यानंतर १७ नोव्हेंबर १८१७ मध्ये माझा ताबा ब्रिटिशांनी घेतला आणि आपलं निशाण लावलं. पेशव्यांचं वास्तव्य संपून पुण्याचे पहिले जिल्हाधिकारी हेन्री डंडास रॉबर्टसन इथं राहायला आले. दिवाणखान्याची जागा तुरुंग, पंगुगृह, पोलिसांच्या निवासस्थानांनी घेतली. पुढं १८२८ मध्ये मला मोठी आग लागली व त्यात बहुतेक सर्व इमारती जळाल्या. फक्त नगारखाना आणि आरसेमहाल शिल्लक होता.
आरसे महालही काळाच्या ओघात नष्ट झाला. आज जोते, कारंजी, बुरुज आणि भक्कम असा दिल्ली दरवाजा मूळ रुपात तुम्ही पाहू शकता. तत्कालीन इतिहासाची साक्ष देत अवशेषांच्या रुपात मी उभा आहे. नुकत्याच प्रदर्शित 'बाजीराव मस्तानी' या चित्रपटामध्ये माझं भव्य रुप दाखविण्यात आलं व तेव्हापासून मला पाहायला गर्दीही होते आहे. इतिहास जाणून घेण्यासाठी मला भेटायला नक्की या !
टंकलेखन-अमोल शिंपी
संकलन-प्रा.र.न.वनारसे

No comments:
Post a Comment