Monday, June 19, 2017

बेलरीव्ह ओव्हल स्टेडीयम

बेलरीव्ह ओव्हल हे ऑस्ट्रेलियातील क्लॉरेन्स या शहरात आहे. हे हॉबर्टच्या किनाऱ्यावर आहे. या मैदानावर मुख्यत्वे क्रिकेट आणि फुटबॉल हे खेळ खेळले जातात. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांच्यासाठी हे मैदान वापरले जाते. या मैदानाची आसन क्षमता १६००० इतकी आहे. परंतु ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील २००९ च्या सामन्यांच्या वेळेस मात्र अतिशय गर्दी होवून १६७१९ प्रेक्षकांनी या सामन्याचा आनंद घेतला. हे मैदान येथील राज्य क्रिकेट संघटना, टस्मानीयन टायगर्स यांचे होम ग्राउंड म्हणून ओळखले जाते. १९८९ पासून येथे आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळण्यास सुरुवात झाली. १९८८ साली येथे पहिला एकदिवसीय सामना खेळवण्यात आला. २१ व्या शतकाच्या सुरुवातीला अंदाजे १६००० दशलक्ष डॉलरचा खर्च करून या मैदानाचे नुतनीकरण करण्यात आले. या नूतनीकरणामध्ये इनडोअर सामन्यांसाठी नेट असलेले बंद हॉल्स, कलादालने, ६००० वाढीव प्रेक्षक क्षमतेच्या दक्षिणेच्या बाजूचा स्टँड, प्रसिद्धी माध्यमे, पत्रकार, रेडीओ, दूरदर्शन, आकाशवाणी या सर्वांसाठी येथे आधुनिक पद्धतीने सोय करण्यात आली आहे. तसेच येथील मैदानाचे सभासद, टीसीए अधिकारी आणि खेळाडू यांच्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. सुरुवातीला या मैदानावर क्रिकेट आणि फुटबॉलचे सामने होत. १८८४ ला येथे पहिली फुटबॉल मॅच खेळल्या गेली. १९१३ मध्ये बीच, चर्च आणि डेरवेन्ट स्ट्रीट मध्ये असलेला हा जमिनीचा तुकडा क्लॉरेन्स कौन्सिलला विकला गेला आणि त्यानंतर १ वर्षाने येथे चांगले मैदान तयार होवून ते खेळण्यास उपयुक्त झाले. या मैदानावर वेळोवेळी अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. १९८९ ला पूर्वीचा धावफलक बदलून त्याजागी इलेक्ट्रॉनिक धावफलक उभारण्यात आला. तसेच प्रकाशझोतांची सोय करण्यात आली. आता या मैदानावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट, फुटबॉल सामने आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येतात.

टंकलेखन:-वैभव तुपे
संकलन:-मंजिरी होनकळसे
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

No comments:

Post a Comment