Monday, June 19, 2017

संतवाणी - ते ते केशवी तारिले!!

नामस्मरण हे तारक सर्वार्थाने 'साहाकारी' साह्यकारक असते. म्हणून 'हरिहर ब्रह्मादिक ही'त्याचे अनुसरण करतात. नामबळामुळे कोटी कुळांचा उद्धार झाला. म्हणतात...

*नाम घेता भगवंताचे|पाश तुटती भवाचे||*
*जे जे नामीं रत जाले|ते ते केशवीं तारिले||*

भगवंतांचे नियमित स्मरण ठेवले,तरच भवबंधने बाधक ठरत नाहीत. ज्या ज्या भक्त- साधकांनी नामसाधनेचा मार्ग स्वीकारला त्या सर्वांचा उद्धार भगवंताने केला,असा आपला इतिहास आहे.

*गणिका दुराचारी|*
*नामें तारिली अहिल्या नारी||*
*महा पापी आजामेळ|*
*तोही तारिला चांडाळ||*

गणिका वेश्या. ती दुराचारात रमलेली होती.तिने नाम घेतले.तिचा उद्धार झाला. आपल्या कोपिष्ट पतीच्या शापाने अहिल्या शिळा झाली होती. देवरायाच्या मात्र स्पर्शाने तिला पूर्वीचे रूप प्राप्त झाले. चांडाळ आजामिळ हा महापापी. त्यालाही ईश्वरनाम घेण्यामुळे सद् गती मिळाली.

*नामे गजेंद्र तारिला|देवें मोक्षपदासीं नेला||*
*नाम घेतसे पांचाली| उभा बाप वनमाळी||*

अशी गजेंद्रमोक्षाची पुराण-प्रसिद्ध कथा आहे. त्याला मगरीने धरले त्यावेळी त्याने देवाचे स्मरण केले. ईश्वराने त्याला मुक्ती दिली. पांडवांची पांचाली हिची विटंबना कौरवांनी केली तेव्हा तिने वनमाळी-कृष्णाची करुणा भाकली. त्याने तिला तारले. तिचे अब्रूरक्षण केले.

*नामा सांगे भविकांसी|*
*नाम घ्या रे अहर्निशी||*

म्हणून सर्व भाविकांना विनंती करतात,तुम्ही अहर्निशी...सातत्याने भगवंताचा जप करावा.

*डॉ.अशोक कामत*
*संकलन*- *सौ.मंजिरी होनकळसे*
*टंकन- *#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान*

No comments:

Post a Comment